महाराष्ट्रातील एक प्राचीन हिंदू लेणी-समूह. लातूरपासून सु. ४५ किमी. अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यांपैकी एक जैन लेणे वगळता सर्व हिंदू लेणी आहेत. सर्वप्रथम जेम्स बर्जेस या स्कॉटिश अधिकाऱ्याने या लेण्यांकडे विद्वानांचे लक्ष वेधले. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध झाली. डोंगरमाथ्यावर नंतरच्या काळातील रेणुका मातेचे मंदिर, तसेच एक दर्गा आहे. कल्पसमूह या मराठी ग्रंथात रसविद्येला उपकारक ठरणाऱ्या स्थानांमध्ये ‘खरोसा’ या स्थानाचा एक संदर्भ सापडतो. या लेणी समूहात ‘महादेव’ आणि ‘लकोला’ नावाची लेणी वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणी दुय्यम प्रकारची आहेत.

दुमजली लेणे, खरोसा.

खरोसा जवळील डोंगराच्या दक्षिणेकडील टोकाला ४५ फुट रुंदीचे एक भग्न लेणे आहे. त्याचे संपूर्ण छत आणि समोरचा भाग कोसळलेला आहे. या लेण्याजवळ असेच आणखी एक भग्न लेणे आहे. उत्तरेला क्रमशः छोटेसे शिखर असलेले एकाश्म मंदिर व १२ x ६ फुटाची एक ओबडधोबड खोली आहे. पुढे आणखी एक लहान एकाश्म मंदिर दिसते. यानंतर उत्तरेलाच पुढे काही अंतरावर या लेणी समूहातील मुख्य लेणी दिसतात. यांपैकी पहिल्या लेण्याचा आकार (११ ते १५ फूट रुंद व १३.२ ते १४.८ लांब) ओबडधोबड असून याच्या पाठीमागे एक देवताविरहित गर्भगृह आहे; तथापि हे लेणे कोणत्या पंथाचे आहे, हे सांगता येत नाही. या लेण्याच्या वरच्या बाजूला एक एकाश्म मंदिर आहे.

मुख्य लेण्यांतील दुसरे ओबडधोबड असलेले लेणे हे समोरच्या बाजूने २३ फूट व मागच्या बाजूला २५.८ फूट रुंद आहे. याची लांबी १६.५ फूट असून उत्तरेकडील भिंतीत एक ओबडधोबड खोली असून, दक्षिणेकडील बाजूसही खोली खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मागे मध्यभागी जिनाची किंवा तीर्थंकराची ६.१० फूट उंचीची बैठी मूर्ती कोरण्यात आलेली आहे. अलीकडच्या काळात ही मूर्ती गौतम बुद्धांच्या मूर्तीत रूपांतरित केली आहे. लेण्यासमोर एका खंडित स्तंभाचे अवशेष दिसून येतात. या लेण्यानंतर खडकात खोदकाम केलेले इतर काही अवशेष दिसतात.

लकोला लेणे, खरोसा.

यानंतर ७० फूट रुंद व ५० फूट लांब असे एक विशाल दुमजली लेणे आहे. या लेण्याची विभागणी दोन भागांत केलेली आहे. उत्तरेकडील भागात समोरच एक उंच खंडित अष्टकोनी स्तंभ आहे. या स्तंभापुढे तळमजल्यात १६ चौकोनाकृती स्तंभयुक्त मंडप असून, पाठीमागे आयताकार खोलीवजा गर्भगृहात विष्णू, महेश आणि ब्रह्मा यांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. तळमजल्याच्या दक्षिणेकडील मंडपात पोहोचण्यासाठी सात पायऱ्या आहेत. त्यात काही खंडित स्तंभ असून पाठीमागे गर्भगृहात संभवतः ब्रह्मा, विष्णू व महेशाची शिल्पे कोरण्यात आलेली दिसतात. या संपूर्ण लेण्याच्या दोन्ही टोकाला बाहेरून तसेच मध्यभागी लिंगयुक्त गर्भगृह आहेत.

वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उत्तरेकडील भागात एक जीना आहे. वर गेल्यानंतर सहा स्तंभ  असलेला मंडप असून मागे द्वारपालयुक्त आणखी चार स्तंभ आहेत. मागच्या स्तंभांच्या मध्ये ४ फूट व्यासाचे विशाल शिवलिंग आहे. दक्षिणेकडील मंडपात आठ स्तंभ असून, मागे प्रदक्षिणापथयुक्त गर्भगृहात ५.५ फूट उंचीचे ब्रह्मा, विष्णू व महेश कोरण्यात आलेले आहेत. या लेण्याच्या उत्तरेकडील पार्श्व भागावरही काही शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.

दुमजली लेण्याच्या उत्तरेला चिकटून पुढचे लेणे खोदलेले आहे. हे उंचवट्यावर असून यात गर्भगृहयुक्त लहान-लहान खोल्या आहेत. यांमध्ये गणेश, विष्णू, शिव इ. शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेण्याच्या वर काही खोदकाम असून, उत्तरेला एकाश्म मंदिर आहे.

महादेव लेणी : दुमजली लेण्याच्या उत्तरेला काही अंतरावर सु. ६० फूट रुंद व ६९ फूट लांब ‘महादेव’ नावाचे लेणे आहे. या लेण्याचा पार्श्वभाग ४३.५. फूट असून समोर एक खुजा कठडा आहे. मंडपात समोरचे चार स्तंभ पकडून एकूण २६ स्तंभ आहेत. प्रदक्षिणापथयुक्त गर्भगृह सु. १६ फूट x ११ फुटाचे असून उंचीला ८ फूट आहे. गर्भगृह सर्वतोभद्र असून आत वेदीवर एक विशाल शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या मुख्य द्वारावर दोन द्वारपाल असून दोन्ही बाजूंना दोन नाग कोरलेले आहेत. लेण्याच्या दोन्ही भिंतींवर अनेक पौराणिक शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत, परंतु दगड ठिसूळ असल्या कारणाने बरीचशी शिल्पे पुसट दिसतात. दक्षिणेकडील भिंतीवर सामान्यतः वैष्णव तर, उत्तरेकडील भिंतीवर शैव शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या शिल्पांवर पूर्वी गिलावा केलेल्या खुणा दिसतात. दक्षिणेकडील भिंतीवर मुख्यतः मल्ल, नागदेवता तसेच विष्णू अवतारांपैकी वराह, वामन, नरसिंह, कृष्ण, राम इ. अवतार आहेत. उत्तरेकडील भिंतीवर रावणानुग्रह मूर्ती, शिव-पार्वती, तांडवनृत्य, भैरव इ. शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. याशिवाय लेण्यात समुद्रमंथन शिल्पपट, संभवतः कार्तिकेय, द्वारपाल व इतर शिल्पे कोरलेली दिसतात. महादेव लेण्याच्या थोडेसे उत्तरेला एक खोली अर्धवट खोदलेली आहे.

यानंतर ‘लकोला’ नावाचे लेणे आहे. या लेण्यात पायऱ्या चढून गेल्यानंतर चार स्तंभ लागतात. त्यानंतर मंडपात एकूण २४ स्तंभ आहेत. हे लेणे ४१ ते ४९ फूट रुंद असून सु. ५८ फूट लांब आहे. दक्षिणेकडील खोलीत पाठीमागे गणपती शिल्पासह स्त्री-पुरुषांच्या नृत्यमुद्रेतील प्रतिमा आहेत. गर्भगृहात विष्णूची ६ फूट उंच चतुर्भुज मूर्ती आहे.

या लेण्याच्या उत्तर बाजूकडून पुढच्या लेण्यात उतरता येते. यात चार स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. हे लेणे २१ फूट रुंद व २३ फूट लांब असून मागे एक गर्भगृह आहे. या लेण्यावर दोन खोल्या खोदलेल्या आहेत. यांपैकी एकात गणेश शिल्प आहे. यानंतर एक विशाल परंतु खडक कोसळल्याने भग्न झालेले लेणे आहे.

वरील लेण्याच्या उत्तरेला एक लेणे असून, मंडपात दोन अष्टकोनी स्तंभ दिसतात. मंडप १७ फूट रुंद व २३ फूट लांब आहे. प्रदक्षिणापथयुक्त गर्भगृहात विष्णू मूर्ती कोरण्यात आलेली आहे. यापुढे उत्तरेला एका उतारावर एक खोली खोदण्यात आलेली आहे. त्यानंतर गर्भगृहयुक्त दोन साधारण लेणी व एक स्वतंत्र परंतु भग्न एकाश्म मंदिर दिसते. पुढे २५.५ ते ४३.५ फूट रुंद, ३०.५ फूट लांब व ८.६ फूट उंचीचे एक लेणे आहे. सध्या या लेण्याच्या गर्भगृहात नवीन शिवलिंग स्थापिले आहे. उत्तरेला दोन खोल्या असून त्यांत गणेश व महिषासुरमर्दिनीची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. समोरील भागात सात-आठ भग्न एकाश्म मंदिरे दिसतात. बर्जेस यांच्या मते, पुढे उत्तरेला लकोलाचे ८.९ फूट उंच व उजव्या हातात लगुड असलेले शिल्प आहे. या व्यतिरिक्त खरोसा येथे काही एकाश्म मंदिरे दिसतात.

‘लकोला’ लेण्याचा तलविन्यास व सामान्य वैशिष्ट्ये पाहता हे लेणे बदामी येथील तीन हिंदू लेण्यांसारखेच आहे. त्यामुळे जेम्स फर्गसन व बर्जेस यांनी या लेण्याचा कालखंड सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा येथील लेणी सु. इ. स. ५०० ते ७०० दरम्यान खोदण्यात आली. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. विराज शाह यांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे सु. ८-९ व्या शतकात खोदण्यात आले असावे. खरोसा येथील लेणीसंभार पाहून पूर्वमध्ययुगात असलेले खरोसा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच शैव-वैष्णव पंथीयांच्या एकत्र साधनापद्धतीची प्रचीती येते.

संदर्भ :

  • Burgess, James, Report on the Antiquities in the Bidar and Aurangabad Districts, Vol.III, London, 1878.
  • Fergusson, James & Burgess, James, The Cave Temples of India, (Reprint), Delhi, 1969.
  • Shah, Viraj. Jaina Rock-Cut Caves in Western India, Delhi, 2008.

                                                                                                                                                               समीक्षक : मंजिरी भालेराव