पंचमहाल (गुजरात) जिल्ह्यातील कडाना धरणाच्या खालील बाजूस मही नदीच्या डाव्या तीरावर असलेल्या आग्नेय दिशेला सु. ६०० मीटर अंतरावरील खडकांवर काही चक्राकार खुणा वा छाप आढळून येतात. साधारणपणे उथळ पाण्यातील प्रवाहातील बदलानुसार, निक्षेपित झालेला बारीक एकसारख्या घटकांचा अवसाद निक्षेपित पृष्ठभागावर आकार घेत असतात. परंतु ते नाजूक आणि बदलत्या स्थितीत असल्याने फारकाळ टिकत नाहीत. त्यामुळे त्यांचे खडकामध्ये छाप राहत नाहीत. अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी असे छाप आढळून येणे हे निसर्गातील एक आश्चर्य मानले जाते. अशा प्रकारचे अत्यंत दुर्मिळ असलेले छाप भूशास्त्रीय कालौघात अवसादी निक्षेपणाच्या वेळी निर्माण झालेली प्रवाह स्थित्यंतरे दाखविणारे म्हणून संरक्षित झालेले आहेत.

या ठिकाणी त्याकाळातील उथळ प्रवाहात लाकडी ओंडक्याचा एखादा तुकडा किंवा गारगोटीचा दगड पाण्यातील भोवऱ्यात (Eddy Current) फिरत राहिल्यामुळे वाळूच्या कणांनी चाकाच्या आरीसारखा चक्राकार आकार घेतलेला दिसून येतो, जो या ठिकाणी असलेल्या अरावली महासंघातील (Aravalli Super Group), तरुण अशा लुनावाडा संचातील (Lunawada Group) वालुकाश्मावर (सु. २००० दश लक्ष वर्षांपूर्वी – केंब्रियन पूर्व काळापासून) छापासारखा संरक्षित राहिलेला आहे.

राष्ट्रीय महामार्ग आठवरील खेरवारा स्थानकापासून या ठिकाणी जाता येते. कडाना धरण हे राजस्थान आणि गुजरात राज्यांच्या महत्वाच्या शहरांना जोडलेले असून डूंगरपूर आणि लुनावाडा ही दोन जवळची रेल्वे स्थानके आहेत.

संदर्भ :

                                                                                                                                                                                                                        समीक्षक :  पी. एस.कुलकर्णी