नागझिरा अभयारण्य

नागझिरा अभयारण्य हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असून जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे. १९७० मध्ये घोषित करण्यात आलेल्या या अभयारण्याचे भौगोलिक स्थान २१.१४.३८ उत्तर व ७९.५९.०९ पूर्व असे आहे. नागझिराचे वन दक्षिण प्रदेशीय उष्ण पानगळीचे असून त्याचे एकूण क्षेत्र १५३ चौ.किमी आहे. नागझिरा हे नाव हत्तीवरून पडले. संस्कृत भाषेत नाग म्हणजे हत्ती. पूर्वी येथे हत्ती भरपूर होते आता फक्त हत्तीची अचल प्रतिकृती येथे पहायला मिळते. तसेच या अभयारण्यात अनेक झरे आहेत म्हणून नागझिरा असे नाव पडले असावे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० किमी. अंतरावरील साकोली गावापासून अंदाजे २२ किमी. अंतरावर नागझिरा अभयारण्य असून दूसरीकडे सुमारे ३० किमी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी ‘पिटेझरी आणि चोखमारा’ अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. येथील नागझिरा तलाव प्रसिद्ध असून तो या अभयारण्साठी अतिशय महत्त्वाचा आहे. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या सुमारे ३४ जाती असून त्यातील वाघ, बिबटे, रानगवे, अस्वल, लांडगे, कोल्हे, रानडुक्कर, रानकुत्रे, मुंगीखाऊ, ताडमांजर, उदमांजर, काळवीट, सांबर, नीलगाय, चितळ, भेकर, पिसोरी हरीण (Mouse deer), लंगूर माकड, उडती खार इत्यादी प्राणी आढळतात. तसेच या अभयारण्यात उभयचर प्राण्यांच्या सुमारे ४ जाती आहेत.

नागझिरा अभयारण्य : वन्यसंपदा.

नागझिरा अभयारण्यात पक्षांच्या सुमारे २०० जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील काही महत्त्वाचे पक्षी — सर्प गरूड, मत्स्य गरूड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल, महाराष्ट्राचे मानचिन्ह हरियाल (हिरवे कबूतर; Pompadour green pigeon), हळद्या, नीलपंखी, स्वर्गिय नर्तक, तिसा किंवा पांढऱ्या डोळ्यांचा बाज इत्यादी. अभयारण्यत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे ३६ जाती आहेत. त्यात अजगर, किंग कोब्रा, नाग, धामण, रसेल व्हायपर, कीलबॅक स्नेक, घोरपड इत्यादींचा समावेश आहे. अभयारण्यात नऊ कूलातील ४९ जातींची फुलपाखरे (उदा., कॉमन रोज, कॉमन मॉरमॉन, लाइम बटरफ्लाय, कॉमन सेलर, कॉमन इंडिअन क्रो, आणि ब्लॅक राजा इत्यादी) पहायला मिळतात.

नागझिऱ्याच्या निम सदाहरित वनात काटेरी वनस्पती, बांबू आणि अनेक प्रकारच्या गवतांचे प्राबल्य असले तरी साग (Tectona grandis) मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. त्याच्याशिवाय तेंदू (Diospyros melanoxylon), धावडा (Anogeissus latifolia), बीजा (Pterocarpus marsupium), ऐन  (Tomentosa), अर्जून (Terminalia arjun), जांभा/येरूळ (Xylia xylocarpus), मोइ/शिमटी (Lannea grandis), सालइ-गुग्गूळ (Boswellia Serrata), हळदू/हेदू (Adina cosdifolia), जांभूळ (Syzygium cumini), कुसुम (Schleichera oleosa), हिरडा (Terminalia chebula ), बेहडा (Terminalia belirica), आवळा (Emblica officinalis), बिबा (Semi carpus anacardium), भुइनिंब (Andrographis paniculata), इंद्रजव किंवा कुटज (Holarrhena antidysentrica), काळाकुडा (Wrightia tinctora), धायटी (Woodfordia fruiticosa),  मुरुडशेंग (Helictresisora), मोह (Madhuca indica) आणि तामण (Lagerstomia parviflora) इत्यादी जातीचे लहान मोठे वृक्ष दिसून येतात.

करू वृक्ष : नेकेड ब्युटी ऑफ फॉरेस्ट

ग्लोरी ऑफ नागझिरा म्हणून ओळखले जाणारे १० फूट व्यास असणारे सागाचे झाड येथे मुद्दाम जतन करून ठेवले आहे. नेकेड ब्युटी ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखले जाणारे करू किंवा भुत्या (Sterculia urens) हे वृक्ष नागझिराच्या वनात जागोजागी पहायला मिळतात. तसेच येथे तोरणवेल (Zizyphus oenoplia), उक्षी (Calycopteris floribunda) पळसवेल (Butea superba), चांबुळी किंवा चामूळ (Bauhinia vahliil), घोटवेल (Smilax macrophyta), शेंबी किंवा शेंब (Acacia pinnata), खाजकुइरी (Mucuna puriens) इत्यादी वेलवर्गीय वनस्पती आढळतात. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. त्याचप्रमाणे अभयारण्यात अनेक गवताचे प्रकार सापडतात; उदा., पवन्या गवत (Schima nervosum),  खसखस गवत (Vetiveria zizyniodes),  तलवार गवत (Imperata cylindrica), काटे गवत (Heteropogon contortus), लव गवत किंवा केनग्रास (Eragrostis tennella), वायर ग्रास (Cynodon dactylon), कंगारू गवत (Themeda quadrivalvia) आणि मुसळ गवत (Seilemalaxum) व फुलेरा किंवा मॉरिशियन ग्रास (Apluda varia) इत्यादी. अभयारण्यात घाणेरीची (Lantana camara) झूडूपे भरपूर असून त्याच्या जोडीला काँग्रेस गवत (Parthenium) हे दोन्ही तण म्हणून वाढलेले दिसते. अभयारण्याच्या बाह्य भागात आणि सुदूर आत बांबूची बने (Dendrocalamus strictus) वाढलेली आहेत. मात्र बाहेरील बांबू विरळ असून आतील खूप घनदाट आहे. या वनस्पती वर्णनावरून हे स्पष्ट होते की, या अभयारण्यात वनस्पतींची विविधता विपुल आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या तसेच औषधी व सुगंधी वनस्पतींच्या सुमारे २०० जाती अभयारण्यात आहेत.

अभरण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक छोटे संग्रहालय व माहिती केंद्र आहे. संग्रहालयात पेंढा भरलेले पक्षी, काही प्राण्याच्या प्रतिकृती व फूलपाखरे यांचे प्रदर्शन आहे. त्याचबरोबर वन्यजीवनावरील काही छायाचित्रे, प्राण्यांच्या पायांचे व खुरांचे ठसे यांचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील ठशांचे प्रदर्शन आहे. माहिती केंद्रात वन्यजीवावरील चित्रपट/काही पारदर्शिका (स्लाईड्स) दाखविण्यात येतात.

अभयारण्यात कोठेही वीज नाही. नैसर्गिक अवस्थेत नैसर्गिक प्रकाशात वन्यजीव पहायला मिळावे हा त्यामागील हेतू आहे. अभयारण्याला भेट देण्याचा काळ ऑक्टोबर–जून आणि एप्रिल–मे असून वेळ सकाळी ६ ते दूपारी १२ वाजेपर्यंत आणि दूपारी ३ ते ६ वाजेपर्यंत आहे. खाजगी वाहनातून अभयारण्यात जाण्याची परवानगी मिळते. त्यासाठी मार्गदर्शक (गाईड) तसेच चालक मिळण्याची सोय आहे. जंगलसफारीसाठी खाजगी वाहनांबरोबरच वनविभागाच्या मिनी बसेस आणि इतर वाहने उपलब्ध आहेत. येथे विश्रामगृह व वसतिगृह उपलब्ध आहेत.

नवीन नागझिरा अभयारण्य : नागझिरा अभयारण्याच्या या नव्या वाढीव क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी यातील काही भाग, तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा काही भाग यांचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ १५१.३३५ चौ.किमी. आहे. नागझिरा व नवीन नागझिरा अभयारण्यांच्या क्षेत्रात ५९ गावे आहेत. या अभयारण्यात चांदी अस्वल आढळते. हे या अभयारण्याचे खास वैशिष्ट्य आहे. अभयारण्याच्या क्षेत्रात १२ तलाव आहेत. तसेच येथील चांदीटिब्बा हे ठिकाण विदर्भातील कळसूबाईचे शिखर म्हणून प्रसिद्ध आहे. याची  समूद्रसपाटीपासून उंची ४९४ मी. आहे. वन्यजीव विभागाच्या कक्ष क्रमांक १४६ मधील या शिखराचा ‘फायर स्टेशन’ म्हणून उपयोग करण्यात येत आहे. वन्य जीवांच्या संवर्धनासाठी येथील वातावरण अत्यंत पोषक असल्याने नवीन नागझिरा अभयारण्यात पर्यटनासाठी मोठा वाव आहे.

पहा : नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Nagzira

समीक्षक : जयकुमार मगर