प्रस्तावना : वाढ व विकासाची प्रक्रिया ही बाळ जन्माला येण्याआधी म्हणजेच मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा झाल्यापासूनच सुरू झालेली असते. म्हणूनच या प्रक्रियेवर बाळाच्या जन्माच्या आधीचे व नंतरचे असे अनेक घटक परिणाम करत असतात.

अ) अनुवंशिकता : पालकांमधील गुणवैशिष्टे त्यांच्या मुलांमध्ये प्रसारित होत असतात. उदा., पालक उंच असतील तर त्यांची मुलेही उंच असण्याची शक्यता अधिक असते. आणि तर पालकांची उंची कमी असेल तर मुलांची उंची देखील त्याप्रमाणात वाढते. ही लक्षणे मुलांमधील अंत:स्रावी ग्रंथी किंवा आहारातील कमतरतेमुळे नसुन त्यांच्यामध्ये असलेल्या जनुकिय घटकांमुळे आढळते. मुलांमध्ये कोणती अनुवंशिक वैशिष्टे असतील हे ठरविण्यासाठी पालकांच्या आरोग्य इतिहासाचा अभ्यास केला जातो.

आ) लिंग : जन्माच्यावेळी सहसा मुले ही मुलींपेक्षा जास्त वजनाची व जास्त लांबीची असतात. तसेच वाढीचा वेग अकरा वर्षांपर्यंत मुलांमध्ये थोडा जास्त आढळतो. मात्र तरीही मुली लवकर परिपक्व होतात. मुलांच्या तुलनेत मुलींचा वाढीचा प्रवेग तसेच अस्थिवृद्धीचा वेग आगाऊ (More Advanced) आढळतो आणि पौगंडावस्था ही मुलींमध्ये मुलांच्या आधी आढळते. कायमस्वरूपी दात येण्याची प्रक्रिया देखील मुलींमध्ये लवकर आढळते. लिंगावरून मुलांची शारीरिक वैशिष्टे आणि वाढीचा नमुना तसेच या बदलांना मुलांची असणारी प्रतिक्रियाही ठरते.

इ) वंश आणि राष्ट्रीयत्व : विविध वंशाच्या गटातील मुलांची वाढीची क्षमता ही सारखी नसते. उदा., मंगोलियन वंशाची मुले अमेरिकन वंशाच्या मुलांपेक्षा कमी उंच असतात.त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राष्ट्रांनुसारदेखील मुलांची शारीरिक वैशिष्टे भिन्न असतात.

ई) वातावरण :

1) प्रसूतिपूर्व वातावरण : गर्भाच्या गर्भाशयातील वाढीसाठी प्रसूतिपूर्व वातावरण अतिशय महत्त्वाचे आहे. जसे,

i) मातेला गरोदरपणात संतुलित आहार न मिळाल्यास बाळामध्ये आहारिय कमतरतेचे आजार दिसून येतात.
ii) यांत्रिक समस्या उद्भवल्यास गर्भाची गर्भस्थिती विपरीत होऊ शकते (Malposition).
iii) मधूमेहासारखे चयापचयासंबंधी अंत:स्रावी ग्रंथींचे आजार गरोदर मातेला असल्यास किंवा रूबेला, टॉक्सोप्लाझ्मोसिस यांसारखे संसर्गजन्य आजार उद्भवल्यास गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
iv) आर एच.विसंगतता (Rh Incompatibility) असल्यास रक्तपेशी संबंधित आजार बालकामध्ये आढळतात (Erythroblastosis Fetalis).
v) मातेकडून धुम्रपान, मद्यपान, औषधे, आकडीविरोधी औषधे इत्यादींचे अतिरिक्त सेवन झाल्यास अपुऱ्या वाढीचे बाळ जन्माला येते.

2) प्रसूतिपश्चात वातावरण : बाळाच्या जन्मानंतर समाधानकारक अनुभव देणारे वातावरण असेल तर बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. शरीरातील एखाद्या भागाच्या वाढीवर इतर भागांच्या वाढीचा परिणाम होत असतो, तसेच इतर भागांवर इतर वाढीचा परिणात होत असतो.

i) बाह्यवातावरण  :

(a) सांस्कृतिक प्रभाव :
 गरोदर मातेबद्दल दृष्टिकोन व आहार
 सांस्कृतिकदृष्ट्या ठरलेला आहार
 मुलांच्या संगोपनाचा मंजूर नमुना (Sanctioned Pattern)
 आरोग्य सेवांची तरतूद

(b) कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक दर्जा :
 कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक दर्जा कमी असल्यास अनुकुलता कमी
 आर्थिक कमतरता
 आरोग्य सेवा कशा मिळवाव्या याबाबत खात्री नसणे, इच्छूक नसणे

(c) आहार :
 आहारिय घटकांचा दर्जात्मक व प्रमाणात्मक पुरवठा
 जर समतोल प्रमाण असेल तर मुलाचे पोषण योग्य होते
 पुरेशा वाढीसाठी गरज व मागणीप्रमाणे पुरवठा असणे आवश्यक

(d) हवामान व ऋतू :
 वजन व उंचीच्या दरात वर्षातील ऋतुप्रमाणे प्रभाव पडतो
 वसंत ऋतूत वजनातील वाढ कमी तर शरद ऋतूत जास्त असते

(e) सकारात्मक आरोग्यापासून विचलन (Deviations):
 जनमजात अवस्था किंवा अनुवंशिकता यामुळे असू शकते किंवा आजारपण अथवा इजा यामुळेही वाढ व विकास बदलू शकतो.
 शरीराच्या छोट्या आकारात खुजेपणाचा (Dwarfism), टर्नर लक्षणसमूहांचा समावेश असू शकतो.
 उंचीमधील अस्वाभाविकता मारफॅन लक्षणसमूहामुळे (Marfan’s Syndrome) मुळे असू शकतो.
 पित्ताशय तंत्वात्मकता (Cystic Fibrosis), कुशोषण लक्षणसमूह (Mal absorption Syndrome ) यासारखे दीर्घ आजार वाढीचा वेग कमी करतात

(f) व्यायाम : योग्य प्रमाणात मिळाल्यास शारीरिक क्रिया सुधारून स्नायुंमध्ये वाढ होते. ताजी हवा मिळाल्याने आरोग्य सुधारते.

(g) कुटुंबाची सामान्य स्थिती : पालक व बालकांमधील संबंध व मुलाच्या संगोपणाबाबत पद्धती.

ii) अंतर्गत वातावरण  :

(a) बुद्धिमत्ता : याचा काही प्रमाणात शारीरिक वाढीशी संबंध असतो. ज्या मुलांमध्ये अनुवंशिकपणे जन्मत: उच्च पातळीची बुद्धिमत्ता असते ती मुले वातावरणातील उत्तेजनामुळे चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित केली जातात, तर असे उत्तेजन न मिळाल्यास बुद्धिमत्ता वाया जाऊ शकते.

(b) संप्रेरक (Hormone) प्रभाव : उंचीमधील योग्य वाढ, उंचीमधील चयापचय, द्वितीय लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास यासारख्या सर्व बाबींसाठी संप्रेरक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

(c) भावना : आयुष्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती जसे, आई, वडिल, भावंडे, शिक्षक, समवयस्क मित्रमंडळी, यांच्याशी असलेले संबंध हे मुलाच्या भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
योग्य प्रमाणात काळजी व प्रेम न मिळाल्यास वाढीचा वेग कमी होतो.

संदर्भ :

  •  Piyush Gupta, Oxford Medical Dictionary, Essential Paediatric Nursing, 3rd Ed.,
  • www.khandbahale.com

समीक्षक : गायत्री म्हात्रे