जायकवाडी धरण (नाथसागर)

जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील पाणपक्ष्यांचे सर्वांत मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडी अभयारण्य ओळखले जाते. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर व पैठण तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव व नेवासे तालुक्यातील ११८ गावांमधील ३४,१०५ हेक्टर जमीन नाथसागर जलाशयासाठी (जायकवाडी धरणासाठी) संपादित करण्यात आली आहे. नाथसागर धरण जायकवाडी पक्षी अभयारण्याचा व प्रकल्पाचा मुख्य भाग आहे. नाथसागर जलाशयाचा विस्तार ५५ किमी. लांब आणि २७ किमी. रुंद आहे. १० ऑक्टोबर १९८६ रोजी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. अभयारण्याचे भौगोलिक स्थान १९ २९’ ८” उत्तर आणि ७५ २२’ १२” पूर्व असे आहे.

कृष्णक्रौंच पक्षी

जायकवाडी जलाशयात माशांच्या ५० पेक्षा अधिक जाती आढळतात. पाणपक्ष्यांना प्रिय असणारी दलदल, शैवाल, पानवनस्पती, छोटे मासे, कीटक या खाद्यपदार्थांची आणि वैविध्यपूर्ण जलीय अधिवासाची विपुलता यामुळे नाथसागराकडे देशी-विदेशी पक्षी आकर्षित होतात. या जलाशयाच्या परिसरात सुमारे २०० स्थानिक आणि सुमारे ७० स्थलांतरीत विविध जातींचे पक्षी आढळतात.

जायकवाडी जलाशयावर रोहित, मत्स्य गरूड (Sea eagle), रंगीत करकोचा (Painted stork), लालसरीबदक, फापड्या बदक, कृष्णक्रौंच, तुतारी, तुतवार, पाणलावा, बदक व गरुडांचे प्रकार, माळभिंगरी, कमळ नीलकमळ, विविध सुरय जातींचे पक्षी, हळद कुंकू बदक, पाणकावळे, ब्राह्मणी घार, वारकरी बदक, पाणकोंबड्या, शिरवा हे स्थानिक पक्षी त्याशिवाय स्वर्गीय नर्तक, कवड्या नर्तक, राखी बदक, काळा शेराटी (Black ibis), पांढरा शेराटी (Black headed ibis), पाणडुबा, वंचक, जांभळा, बगळा, कठेरी, चिलावा, मुग्धबलाक, रंगीत चमचा, सागरी घार, करकोचे, गरुड, मैना, पोपट, दयाळ, खाटिक, कोकिळ, शिंपी, सुतार, तांबट, चंडोल, खंड्या, धीवर, चक्रवाक, ससाना, चातक, पावशा, सावमार, घुबड, भारद्वाज, सातभाई, सुर्यपक्षी यांसारखे अनेक पक्षी पहायला मिळतात.

रोहित पक्षी

ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान जायकवाडी जलाशयावर ऑस्ट्रिया, सायबीरिया, नेपाळ, रशिया, चीन, तिबेट आणि दक्षिण आफ्रिका अशा विविध भागांतून रोहित पक्षी (Flamingo), दर्वीमुख-चमचा (Spoonbill), चित्रबलाक (Pointed stork), रात्र वंचक (Night heron), पांढरा करकोचा (White stork), धोबी/परीट (Wagtail), तलवार बदक (Pintail), थापट्या बदक (Shoveler), तुतारी (Sandpiper) इत्यादी विविध जातींचे स्थलांतरीत पक्षी येतात. त्याचप्रमाणे लडाख, उत्तराखंड आणि दक्षिणेकडील राज्यांतूनही  येथे अनेक पक्षी येथे येतात.

जायकवाडी जलाशय क्षेत्रात झाड झाडोरा कमी असला तरी जलाशयाच्या बाहेरच्या बाजूने लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, वड, शिसम, ऊंबर सुबाभूळ, आमलतास, चंदन यांसारखे वृक्ष आहेत. तसेच इथे सुमारे ३७ सपुष्प जातींच्या वनस्पती आढळतात.

नोव्हेंबर ते मार्च हा जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. जलाशयाशेजारी पाटबंधारे विभागाची सागर दर्शन आणि नाथसागर विश्रामगृहे आहेत.

सदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Jayakwadi_Bird_Sanctuary
  • https://www.indianholiday.com/wildlife-india/bird-sanctuaries-in-india/jayakwadi-bird-sanctuary.html

समीक्षक : जयकुमार मगर