नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. चौरंगीनाथांना ‘सारंगधर’ आणि ‘पूरण भगत’ या अन्य नावांनीही ओळखले जाते. त्यांचा सर्वांत जुना उल्लेख ‘सा-स्क्य’विहाराच्या ११ ते १३ व्या शतकातील चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सूचीमध्ये सापडतो. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील ज्ञानेश्वरीत गुरू-शिष्य परंपरेच्या संदर्भात त्यांचे नाव मत्स्येंद्रनाथांच्या नंतर व गोरक्षनाथांच्या अगोदर आलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात देखील चौरंगीनाथांचा उल्लेख पुढीलप्रमाणे आलेला आहे :

तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं | भग्नावयवा चौरंगी |

भेटला कीं तो सर्वांगी | संपूर्ण जाला ||

चौरंगीनाथांचे शिल्प, नरेसर (मध्य प्रदेश).

चौदाव्या शतकातील तत्त्वसार या ग्रंथात योगी चांगदेव चौरंगीनाथांचा उल्लेख आदराने करतात. सिद्धांच्या सर्व उपलब्ध सूचींमध्ये त्यांचे नाव आढळून येते. राहुल सांकृत्यायन संकलित चौऱ्याऐंशी सिद्धांच्या वज्रयानी सूचीमध्ये त्यांचा नामनिर्देश ‘चौरंगीपा’ असा केलेला आहे. नवनाथचरित्रमु, शिवदिन मठात प्रचलित असलेली नवनाथ-गणना, तसेच कदलीमंजुनाथमाहात्म्यात दिलेल्या नवनाथांच्या सूचीमध्ये त्यांचे नाव आहे. तिबेटी परंपरेनुसार त्यांचा उल्लेख गोरक्षनाथांचा गुरुबंधू म्हणूनही केला जातो. चौरंगीनाथ लिखित प्राणसंकली या ग्रंथात त्यांनी स्वतःचे वर्णन राजा सालवाहनाचा पुत्र व मत्स्येंद्रनाथांचे शिष्य या नात्याने केले आहे. मराठी भाषेतील नवनाथभक्तिसार या सांप्रदायिक ग्रंथात त्यांचा ‘वैदर्भ’ देशाच्या राजाचा पुत्र म्हणून उल्लेख आला आहे.

चौरंगीनाथांविषयीच्या कथा भारतीय उपखंडातील पूर्वीचा पंजाब प्रांत, पश्चिम बंगाल, बांगला देश, महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशात प्रचलित आहेत. त्यांचे एक मुख्य मंदिर सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोट येथे आहे. दक्षिण भारतातील, विशेषत: तेलंगणा व आंध्रमधील कथा फार प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकातील गौराना लिखित नवनाथचरित्रमु या तेलुगू ग्रंथात, सारंगधरांची (चौरंगीनाथ) कथा आलेली आहे. चेमकूर वेंकट या तेलुगू कवीनेही या आख्यायिकेवर आधारित सारंगधरचरित्रमु नावाचे काव्य लिहिले आहे.

चौरंगीनाथांशी निगडित असलेल्या एका कथेत त्यांच्या दुष्ट सावत्र आईने केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांना आपले हातपाय कसे गमवावे लागले होते, याचे वर्णन आढळते. या पौराणिक कथेनुसार, चौरंगीनाथ हे एक राजपुत्र होते. राजाला दोन बायका होत्या. चौरंगीनाथांची सावत्र आई त्यांच्यावर आसक्त होती. तिने त्यांना भेटण्यासाठी निरोप पाठवला होता. परंतु चौरंगीनाथांनी या अनुचित प्रेमाचा स्वीकार केला नाही. राणीचा घोर अपमान झाला व तिने क्रुद्ध होऊन या अपमानाचा बदला घेण्याचे ठरविले. तिने चौरंगींवर चारित्र्यहननाचा आरोप टाकला. या आरोपानंतर राजाने चौरंगीनाथांचे हात-पाय तोडून त्यांना जंगलात फेकून दिले. अशा घोर संकटात सापडलेल्या चौरंगीनाथांची सुटका मत्स्येंद्रनाथांनी केली. त्यांनी चौरंगींना योगविद्येचे धडे दिले, ज्याद्वारे ते आपल्या अवयवांना पुनरुज्जीवित करण्यास सक्षम झाले आणि सिद्धीच्या बळावर चमत्कारिक रीत्या त्यांचे हातपाय पूर्ववत झाले. किरकोळ बदलांसह अनेक ग्रंथांमध्ये अशाच आशयाची आख्यायिका दिलेली आहे.

चौरंगीनाथ, पन्हाळे-काजी (रत्नागिरी) येथील एक शिल्प.

या आख्यायिकांचा प्रभाव चौरंगीनाथांच्या मुर्तिशिल्पांवरही दिसून येतो. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर चौरंगीनाथांच्या काही प्रतिमा आढळल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळे-काजी येथील १४ व २९ व्या लेण्यांत अनुक्रमे १३ व्या व १४ व्या शतकातील त्यांच्या दोन प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. लेणी क्र. २९ मधील प्रतिमा चौऱ्याऐंशी सिद्धांसह दर्शविली आहे. एक अन्य प्रतिमा बीड जिल्ह्यातील येळंब या गावी रामेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपातील एका स्तंभावर कोरलेली आहे. चौरंगीनाथांची सर्वांत जुनी प्रतिमा मध्य प्रदेशातील नरेसर येथून प्राप्त झाली आहे. ही प्रतिमा उत्तर भारतातील एकमेव ज्ञात प्रतिमा असून सु. बाराव्या शतकातील सांगितली जाते. एक अन्य शिल्प गुजरातमधील दभोई येथील महुडी तोरणद्वारावर चौऱ्याऐंशी सिद्धांच्या शिल्पांसमवेत कोरण्यात आले आहे.

या सर्व प्रतिमांचे एकंदरीत स्वरूप एकसारखेच आढळून येते. चौरंगीनाथांना नेहमीच दोन अतिरिक्त हातपाय, पद्मासन किंवा अर्ध-पद्मासन, ध्यान-मुद्रा, डोक्यावर खांद्यापर्यंत लोंबणारे फडके, कर्णकुंडले व यज्ञोपवीतासमवेत दर्शविले जाते. चौरंगीनाथांविषयीची संपूर्ण आख्यायिका शिल्परूपाने श्रीशैलम येथील साधारणतः पंधराव्या शतकातील मल्लिकार्जुन मंदिराच्या प्राकाराबाहेरील भिंतीवरही दर्शविली आहे. या चित्रचौकटीमध्ये (पॅनेल्स) चौरंगीनाथांना किमान बारा वेळा शिल्पांकित केले असून त्यांच्या जीवनावरील प्रसंग कोरण्यात आलेले आहेत. तिबेटकडील प्रदेशातही त्यांची काही चित्रे आहेत. कर्नाटकातील कदरी येथील मंजुनाथ मंदिरात आजही त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. लीळाचरित्रानुसार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी जवळील सप्तशृंगी पर्वतावर त्यांचे हातपाय तोडले गेल्याचे म्हटले जाते.

चौरंगीनाथांची शिल्पे मंदिर, लेणी, तोरणद्वार, शिवलिंग आणि प्राकार-भिंतींवर आढळून आलेली आहेत. त्यांना साधारणतः सर्व शिल्पांमध्ये मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांच्या मधोमध दर्शविले जाते. उपलब्ध शिल्पे व चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सूचींवरून त्यांचा कार्यकाळ साधारपणे बाराव्या शतकापूर्वी निश्चित केला जातो.

संदर्भ :

  • Deshpande, M. N. The Caves of Panhāle-Kājī (Ancient Pranālaka), Memoirs of Archaeological Survey of India, New Delhi, 1986.
  • Dowman, K. Masters of Mahamudra : Songs and Histories of the Eighty-Four Buddhist Siddhas,  Albany : State University of New York Press, 1985.
  • ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
  • द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.
  • कोलते, वि. भि. संपा., लीळाचरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७८.

                                                                                                                                                                समीक्षक : अभिजित दांडेकर