शारीरिक वाढीची तपासणी ही मानवमितिय मोजमाप (anthropometric measurement)  आणि शारीरिक वाढीचा वेग यावरून करता येते. शारीरिक वाढीची तपासणी ही प्रामुख्याने वजन, लांबी किंवा उंची, डोक्याचा घेर, छातीचा घेर, मध्यदंड घेर इ. निकषांवर केली जाते. याबरोबरच शरीर वस्तुमान सूची (Body mass index), शरीर प्रमाण (Body ratio), टाळु भरणे (fontanel closure), त्वचेच्या घडीचा जाडपणा (skin fold thickness), दात येणे आणि हाडांचे वय या निकषांचा देखील उपयोग मुलांच्या शारीरिक वाढीचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो.

आ. १. वजन मोजण्याकरिता वापरण्यात येणारी साधने : (अ) तुळई तराजू, (आ) पसरट तराजू.

वाढीची तपासणी करण्याचे तंत्र :

वजन : वाढ तपासणीचा एक उत्तम निकष म्हणजे वजन. भारतीय नवजात बालकाचे वय साधारणत: अडीच त साडे तीन किलो असते. सहाव्या महिन्यापर्यंत बाळाचे वजन जन्माच्यावेळी असणाऱ्या वजनाच्या दुप्पट व एक वर्षापर्यंत जन्माच्यावेळी असणाऱ्या वजनाच्या तिप्पट होते. वजनाचे मोजमाप करण्याकरिता वयानुसार निरनिराळ्या प्रकारचे वजनकाटे वापरले जातात. एक वर्षापर्यंतच्या बालकांसाठी पसरट वजनकाटे (ज्यामध्ये बालकांना बसवता किंवा झोपवता येतील असे) वापरतात. त्यानंतरच्या बालकांना तुळई तराजू (beam balance), प्रौढांसाठी वापरण्यात येणारा वजनकाटा किंवा अंकिय वजनकाटा उपलब्धतेनुसार वजनकाटा वापरला जातो. यांत तुळई तराजू  सर्वाधिक अचूक मोजमाप देतो.

आ. २. उंची / लांबी मोजण्याकरिता वापरण्यात येणारी साधने : (अ) स्टेडीओमीटर, (आ) हापेंडनचे अर्भक मापक.

 उंची : उंचीमधील वाढ ही अस्थिसांगाड्यातील वाढ दर्शविते. दोन वर्षाच्या आतील बालकांची पाठीवर सरळ झोपलेल्या स्थितीत लांबी व त्यापेक्षा मोठ्या मुलांची उंची मोजली जाते. जन्माच्या वेळी भारतीय नवजात बालकाची लांबी ४५ – ५० सेंमी.  इतकी असते. बालक एक वर्षाचे होईपर्यंत लांबी सु. ७५ सेंमी. होते. लांबी मोजण्यासाठी हापेंडनच्या अर्भक मापकाचा (Herpenden’s infantometer) उपयोग करतात, तर दोन वर्षांपेक्षा मोठ्या मुलांची उभे राहून उंची मोजण्यासाठी स्टेडीओमीटर या साधनाचा उपयोग करतात.

शारीरिक घेर : मानवमितिशास्त्र मानकान्वये (standard anthropometry) शारीरिक घेर या संकल्पनेत प्रामुख्याने डोके, छाती व मध्यदंड या भागांचा समावेश होतो. डोक्याचा घेर हा मेंदूच्या वाढीशी संबंधित असतो. जन्माच्या वेळी सर्वसाधारण डोक्याचा घेर हा ३३ – ३५  सेंमी.  इतका असतो. एक वर्षापर्यंत डोक्याचा घेर सु. ४५ सेंमी. इतका होतो. छातीचा घेर व मध्यदंड घेर हा मुलांच्या वाढीच्या व आहाराच्या स्थितीचा मुख्य मापदंड आहे. जन्माच्यावेळी छातीचा घेर ३१ – ३३ सेंमी. असतो. बालक एक वर्षाचे होईपर्यंत त्यामध्ये सु. २.५ सेंमी. पर्यंत वाढ होऊ शकते. बालकाच्या जन्माच्यावेळी मध्यदंड घेर ११ – १२ सेंमी. असतो. बालक एक वर्षाचे होईपर्यंत मध्यदंड घेर १२ – १६  सेंमी. होतो. शारीरिक घेर मोजण्यासाठी साध्या मोजमाप टेपचा उपयोग करतात.

आ. ३. शारीरिक घेर तपासणी : (अ) डोक्याचा घेर, (आ) छातीचा घेर, (इ) मध्यदंड घेर.

मुलांच्या शारीरिक वाढीची तपासणी करत असताना, शारीरिक उंची, वजन व घेर या महत्त्वाच्या निकषांबरोबरच शारीरिक वाढीचा वेग, टाळू भरणे किंवा बंद होणे, दात येणे, हाडांची वाढ इ. निकषांचा देखील उपयोग केला जातो.

परिचारिकेची जबाबदारी :

  • बाळाचे वजन घेत असताना त्याला कमीत कमी कपडे घातले आहेत याची खात्री करावी. कमी कपड्यांमुळे त्याला थंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. वजन काट्यावरून बाळ पडणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • उंची किंवा लांबी मोजण्यासाठी रुग्णालयात साधने उपलब्ध असतात. परंतु काही ठिकाणी ती उपलब्ध न झाल्यास अडून न राहता परिचारिकेने साध्या मोजपट्टिच्या साहाय्याने लांबी / उंची मोजावी. लांबी मोजत असताना बाळाला सपाट व कडक पृष्ठभागावर झोपवुन मान व पाय सरळ रेषेत करावेत आणि त्या ठिकाणी खुण करून द्यावी व मोजपट्टिने लांबी मोजावी. तसेच दोन वर्षांवरील मुलांमध्ये उंची मोजताना एका सपाट भिंतीवर मोजमाप वाचन पट्टी तयार करून मुलांची उंची मोजावी. गृहभेटीदरम्यान याचप्रकारे लांबी / उंची मोजणे सोईचे होते.
  • डोक्याचा घेर मोजताना मोजमाप पट्टी डोळ्याच्या खोबणीच्या वरील कडेच्या (supraorbital ridge) वरच्या बाजूस ठेऊन डोक्याच्या मागील बाजूच्या हाडाच्या (occipital bone) उंचवट्यापर्यंत घेर मोजावा. मोजपट्टी दोन्ही कानांवरून घ्यावी.
  • छातीचा घेर तपासत असताना मोजमाप पट्टी छातीभोवती वक्ष स्थळाच्या पातळीत (level of nipples) पकडावी व घेर मोजावा. मोजत असताना श्वास आणि उच्छ्वास याच्यामधील वेळेत पहावा.
  • मध्यदंडघेराची तपासणी करत असताना परिचारिकेने मध्यदंड न दाबता हळुवारपणे मोजावा. मोजत असताना हात मुक्तपणे लटकलेला असावा (hang freely) खांदा व कोपराच्या मध्यभागावरील बिंदूवर मोजमाप घ्यावे. साध्या मोजपट्टीने पण घेर मोजता येतो. घेर मोजत असताना दंडावर कपडे नसावेत.
  • टाळू खोल असणे, जास्त फुगलेली असणे, योग्यवेळेपूर्वी किंवा नंतर बंद होणे या गोष्टी अस्वाभाविकता सुचित करतात. यामुळे कुपोषण, जलमस्तिष्क (Hydrocephalous), हृदयविकार इ. आजार असण्याची शक्यता असू शकते. हे सर्व योग्यवेळी शोधण्यासाठी परिचारिकेने योग्यवेळी टाळू तपासणे आवश्यक असते.
  • वरील सर्व निकषांची नोंद करून झाल्यावर बालकाच्या आरोग्य तक्त्यात त्याची योग्य ती नोंद करावी व हा तक्ता नेहमी अद्ययावत ठेवावा. जे निकष सर्वसाधारण प्रमाणापेक्षा कमी वा अधिक असतील त्यांविषयी पालकांना योग्य मार्गदर्शन करावे व मुलांची शारीरिक वाढ योग्यप्रकारे होण्यास सहकार्य करावे.

मुलांच्या  शारीरिक वाढीची तपासणी ही  (anthropometric measurement) शारीरिक वाढीचा वेग यावरून करता येते. वाढीच्या वेगवेगळ्या मापदंडाचे मोजमाप करणे ही मुलांच्या आरोग्य सेवेची एक महत्‍त्वाची परिचर्या असून ती प्रत्येक परिचारिकेची जबाबदारी आहे.

संदर्भ :

  • Wilson,David;Hockenberry, Marilyn J. Wong’s Essentials of Pediatric Nursing.
  • Gupta, Piyush, Essential Pediatric Nursing, 3rd

समीक्षक : गायत्री म्हात्रे