संकल्पना : बहुतांश बालरोग हे टाळता येण्याजोगे असतात. यामुळेच रोग झाल्यानंतर तो बरा करणे किंवा दुष्परिणाम टाळणे यापेक्षा रोग होऊच नये यासाठी प्रयत्न करणे हे यातील परिचर्येचे मुख्य उद्दिष्ट व परिचारिकेचे मुख्य कर्तव्य असते. प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा ही मुख्यत्वे प्रसवपूर्व व प्रसव पश्चात या दोन संकल्पनेत विभागलेली आहे.
प्रसवपूर्व प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा : या परिचर्येमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :
- गरोदर मातांची काळजी, त्यांचे योग्य पोषण.
- संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव.
- प्रसुतीसाठी मातेची तयारी.
- स्तनपानासाठी व बाळाची काळजी घेण्यासाठी मातेची तयारी.
- किशोरवयीन मुली व गरोदरपणापूर्वीची स्त्री यांचीही काळजी घेणे. या भविष्यात होणाऱ्या माता असल्याने त्यांच्यासाठी तितकेच गरजेचे आहे.
प्रसवपश्चात प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा : या परिचर्येमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :
- स्तनपानासाठी मातेस प्रोत्साहन देणे.
- योग्य वयात बाळास योग्य तो वरचा आहार सुरू करणे.
- लसीकरण.
- अपघात प्रतिबंध.
- बालकांचे प्रेमळ संगोपन.
- वाढीचा अभ्यास करून अस्वाभाविकता लवकर ओळखणे.
- ठराविक काळा नंतर बालकांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी व मानसिक विकास तपासणे इ.
वरीलप्रमाणेच बदलत्या काळानुरूप काही नवीन घटकांचाही या प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे – जसे,
१) बालकांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक वाढीकरीता त्यांच्या सर्व गरज भागविणे. उदा., निरोगी व आनंदी पालक, चौरस आहार, स्वच्छ व निरोगी वातावरण, खेळ, मनोरंजन, प्रेम, आपुलकी, सुरक्षितता, ओळख, सवंगडी इ. तसेच, शिक्षणाच्या संधी व सोयी उपलब्ध करून देणे.
२) या सर्वांसाठी भारत सरकारने सन १९७४ मध्ये राष्ट्रीय बालक धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार विविध प्रतिबंधात्मक व सामाजिक सेवा या अंतर्गत विविध आरोग्य कार्यक्रम देशभरातील बालकांकरीता राबविले जातात.
खालील आरोग्य कार्यक्रमांचा यात मुख्यत्वे समावेश होतो :
- कौटुंबिक आरोग्य
- माता बाल आरोग्य (MCH)
- प्रजनन व बाल आरोग्य (RCH)
- बाळ-अनुकूल हॉस्पिटल उपक्रम (BFHI)
- एकात्मिक बाल विकास सेवा ( ICDS & NHM)
- राष्ट्रीय आरोग्य अभियान
- पाच वर्षांखालील बालकांची तपासणी व सेवा सत्र (Under Five’s Clinic)
- शालेय आरोग्य सेवा ( School Health services)
- आजारी शिशू व बालकांचे एकात्मिक व्यवस्थापन (IMNCI)
या व्यतिरिक्त काही सामाजिक समस्यांपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम सरकार राबविते :
- बालकामगार विरोधी कार्यक्रम
- बेघर बालकांचे पुनर्वसन
- मुलगा – मुलगी भेदभाव विरोधी उपाययोजना
- स्त्री भ्रुण हत्या प्रतिबंध
- बालकांचे शोषण व दुर्लक्ष या विरोधी उपाययोजना
प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा देताना परिचारिकेची जबाबदारी :
- मुलींच्या आरोग्याबाबत व त्यांची काळजी घेण्याबाबत जनजागृती करणे व त्यात मुली या भावी माता असल्याने त्यांची काळजी कशी महत्त्वाची आहे हे लोकांना पटवून देणे.
- गरोदर मातांना योग्य सेवा देणे जेणेकरून निरोगी व सुदृढ बालके जन्माला येतील.
- योग्य प्रसूती सेवा देणे म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकांचे जीविताचे धोके कमी करता येतील व नवजात बालकांत निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या कमी होतील.
- स्तनपानास प्रोत्साहन देणे व नवजात बालकास सर्व आवश्यक परिचर्या सेवा देणे.
- योग्य पद्धतीने योग्य त्या वयातील सर्व बालकांचे लसीकरण पूर्ण करून आजारांपासून त्यांचे संरक्षण करणे.
- आहारासंबंधी मातेस आरोग्य शिक्षण देणे, यात वरचा आहार, चौरस आहार, स्तनपान पद्धती, अन्नाची स्वच्छता व कुपोषण टाळणे इ. बाबत आरोग्य शिक्षण द्यावे.
- वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याच्या सवयी, पर्यावरण स्वच्छता, स्वच्छ पिण्यायोग्य पाणी, बालकांचे अपघातापासून संरक्षण, मानसिक आरोग्य, कुटुंब नियोजन, प्रजनन आरोग्य व संसर्गापासून बचाव इ. विषयांवरील आरोग्य शिक्षण देणे व समुपदेशन करणे.
- तत्पर व पुरेशी सेवा आजारी किंवा अपघातग्रस्त बालकांस देणे.
- बालक व पालक यांच्यात स्वतःची काळजी घेण्याची पात्रता निर्माण करणे.
- बालकांमधील आजार हे लवकरात लवकर शोधून त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी नियमितपणे सर्व बालकांची तपासणी करणे.
- पारंपारिक बालसंगोपन पद्धती ज्यांच्यामुळे बालकांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते अशा पद्धतींना प्रोत्साहन देणे.
- कुटुंब व समाज यांना बाल आरोग्य व बाल संगोपन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास देणे.
- विविध उपक्रम व राष्ट्रीय कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी यात सक्रिय सहभाग घेऊन बालकांचे आरोग्य सुस्थितीत राखण्यास मदत करणे.
संदर्भ :
- Parul Datta, Pediatric Nursing, 4th Edition.
समीक्षक : सरोज उपासनी