वाईझमन न्स्टिट्यूट ऑफ सायन्स : ( स्थापना – १९३४ )

काइम वाईझमन नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने १९३४ साली वाईझमन विज्ञानसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. इस्रायलमध्ये ज्यू राष्ट्र वसवण्याचे आणि तिथे उच्च शिक्षण देणाऱ्या, जागतिक दर्जाच्या संस्थांची निर्मिती करण्याचे स्वप्न वाईझमन यांनी पाहिले व त्यांच्या जीवितकाळात त्यांनी ते पूर्णही केले. इतर बऱ्याच जणांच्या सहकार्याने १९२५ साली जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाची व १९३४ साली रेहोहोत येथील वाईझमन विज्ञान संस्थेची स्थापना करण्याचे भाग्य त्यांना लाभले. वाईझमन संस्थेचे मूळ नाव डॅनियल सीफ संशोधन संस्था असे होते. रिबेका आणि इस्रायल सीफ यांनी त्यांच्या मुलाच्या, डॅनियलच्या स्मरणार्थ सढळ हस्ते दिलेल्या देणगीतून ती उभी राहिली.

वाईझमन संस्थेचे काइम वाईझमन पहिले अध्यक्ष होते. ग्रेट ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठात शिकवत असताना जीवाणूंच्या सहाय्याने वाईझमन यांनी ॲसिटोन बनवण्याची पद्धती विकसित केली, पहिल्या जागतिक युद्धाच्या दरम्यान ब्रिटीशांनी त्या निर्मिती प्रक्रियेचा पुरेपूर वापर केला. यानंतर इस्रायलमध्ये स्वतंत्र ज्यू राष्ट्राला पाठींबा देणारे घोषणापत्र लॉर्ड आर्थरबालफोर व वाईझमन यांनी लिहिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांना पटवून वाईझमन यांनी इस्रायलच्या स्थापनेस मंजूरी मिळवली आणि स्वतंत्र इस्रायलचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतरही वाईझमन यांनी प्रयोगशाळेतील आपले संशोधन चालूच ठेवले. वाईझमन संस्थेत होणाऱ्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे संपूर्ण जगातले नामवंत संशोधक या संस्थेकडे आकर्षित झाले. १९४९ साली, वाईझमन यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी, त्यांच्या सन्मानार्थ आणि सीफ कुटुंबियांच्या सहमतीने सीफ संस्थेचे नाव बदलून ते वाईझमन संस्था असे करण्यात आले. या नवीन संस्थेत त्याकाळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवविज्ञानशास्त्र हे विषय शिकवले जात असत. आता मात्र येथील विद्यार्थी केवळ याच विषयांत नव्हे तर संगणकशास्त्र, जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र अशा विषयातही इथे पदव्युत्तर शिक्षण (एम.एस्सी/ पीएच्.डी. / एमडी) घेऊ शकतात. इथे एकशे बहात्तर संशोधक, तीनशे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, सातशे पीएच्.डी.चे विद्यार्थी तर तीनशे ऐंशी पोस्ट डॉक्टोरल विद्यार्थी सध्या काम करतात. संस्थेमधील संशोधनाला शंभर कोटी डॉलर्सचे अनुदान देण्यात येते. निवड झालेल्या सगळया विद्यार्थ्यांना संपूर्ण फेलोशीप दिली जाते, विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर नोकरी करण्याची परवानगी नाही. अनेक शाखा असलेला वटवृक्ष वाईझमन संस्थेची खूण आहे. या वटवृक्षाप्रमाणेच इथे बहुआयामी शिक्षण दिले जाते.

वाईझमन संस्थेने आतापर्यंत amniocentesis चे तंत्रज्ञान, p53 या ट्यूमर दडपणाऱ्या जनुकाचा शोध, मल्टीपल स्क्लेरोसिसवरचे गुणकारी औषध, संगणकाद्वारे व्यवहार करण्यासाठी सुरक्षित अशी प्रणाली. जनुकीय रोगांविषयी माहिती, वनस्पतींच्या नवीन प्रजाती, अब्जांश तंत्रज्ञानाची (nano) सामग्री शोधून काढण्यात यश मिळवले आहे. तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी वाईझमन संस्थेने येडा (YEDA) या नावाच्या एका कंपनीची स्थापना केली. आतापर्यंत या कंपनीने दोन हजार एकस्वे दाखल केली आहेत.

वाईझमन संस्थेशी २०१७ पर्यंत सहा नोबेल पारितोषिक विजेते व तीन टुरिंग पारितोषिक विजेते संबंधित आहेत. नोबेल पारितोषिक विजेती अडा योनाथ (Ada Yonath), नामवंत क्रिप्टोग्राफर अदी शामिर (Adi Shamir), प्रोफेसर युरी अलोन (Uri Alon) हे येथील काही नामवंत माजी विद्यार्थी आहेत.

जागतिक विद्यापीठांच्या २०१७ मध्ये झालेल्या पाहणीमध्ये वाईझमन संस्थेची क्रमवारी १०१ ते १५० यामध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर युएस न्यूजच्या ग्लोबल विद्यापीठांच्या क्रमवारीत या संस्थेचा क्रमांक एकशे चार आहे. वाईझमन संस्था इस्रायलमधील सर्वोत्तम व जगातील एक नाणावलेले विद्यापीठ समजले जाते.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे