लेरॉ-गुर्हान, आंद्रे : (२५ ऑगस्ट १९११ – १९ फेब्रुवारी १९८६). आंद्रे लेऑ-गुह्हा.  विसाव्या शतकातील महत्त्वाच्या प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञांपैकी एक. पुरातत्त्वीय सिद्धांत आणि शैलचित्रांच्या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला. अगदी बालपणीच ते अनाथ झाले. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आईच्या आईवडिलांनी केले. आजी-आजोबा त्यांना पॅरिसमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये अनेकदा नेत असल्याने लहानवयातच त्यांना निसर्गविज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण झाले; परंतु अभ्यासात मन न लागल्याने वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी शाळा सोडून दिली आणि व्यापारी व्हायचे ठरवले. दरम्यान त्यांना चांगले मार्गदर्शन लाभल्याने पुढे ते परत शिक्षणाकडे वळले.

लेरॉ-गुर्हान यांनी मार्सेल मॉस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पॅसिफिक प्रदेशातील पुरातत्त्वीय अवशेषांच्या विषयावर डॉक्टरेट पूर्ण केली. त्यानंतर १९३३ पासून त्यांनी ब्रिटिश म्युझियम आणि पॅरिसमधील मुझे द लोम (Musée de l’Homme) या संग्रहालयांमध्ये विविध पदांवर काम केले. १९४० ते १९४४ या काळात त्यांनी पॅरिसमधील मुझे गिमे (Musée Guimet) या संग्रहालयामध्ये काम केले. १९४४ मध्ये त्यांना लूव्ह संग्रहालयातून (Louvre) पाठवलेल्या कलाकृतींची जबाबदारी घेण्यासाठी शटू द वलॉन्से (Château de Valençay) येथे पाठवण्यात आले.

दुसऱ्या महायुद्वाच्या काळात लेरॉ-गुर्हान यांनी नाझींविरुद्ध फ्रेंच प्रतिकार चळवळीत भाग घेतला होता.  त्यासाठी त्यांना मेडेल द ला रेझिस्टान्स आणि मिलिटरी क्रॉस (Croix de guerre) हे सन्मान मिळाले.

लेरॉ-गुर्हान सॉबॉन (Sorbonne) विद्यापीठात प्राध्यापक झाले (१९५६). कॉलेज डी फ्रान्समध्ये ते प्राध्यापक पदावर कार्यरत होते (१९६९-१९६२). १९७३ मध्ये सीएनआरएस (CNRS- Centre National de la Recherche Scientifique) या वैज्ञानिक संशोधनासाठीच्या राष्ट्रीय संस्थेने सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला.

लेरॉ-गुर्हान यांनी त्यांच्या L’Homme et la matière (१९४३) या पुस्तकात मानवांमधील सार्वत्रिक तांत्रिक प्रवृत्ती आणि वांशिक गटातील विशिष्ट प्रवृत्ती यांच्यामधील संबंधांची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, मानवी समूह एखाद्या सजीव प्राण्याप्रमाणे वागतो. हा समूह बाह्य अवकाशाशी संबंध ठेवताना त्याच्या अंतर्गत अवकाशातील तांत्रिक क्षमतेचा उपयोग करून घेतो आणि त्यामुळे सातत्याने प्रगती होते. एखाद्या विशिष्ट मानवसमूहातील तांत्रिक प्रवृत्तींचे एकत्रीकरण होणे, याला त्यांनी तांत्रिक तथ्य असे नाव दिले.

लेरॉ-गुर्हान यांच्या मानवी उत्क्रांतीबद्दलच्या प्रतिपादनात मध्यवर्ती मुद्दा असा आहे की, मानव द्विपाद झाल्यामुळे वस्तू पकडण्यासाठी हात मोकळे झाले आणि चेहरा हावभाव करणे व बोलण्यासाठी उपलब्ध झाला. अशा प्रकारे मेंदूमधील कॉर्टेक्स हा भाग, तंत्रज्ञान वापराची क्षमता आणि भाषेचा विकास या सर्व गोष्टी दोन पायांवर चालण्याच्या बदलामुळे शक्य झाल्या. मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात भाष्य करताना लेरॉ-गुर्हान यांनी मानवीकरण (humanization) अशी संज्ञा वापरली. पुरापुराश्मयुगातील मानवांपासून मध्य पुराश्मयुगीन मानव आणि नंतर उत्तर पुराश्मयुगीन संस्कृतीमधील आधुनिक मानव यांच्या विकासाचे टप्पे आणि कला याबद्दल त्यांनी विस्तृत विवेचन केले.

लेरॉ-गुर्हान यांचे Le Geste et la parole (Gesture and Speech) हे सर्वोत्तम पुस्तक असल्याचे मानले जाते (१९६४). त्यात त्यांच्या मानवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, तंत्रज्ञान आणि प्रागैतिहासिक कला या विविध क्षेत्रांमधील तीस वर्षांपेक्षा जास्त संशोधनाचे संश्लेषण आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी मानवाच्या आपली मुळे शोधण्याच्या प्रदीर्घ प्रवासाच्या संदर्भात प्रागितिहासाच्या स्थानाची चर्चा केली आहे. आपण कोण आहोत आणि आपली उत्पत्ती कशी झाली या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयासांमध्ये उत्पत्तीसंबंधी मिथकांचे (Origin myths) स्थान महत्त्वाचेच असून प्रागितिहास शाखेचा विकास तुलनेने अलीकडचा आहे. एक प्रकारे हा प्राचीन कुतूहलाचा आधुनिक व वस्तुनिष्ठ अवतार, आहे असे त्यांचे मत होते. म्हणूनच एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात एक शाखा म्हणून प्रागैतिहासिक पुरातत्त्वाचा उगम होण्याआधी मध्ययुगात मानवाची आपल्या अस्तित्वाकडे बघण्याची काय भूमिका होती, याचे विवेचन त्यांनी केले आहे.

लेरॉ-गुर्हान यांच्या मानवशास्त्रीय संशोधनात लास्को गुहांना (Lascaux Caves) एक महत्त्वाचे स्थान होते. दक्षिण फ्रान्समधील डोर्डोन भागात असलेल्या या गुहांमधील अश्मयुगीन चित्रांचे त्यांनी सखोल विश्लेषण केले. या गुहांमधील प्राणी प्रजातींच्या चित्रांचे तेथील अवकाशातील संदर्भ पाहून त्यांनी असा सिद्धांत मांडला की, अश्मयुगीन मानवांनी गुहेतील जागेचा विशिष्ट प्रतीकांसाठी जाणीवपूर्वक वापर केला होता. यासाठी त्यांनी रानबैल (Bison) व घोडे यांच्या चित्रातील मादी व नर यांच्यातील फरकावर लक्ष केंद्रित केले होते. तसेच त्यांनी या अभ्यासातून ऑरिग्नेसियन (Aurignacian) ते मॅग्डलिनियन (Magdalenian) अशा यूरोपातील उत्तर पुराश्मयुगीन संस्कृतींमधील सलग चार चित्रशैलींमधील उत्क्रांतीची व्याख्या त्यांनी केली. त्यांनी त्यांच्या Préhistoire de l’art occidental (१९६५) या पुस्तकात गुहांमधील प्रतीके व चिन्हांचा अर्थ समजून घेण्यासाठीचे स्पष्टीकरणात्मक प्रारूप दिले आहे.

विख्यात फ्रेंच तत्त्ववेत्ता जाक डेरिडा (१९३०–२००४) यांनी  Of Grammatology (१९७४) या पुस्तकात लेरॉ-गुर्हान यांच्या अनेक संकल्पनांचा भरपूर उपयोग केला आहे. डेरिडा यांच्या तत्त्वज्ञानातील योगदानात ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जाते. फ्रेंच तत्त्वज्ञ जिल डिल्यूज (१९२५–१९९५) आणि मानसशास्त्रज्ञ फिलिक्स गुटारी यांच्या (१९३०–१९९२) यांच्या भांडवलशाही आणि स्किझोफ्रेनिया या दोन खंडांमधील पुस्तकात लेरॉ-गुर्हान यांचा वारंवार संदर्भ दिला आहे.

पॅरिस येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Audouze, Françoise, ‘Leroi-Gourhan, Philosopher of Technique and Evolutionʼ, Journal of Archaeological Research, 10(4): 277-306, https://www.jstor.org/stable/41053189, 2002.
  • Johnson, Christopher, ‘Leroi-Gourhan and The Limits Of The Humanʼ, French Studies, LXV (4): 471–487, doi:10.1093/fs/knr134, 2011.
  • https://www.cnrs.fr/fr/personne/andre-leroi-gourhan
  • https://archeologie.culture.fr/lascaux/en/andre-leroi-gourhan-1911-1986

                                                                                                                                                                                   समीक्षक : जयेंद्र जोगळेकर