डीमॉक्रिटस : (इ.स.पू. ४६०—इ.स.पू. ३७०). प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि ग्रीक अणुवादाचा संस्थापक व प्रवर्तक. त्याने आपल्या काळात मांडलेले सिद्धांत हे आपल्या आधुनिक काळातील भौतिकशास्त्रीय सिद्धांतांच्या जवळपास जाणारे आहेत. जरी डीमॉक्रिटसचा परमाणुवाद आणि आधुनिक आण्विक सिद्धांत ह्यांत बराच फरक असला, तरी त्याच्या ह्याच विचारांमधून आधुनिक विज्ञानाचा पाया रचला गेला.
डीमॉक्रिटस हा परंपरेप्रमाणे पाहता ॲब्डेरा ह्या थ्रेसमधील नगराचा सुखवस्तू नागरिक होता आणि त्याने खूप प्रवासही केला होता. त्याने ६० हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत व त्यांच्यात तत्कालीन समग्र ज्ञानाचा परामर्ष त्याने घेतला आहे. त्याच्या लिखाणाचे काही तुटक भागच आज अवशिष्ट आहेत; पण ग्रेट वर्ल्ड सिस्टिम आणि लिटिल वर्ल्ड सिस्टिम हे दोन ग्रंथ त्याने लिहिले आहेत, अशी समजूत आहे. नीतिशास्त्रावरील त्याच्या ग्रंथाचे काहीच खंड अजूनही उपलब्ध आहेत. ॲरिस्टॉटलने लिहिलेल्या एका प्रबंधिकेत डीमॉक्रिटसच्या विचारांबद्दल बरेच पुरावे मिळतात. उपलब्ध अहवालांनुसार डीमॉक्रिटस हा सॉक्रेटीसचा समकालीन होता. डीमॉक्रिटसचे नाव नेहमी ल्युसिपस (इ.स.पू.सु. ४५०) या तत्त्वज्ञासोबत घेतले जाते. डीमॉक्रिटस हा ल्युसिपसचा शिष्य होता, असे मानले जाते आणि ते दोघेही परमाणुवादी होते. ग्रीक परमाणुवादाची मांडणी प्रथम ल्युसिपसने केली आणि तिचा विकास करून तिला सुव्यवस्थित रूप देण्याची कामगिरी डीमॉक्रिटसने केली. त्या दोघांच्या तात्त्विक भूमिकेत फार वेगळेपणा दाखवता येत नाही. डीमॉक्रिटसने परमाणुवादाची जी रचना केली, तिच्यात ल्युसिपसकडून लाभलेले सिद्धांत नेमके कोणते आहेत, हे सांगणे कठीण आहे. परंतु डीमॉक्रिटसने ल्युसिपसच्या परमाणुवादाची सुसंगत मांडणी करून तत्त्वज्ञानात परमाणुवादाचा भक्कम पाया रचला. प्रसिद्ध गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ बर्ट्रंड रसेल ह्यांनी डीमॉक्रिटसच्या तत्त्वज्ञानाचे अजून एक वेगळेपण सांगितले आहे. ते म्हणजे डीमॉक्रिटसचे तत्त्वज्ञान हे मानवकेंद्री नव्हते. डीमॉक्रिटसचे समकालीन तत्त्वज्ञ प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांचे तत्त्वज्ञान मानवकेंद्री होते; परंतु डीमॉक्रिटसच्या मते मनुष्याला ह्या जगात काही अनन्यसाधारण महत्त्व नाही आणि इतर अनेक घटकांप्रमाणे तो ह्या जगाचा फक्त एक घटक आहे. परमाणुवादाबरोबरच त्याच्या तत्त्वज्ञानात त्याने ‘हसतमुख’ राहण्याला खूप प्राधान्य दिल्यामुळे प्राचीन काळापासून त्याला ‘हसतमुख’ तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जाते.
डीमॉक्रिटसचा परमाणुवाद : ग्रीक परमाणुवादाचा उगम पार्मेनिडीझ (इ.स.पू. ६ वे–५ वे शतक) याच्या सिद्धांतात आहे. खरेतर परमाणुवाद हा पार्मेनिडीझने निर्माण केलेल्या आव्हानाला दिले गेलेले उत्तर आहे. पार्मेनिडीझ च्या सिद्धांताप्रमाणे ‘जे आहे ते एक आहे आणि हे एक सत् अपरिवर्तनीय, अनिर्मित, अविनाशी, एकविध, सघन व अविभाज्य असे आहे’. ह्या सिद्धांताच्या समर्थनासाठी पार्मेनिडीझने काही युक्तिवाद दिले आहेत. त्याचप्रमाणे पार्मेनिडीझने रिक्त पोकळीचे (Void) अस्तित्व नाकारले आहे. कारण रिक्त पोकळी म्हणजे ‘जे नाही आहे तेअस्तित्त्वात नाही’ आणि जे नाही आहे त्याला अस्तित्व असू शकत नाही आणि रिक्त पोकळी जर नसेल, तर गती किंवा गमन असू शकणार नाही. तेव्हा पार्मेनिडीझ उत्पत्ती, विनाश, परिवर्तन ह्यांच्याप्रमाणेच गमनाचे अस्तित्वही नाकारतो.
पार्मेनिडीझने निर्माण केलेल्या ह्या समस्येला एम्पेडोक्लीझ आणि ॲनॅक्सॅगोरस यांच्यापेक्षा अधिक तर्कसंगत उत्तर परमाणुवाद्यांनी दिले. पार्मेनिडीझने अपरिवर्तनीय असे सत् आहे आणि हे सत् एक आहे, असे मानले. परमाणुवाद्यांनी अनेक परमाणू आहेत; पण प्रत्येक परमाणूचे स्वरूप पार्मेनिडीझच्या सत्प्रमाणेच असते, म्हणजे प्रत्येक परमाणू अपरिवर्तनीय असतो, त्याचे स्वरूप बदलत नाही, तो अस्तित्वात येत नाही किंवा नष्ट होत नाही, असे मानले. म्हणजे थोडक्यात एक सत् नसून अनेक सत् आहेत व असत्ही आहे, हा सिद्धांत त्यांनी स्वीकारला. परमाणुवादाचा मूलभूत सिद्धांत असा की, अनादी, अनिर्मित, अविनाशी, अपरिवर्तनीय, एकविध, सघन आणि अविभाज्य असे अनेक आहेत–त्यांनाच त्यांनी परमाणू असे नाव दिले–परमाणुप्रमाणेच रिक्त पोकळीही आहे. पार्मेनिडीझने पोकळीचा अर्थ ‘जे नाही ते’ असा लावला होता व जे नाही ते नसते व म्हणून पोकळी नाही, असा निष्कर्ष काढला होता. ह्याच्या उलट परमाणुवाद्यांनी ‘जे नाही तेही आहे’ व म्हणून पोकळी आहे, असे ठामपणे मानले. ह्यांशिवाय अन्य काही नाही. रिक्त पोकळी अनंत आहे आणि तिच्यात अनंत परमाणू पसरलेले आहेत. विश्वामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक वस्तू असल्याचे आपल्या अनुभवास येते, त्यांच्यामधील भेदांचा उलगडा परमाणूंचे आकार, त्यांची रचना आणि त्यांची अवस्थिती ह्यांच्या साहाय्याने करता येतो.
असत्मध्ये म्हणजे पोकळीमध्ये परमाणूंचा सतत संचार चालू असतो. परमाणूंच्या गतीचे कारण काय? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही; कारण हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने उपस्थितच होत नव्हता. परमाणूंना नैसर्गिकपणे गती असते. पोकळी नाही त्यामुळे वस्तूंना गती असणे शक्य नाही, असे पार्मेनिडीझचे मत होते. उलट पोकळी आहे म्हणून वस्तूंना म्हणजे परमाणूंना गती असली पाहिजे, हे मत परमाणुवाद्यांनी स्वीकारले. परमाणूंचे त्यांच्या भागांत विभाजन करता येत नाही. ते सूक्ष्म असल्यामुळे इंद्रियगम्य नसतात. सर्व परमाणूंचे आंतरिक स्वरूप सारखेच असते; फक्त त्यांचे आकार व आकारमान वेगवेगळे असते. पोकळीत सर्वत्र संचार करीत असताना परमाणू एकमेकांत अडकून एकत्र येतात व त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू बनतात आणि त्या इंद्रियगोचर असतात.
इंद्रियांना वस्तूंचा जो अनुभव येतो, ते खरे ज्ञान नसते खरेखुरे ज्ञान बुद्धीला होते, असे पार्मेनिडीझचे मत होते. परमाणुवादीही इंद्रियांना वस्तूंचे जे गुण जाणवतात–उदा., रंग, चव, गंध इ.–ते वस्तूंचे, म्हणजे परमाणूचे स्वतःचे अंगभूत गुण आहेत, असे मानीत नाहीत. आकार आणि आकारमान हे गुण सोडले, तर सर्व परमाणूंचे स्वरूप सारखेच असते. मग वेगवेगळे वेदनगम्य गुण अंगी असलेल्या–म्हणजे तांबड्या, हिरव्या, मऊ, कठीण, सुवासिक, आंबट, खारट इ. असलेल्या–वस्तू कशा अस्तित्वात येतात? परमाणुवाद्यांचे म्हणणे असे की, परमाणूंचे स्वरूप सारखे असले, तरी त्यांचे आकार वेगळे असतात किंवा त्यांची रचना वेगवेगळी असू शकते. म्हणून सर्व वस्तू ज्या परमाणूंच्या बनलेल्या असतात त्यांचे स्वरूप जरी सारखे असले, तरी वेगवेगळ्या आकाराचे परमाणू एकत्र आल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची रचना झालेली असल्यामुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्या इंद्रियांवर वेगवेगळे परिणाम घडवून आणतात आणि ह्यांमुळे त्यांचे इंद्रियगोचर गुण वेगवेगळे आहेत असे भासते. थोडक्यात परमाणू आणि पोकळी ह्यांशिवाय विश्वात काहीच नाही.
परमाणू आणि पोकळी ह्या डीमॉक्रिटसने मांडलेल्या दोन्ही संकल्पना ॲरिस्टॉटलला मान्य नव्हत्या आणि त्याने त्याचा कडाडून विरोध केला; परंतु डीमॉक्रिटसचा वैज्ञानिक दृष्टीकोण आणि त्याने अवलंबलेली पद्धत ह्यांची मात्र त्याने त्याच्या पुस्तकांमधून स्तुती केली आहे.
‘मधुर आणि कडू, ऊष्ण आणि शीत रंग ह्यांना संकेतामुळे अस्तित्व आहे वास्तवात परमाणू आणि रिक्त पोकळी आहे’, अशा अर्थाचे डीमॉक्रिटसचे एक वचन आहे. ह्याचा अर्थ असा की, आपल्या इंद्रियसंवेदनांना जाणवणारे वस्तूंचे रंग, चव इ. जे गुण असतात, ते भौतिक वस्तूंचे स्वतःचे गुण नसतात. त्या वस्तूंनी आपल्या शरीरावर परिणाम केल्यामुळे ह्या संवेदना आपल्याला प्राप्त होत असतात. भौतिक वस्तूंच्या स्वतःच्या ठिकाणी असलेले गुण–ज्यांना ‘प्राथमिक गुण’ म्हणतात–आणि त्यांच्यापासून प्राप्त होणाऱ्या संवेदनांचे आशय असलेले रंगरसादी गुण–‘दुय्यम गुण’–ह्यांच्यात जो भेद आधुनिक तत्त्वज्ञानात करण्यात येतो, तोच डीमॉक्रिटसला अभिप्रेत आहे. परमाणूंचे स्वरूप एकविध असते, पण त्यांचे आकार भिन्न असतात; तसेच त्याच परमाणूंची भिन्न रचना होऊ शकते; तसेच त्यांची अवस्थितीही भिन्न असू शकते. परमाणूंचे आकारमान भिन्न असते असेही डीमॉक्रिटसचे मत होते; पण ते इतके लहान असते की, सर्व परमाणू अदृश्य असतात, असेही तो मानीत असे. ज्याप्रमाणे परमाणू नित्य असतात, त्याप्रमाणे परमाणूंची गतीही नित्य असते ती कोणत्याही कारणामुळे परमाणूंच्या ठिकाणी निर्माण होत नाही. परमाणूंच्या गतीमुळे ते सतत एकमेकांवर आदळत असतात. ह्या संघर्षामुळे ते एकमेकांपासून दूर तरी सरतात किंवा एकमेकांत अडकतात. दोन परमाणूंचे आकार एकमेकांशी जुळत असल्यामुळे ते सांधले जातात आणि त्यांच्यापासून संयुक्त पदार्थ बनतात. सर्व भौतिक बदल हे मूलतः परमाणूंचे झालेले संयोग किंवा विभाजन ह्या स्वरूपाचे असतात. जगाची उत्पत्ती ह्याच प्रक्रियेला अनुसरून होत असते. ल्युसिपसचे एक वचन असे आहे की, ‘काहीही आगंतुकपणे घडत नाही जे जे घडते, ते काही कारणामुळे अनिवार्यतेने घडते’. म्हणजे गतिमान परमाणूंमध्ये यांत्रिक नियमांना अनुसरून ज्या क्रिया-प्रतिक्रिया घडतात, त्यांतून विश्वाची उत्पत्ती आणि विश्वातील फेरबदल घडून येत असतात.
आत्मा आणि इतर वस्तूंचे स्वरूप : डीमॉक्रिटसच्या मते प्राण्यांचे आणि माणसाचे आत्मेही परमाणूंचे बनलेले असतात. मात्र हे परमाणू अत्यंत सूक्ष्म, आकाराने पूर्णपणे गोल आणि म्हणून अतिशय चपळ असतात. भौतिक वस्तू ‘प्रतिमा’ ढाळत असतात आणि त्या इंद्रियांद्वारे आत येऊन त्यांचा आत्म्यावर जेव्हा आघात होतो, तेव्हा संवेदना निर्माण होते. जेव्हा ह्या प्रतिमा इंद्रियांद्वारे नव्हे, तर सरळ आत्म्याच्या परमाणूंवर आघात करतात, तेव्हा तो विचार असतो. डीमॉक्रिटस ‘अनौरस’ आणि ‘औरस’ किंवा विहित ज्ञान ह्यांच्यात भेद करतो. संवेदनांद्वारे होणारे ज्ञान अनौरस असते. विहित ज्ञान, परमाणू आणि रिक्त पोकळी यांचे ज्ञान, विचाराद्वारे होते. पण डीमॉक्रिटस हा पार्मेनिडीझसारखा केवळ विवेकवादी नव्हता. इंद्रियसंवेदनांद्वारा लाभणाऱ्या पुराव्याचे चिकित्सक विश्लेषण करून विहित ज्ञानप्राप्त करून घेता येते व विहित ज्ञानही ‘अनौरस’ ज्ञानाहून स्वरूपतः भिन्न नसते–प्रतिमांचे आत्म्याच्या परमाणूंवर होणारे आघात ह्याच स्वरूपाचे असते–अशी त्याची भूमिका होती.
त्याच्या मते सर्व वस्तूंप्रमाणेच आत्माही परमाणुमय आहे. त्यामुळे संवेदना म्हणजे बाहेरच्या परमाणूंचा आत्मपरमाणूंवर होणारा आघात होय. ज्ञानेंद्रिये ही केवळ या आघाताची द्वारे आहेत. तो असे मानतो की, आत्मा हा चिकण व गोल अणूंनी बनलेला असून तो अत्यंत शुद्ध व परिष्कृत असा अग्नी आहे. मृत्यूच्या वेळी आत्म्याचे अणू विखुरले जातात, त्यामुळे पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही.
संवेदनेची उपपत्ती : आपल्या संवेदनेचा विषय म्हणजे वास्तविक स्वरूपातील तो पदार्थ नसून त्या पदार्थाचे प्रतिबिंब असते, असे म्हटले पाहिजे. हे प्रतिबिंब अगदी पदार्थासमान नसते. मध्यंतरी असणाऱ्या हवेमुळे त्याचे रूप अस्पष्ट होते. जगातील वस्तू स्वतःच्या प्रतिमांचे बाहेर प्रक्षेपण करीत असतात व त्या प्रतिमा अणूंच्या बनलेल्या असतात. या प्रतिमा इंद्रियांवर आघात करतात व समानधर्मी अणूंना संवेदित होतात. ज्ञान हे दोन प्रकारचे असते–व्यभिचारी व सत्य. इंद्रियजन्य सर्व ज्ञान हे व्यभिचारी आहे. सत्यज्ञान म्हणजे इंद्रियांच्या साह्यावाचून आत्म्याला होणारे ज्ञान होय. ज्ञान हे अमूर्त असले, तरी बुद्धीला होते. डीमॉक्रिटस म्हणतो की, केवळ सवयीमुळेच कडू व गोड, उष्ण व शीत, पांढरे व काळे या कल्पना आल्या आहेत. मुळात पाहू गेले, तर परमाणू व पोकळी याशिवाय काही नाही.
डीमॉक्रिटसचे नीतिशास्त्र : डीमॉक्रिटसची नैतिक भूमिका समजून घेणेही महत्त्वाचे आहे. डीमॉक्रिटसच्या मते ‘स्वास्थ्य’ किंवा ‘संतोष’ हे नैतिक आचरणाचे साध्य आहे. इंद्रियसुखे अल्पजीवी असल्यामुळे त्यांच्यामागे न लागता आपल्या इच्छांना व आकाक्षांना आवर घालावा, स्वयंपूर्ण व्हावे व साध्या सुखात समाधान मानावे आणि सतत हसतमुख राहावे, अशी त्याची शिकवण होती. त्याच्या मते माणसाचे सुख हे माणसाजवळ किती संपत्ती आहे यावर अवलंबून नसते, तर ते त्याच्या आत्म्याच्या स्थितीवर अवलंबून असते. मनाची साम्यावस्था, मनःशांती व समतोल यांचे तो गुणगान करतो. मरणोत्तर जीवन किंवा दुष्कृत्यांबद्दल देवांकडून होणारे शासन, ह्या कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या होत्या. आपल्या कृत्यांपासून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन, सचोटीने आणि स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारे जीवन जगावे, ह्यावर त्याचा भर होता. तो लोकशाहीवादी होता. “ज्याप्रमाणे गुलामीपेक्षा स्वातंत्र्य पसंत केले पाहिजे, त्याप्रमाणे हुकूमशाहीतील तथाकथित सुखापेक्षा लोकशाहीतील दारिद्र्य पतकरले पाहिजे”, असे त्याने म्हटले आहे. डीमॉक्रिटसने आयुष्यभर शास्त्रोक्त विचारसरणीचा उपयोग आणि पुढाकार केला आणि म्हणूनच आजही त्याचे नाव अतिशय महत्त्वाच्या ग्रीक तत्त्ववेत्त्यांमध्ये गणले जाते.
संदर्भ :
- Bailey, Cyril, The Greek Atomists and Epicurus, Oxford, 1928.
- Burnet, John, Early Greek Philosophy, London, 1930.
- Diels, Hermann; Trans. Freeman, Kathleen, Ancilla to the Pre-Socratic Philosophers, Oxford, 1947.
- Fuller, B. A. G. A History of Philosophy, Vol. I, New York, 1959.
- Guthrie, W. K. C. A History of Greek Philosophy, 4 Vols. Cambridge, 1962.
- Zeller, Eduward, Outlines of the History of Greek Philosophy, New York, 1931.
- केतकर, द. गो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान पुष्प १ ले, मुंबई, १९३१.
- जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड पहिला, पुणे, १९७५.
समीक्षक : हिमानी चौकर