वोर्से, जेन्स जेकब अस्मुसेन : (१४ मार्च १८२१–१५ ऑगस्ट १८८५). एकोणिसाव्या शतकात वैज्ञानिक आधारावर पुरातत्त्वशास्त्राची पायाभरणी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे डॅनिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म रोजी डेन्मार्कमधील वेले (Vejle) येथे झाला. वोर्से यांना लहानपणापासून पुरातन वास्तू आणि पुरातत्त्वीय अवशेषांमध्ये रस होता. लहानवयातच त्यांनी डेन्मार्कमधील अनेक दगडी दफनांची निरीक्षणे केली होती. पूर्वी जरी या धार्मिक कामासाठीच्या वेदी आहेत, असे मानले जात असले तरी ही प्रत्यक्षात थडगी असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यांचे काम बघून शाळेत शिकत असतानाच त्यांना बायगोम (Bygholm) येथील उत्खननात भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते (१८३५).

वोर्से यांनी कोपनहेगन विद्यापीठातून पदवी मिळवली (१८४१). शिक्षण घेत असताना त्यांनी कोपनहेगनमधील डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे अभिरक्षक व पहिले संचालक ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन यांच्या हाताखाली स्वयंसेवक म्हणून काम केले (१८३८-४३). या दरम्यान त्यांनी प्रिमिव्हल अँटिक्विटिज ऑफ डेन्मार्क हे पुस्तक प्रकाशित केले (१८४३). हा प्रागितिहास या विषयातला एकोणिसाव्या शतकातला अत्यंत प्रभावशाली ग्रंथ मानला जातो. त्यानंतर डेन्मार्कचा राजा ख्रिश्चन आठवा याच्या पाठिंब्यामुळे विविध पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी वोर्से स्वीडन, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंडला गेले. १८४७ मध्ये त्यांची डॅनिश ऐतिहासिक आणि प्रागैतिहासिक वारसास्थळांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

वोर्से यांनी १८४६-४७ या काळात आयर्लंडसह ब्रिटिश प्रदेशांना भेट दिली. व्हायकिंग काळातील पुरावशेष आणि स्कँडिनेव्हियन वारसास्थळांचा अभ्यास करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या संशोधनावर आधारित असलेले रिमिनसेन्स ऑफ डेन्स अँड नॉर्वेजियन्स इन इंग्लंड, स्कॉटलंड अँड आयर्लंड हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले (१८५१). याच संशोधनातून त्यांनी यूरोपातील व्हायकिंग युग (Viking Age) ही संकल्पना मांडली.

निरीक्षकपदावर असताना वोर्से यांनी अनेक मानवी वसाहतींचा (किचन मेडन्स) शोध लावला (१८५१). या अवशेषांमुळे त्यांना डेन्मार्कमध्ये प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती असल्याचे सिद्ध करता आले व थॉमसन यांच्या त्रियुग सिद्धांतातील अश्मयुग (Stone Age) या संकल्पनेला बळकटी मिळाली. तसेच यूरोपातील विस्तृत क्षेत्रीय निरीक्षणांमुळे थॉमसननी तयार केलेली त्रियुग प्रणाली (अश्मयुग, कांस्ययुग आणि लोहयुग) योग्य असल्याची त्यांची खातरी पटली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस वोर्से यांच्या उच्च प्रतीच्या वैज्ञानिक कामामुळे थॉमसन यांच्या त्रियुग प्रणालीला पुरातत्त्वविद्येत सार्वत्रिक मान्यता मिळाली. पुढे ऑस्कर माँटेलिअस (१८४३–१९२१) या आधुनिक स्विडिश पुरातत्त्वज्ञांनी या प्रणालीचा विकास केला.

वोर्से यांची कोपनहेगन विद्यापीठात प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली (१८५५) आणि ते सी.जे. थॉमसन यांच्या जागी डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे अभिरक्षक झाले (१८६५). वोर्से यांनी पुरातत्त्वात वैज्ञानिक पद्धती वापरण्याचा आग्रह धरला. केवळ पुरावशेष गोळा करून त्यांची वर्गवारी करणे हे आवश्यक नाही, तर हे पुरावशेष कोणत्या स्तरांमधून व कोणत्या भौगोलिक संदर्भात प्राप्त झाले आहेत हे बघणे जास्त महत्त्वाचे आहे, असे त्यांचे प्रतिपादन असे. त्यांनी त्यांच्या संशोधनात जी वैज्ञानिक व व्यावसायिक दृष्टी दाखवली ती काळाच्या पुढे पाहणारी होती. मानवाची सांस्कृतिक प्रगती ही केवळ लिखित ऐतिहासिक साधने व कलाकृतींच्या आधारावर अभ्यासता येणार नाही, तर ती पुरातत्त्वीय स्थळांवर प्रागितिहास कालखंडापासून मिळणाऱ्या विविध पुरावशेषांच्या सखोल व स्तरबद्ध अभ्यासानेच कळू शकेल, असे त्यांनी वारंवार लिहिले आहे. विशेषतः थडग्यांमध्ये सापडलेल्या वस्तू त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी वापरात असलेल्या होत्या. हे त्यांचे निरीक्षण आता सरळसाधे वाटले, तरी पुरातत्त्वविद्येच्या त्या टप्प्यावर ते अतिशय महत्त्वाचे होते. दफनांच्या कालनिश्चितीची ही पद्धत ‘वोर्सेचा नियमʼ (Worsaae’s Law) म्हणूनही ओळखली जाते.

जगभरातील मानवजातीच्या प्रसाराबद्दलच्या चर्चेत वोर्से यांचे योगदान होते. प्रागैतिहासिक काळात लोक आफ्रिकेतून, आशियामार्गे, बेरिंग सामुद्रधुनी ओलांडून अमेरिकेपर्यंत आणि दक्षिण अमेरिका ते ऑस्ट्रेलियापर्यंत पसरले असावेत, असे त्यांनी सूचवले. त्यांनी असेही मत मांडले की, स्कँडिनेव्हियात मानवजातीचा प्रसार सर्वांत शेवटी झाला. जरी त्यांच्या सर्व कल्पना स्वीकारल्या गेल्या नसल्या तरी, त्यांच्या कार्यामुळे पुरातत्त्वविद्येतील व्यावसायिकतेचा स्तर उंचावला. वोर्से यूरोपातील पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानाचे (Archaeobotany) प्रणेते होते. त्यांनी अनेक ठिकाणांहून वनस्पती जीवाश्मांचे नमूने काळजीपूर्वक गोळा केले होते. त्यांचा प्रागितिहासातील पुराव्यांचा अर्थ लावण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो, याची त्यांना कल्पना होती.

कोपनहेगन (डेन्मार्क) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Kelley, Donald R. ‘The Rise of Prehistoryʼ, Journal of World History, 14 (1), 2003.
  • Romer, John & Romer, Elizabeth, The History of Archaeology, Checkmark Books, New York, 2001.
  • Rowley-Conwy, Peter, ‘The Concept of Prehistory and the Invention of the Terms Prehistoric and Prehistorian: the Scandinavian Origin, 1833–1850ʼ, European Journal of Archaeology, 9 (1): 103–130, 2006.
  • Worsaae, Jens Jacob Asmussen, The industrial arts of Denmark: from the earliest times to the Danish conquest of England, Covent Garden: Chapman and Hall, 1882.

                                                                                                                                                                                 समीक्षक : जयेंद्र जोगळेकर