मुकर्जी, आशुतोष : (२९ जून १८६४–२५ मे १९२४). प्रसिद्ध भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. चौदाव्या वर्षी शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे पूर्ण केले. विसाव्या वर्षी बी. ए. परीक्षेत सर्वप्रथम, एम. ए. परीक्षेत गणित विषयात प्रथमश्रेणीत प्रथम तसेच, चोवीसाव्या वर्षी बी. एल. ही पदवी मिळवून ते तीन वर्षे टागोर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. लॉ ऑफ परपेच्युइटीज हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. पाली, फ्रेंच, रशियन इत्यादी भाषाही त्यांना अवगत होत्या.

आशुतोष हे राजकारणापासून अलिप्त होते; मात्र १८९९ मध्ये बंगाल विधान परिषदेत त्यांची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. ते १९०४ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायधीश होते. त्यानंतर १९२० मध्ये मुख्य न्यायाधीश झाले. ते शिक्षणप्रिय असल्याने त्यांनी महाराज दरभंगा, सर तारकनाथ पालित, रास बिहारी घोष यांच्याकडून निधी मिळवून कलकत्ता विश्वविद्यालयात ग्रंथालय, प्रयोगशाळा असलेले विज्ञान विद्यालयांची स्थापना केली.

आशुतोष यांना अष्टपैलू बुद्धिमत्तेचे लेणे लाभले होते. त्यांनी गणित विषयात संशोधन केले. या विषयातील संशोधनात अंतर्भूत असलेल्या प्रमेयांचा केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला होता. उत्तम अध्यापक, वकील, वादविवादपटू व न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता. त्याचप्रमाणे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मार्च १९१९ मध्ये सॅडलर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाशी संबंधित असलेल्या सहा सदस्यांपैकी ते एक होते. ते १९०४–१९१८ आणि १९२१–१९२३ या काळात कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. या काळात कलकत्ता विद्यापीठाला प्राचीन नालंदा विद्यापीठासारखे स्वरूप देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. प्रौढ शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी बहुमोल कार्य केले. ब्रिटिश सरकारने त्यांना १९०७ मध्ये C. S. I. व १९११ मध्ये ‘Knight’ ह्या पदव्या देऊन त्यांचा गौरव केला.

आशुतोष यांचे पाटणा येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा