गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात गुन्हेगारांच्या वसाहतींचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून विशेष अभ्यास केला जातो. सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत यूरोपीय देश जगभरात अनेक ठिकाणी आपल्या देशातील गुन्हेगारांना मुद्दाम विशिष्ट प्रकारे बांधलेले किल्ले, कारागृहे, बंदिछावण्या व गुन्हेगारांच्या विशिष्ट वसाहती यांच्यामध्ये डांबून ठेवत. गुन्हेगारांच्या वसाहतींच्या पुरातत्त्वात अशा स्थळांचा आणि तेथील पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास केला जातो. अभ्यासाची व्याप्ती यामधील फक्त कारागृहे एवढ्यापुरतीच असेल तर त्याला कारागृहांचे पुरातत्त्व (Prison Archaeology) अथवा तुरुंगवासाचे पुरातत्त्व (Archaeology of Imprisonment) असे म्हटले जाते.

कॅप्टन ड्रेफस याची झोपडी, डेव्हिल्स आयलंड.

पोर्तुगीजांनी १४१५ मध्ये उत्तर आफ्रिकेत सेउटा (Ceuta) येथे वसाहत स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या देशातील गुन्हेगार कैद्यांना हद्दपार केले. तेव्हापासून ते विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना हद्दपार करून वेगळ्या वसाहतीत ठेवण्याची पद्धत अस्तित्वात होती. पाचशे वर्षांच्या काळात पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड, ब्रिटन, रशिया, चीन आणि जपान या अनेक देशांनी लक्षावधी कैद्यांची देशाबाहेर हकालपट्टी केली. यामध्ये तिहेरी फायद्याचा विचार होता. गुन्हेगारांची हकालपट्टी केल्याने त्यांच्यापासून इतर समाजाला असणारा धोका कमी होत असे,  मायदेशातल्या तुरुंगात ठेवताना त्यांच्यावर करावा लागणारा खर्च वाचत असे आणि अशा गुन्हेगारांकडून सक्तमजुरीने काम करून घेऊन वसाहतींचा ’विकास’ करता येत असे. यूरोपीय सत्तांनी गुन्हेगारांच्या श्रमांचा उपयोग कसा करून घेतला, गुन्हेगारांच्या वसाहतींचा साम्राज्यांच्या वाढीला कसा फायदा झाला आणि एकूणच शिक्षेच्या संकल्पनेत कसे बदल घडत गेले यांचे विश्लेषण विख्यात तत्त्वज्ञ मिशेल फुको (१९२६ — १९८४) यांनी त्यांच्या डिसिप्लिन अँड पनीश (१९७७) या पुस्तकात केले आहे.  गुन्हेगारांना देशाबाहेर काढल्यामुळे सर्वप्रकारे समाजाचा फायदा होतो हे सहज समाजमान्य होत असल्याने त्याबाबत शिष्टसमाजात फार कमी टीका होत असे. त्यामुळेच या पद्धतीत गुन्हेगारांना माणूस म्हणून वागवण्याची फारशी गरज नाही अशीच समजूत होती. म्हणूनच ’एक मेला तर दुसरा आणा’ अशी सर्वसाधारण विचारसरणी गुन्हेगारांच्या वसाहती स्थापन करताना प्रचलित होती.

पोर्तुगाल, स्पेन,  ब्रिटन आणि फ्रान्स या वसाहतवादी देशांनी मिळून जगभरात एकूण चाळीस ठिकाणी गुन्हेगारांच्या वसाहती निर्माण केल्या होत्या. आफ्रिकेच्या किनार्‍याजवळ असलेले मडीरा बेट आणि अंगोलातील लुआंडा ही पोर्तुगीज गुन्हेगार वसाहतींची ठळक उदाहरणे होत. ब्रिटनने अमेरिका, ऑस्ट्रेलिया (पोर्टमॅक्वायर, नोरफोक आयलंड, मारिया आयलंड, आणि पोर्ट ऑर्थर), मलाक्का, मॉरिशस, पेनांग, सिंगापूर, म्यानमार (ब्रह्मदेश) आणि खास भारतीय कैद्यांसाठी अंदमानातील बेटांवर गुन्हेगारांच्या अशा अनेक वसाहती स्थापन केल्या होत्या. फ्रेंचांनी व्हिएतनाम, कंबोडिया, आफ्रिका,  दक्षिण अमेरिकेत फ्रेंच गियाना (डेव्हिल्स आयलंड म्हणून प्रसिद्ध असलेली केयेन ही वसाहत) व प्रशांत महासागरातील न्यू कॅलेडोनिया येथे वसाहती स्थापन केल्या आणि १५४२ ते १९७६ या दरम्यान लक्षावधी लोकांना हद्दपार केले होते. रशियामधील गुन्हेगार १८७९ ते १९०५ या दरम्यान काळ्या समुद्रावरील ओडेसा या बंदरामधून उत्तर प्रशांत महासागरातील साखालीन बेटावर आणि सैबेरियाच्या अत्यंत दुर्गम भागात सक्तमजुरीसाठी पाठवले जात असत,  तर सोव्हिएत महासंघात त्यासाठी वेगळी ’गुलाग’ नावाची कारागृहांची प्रशासकीय यंत्रणा होती.

अंदमानातील सेल्युलर जेल.

कैद्यांच्या छावण्यांमधील विविध इमारती, छावण्यांच्या तटबंदीचे अवशेष, कैदी कोठड्यांमधील भिंतीवर कोरलेली चित्रे व नावे, कैद्यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तू, आणि कैद्यांना एकांतवासामध्ये ठेवण्यासाठी बनवलेल्या अंधारकोठड्या (उदा., डेव्हिल्स आयलंड) यांचा समावेश गुन्हेगारांच्या वसाहतींच्या पुरातत्त्वात होतो. या अभ्यासात कैद्यांच्या आठवणी, छावण्यांचे व कारागृहाचे नकाशे, चित्रे, उपलब्ध असल्यास छायाचित्रे, तुरुंग प्रशासनाचे दस्तऐवज, तत्कालीन वर्तमानपत्रातील बातम्या इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो. फ्रेंच गियानातील सेंट लॉरेंट दु मारोनी  या ठिकाणी असलेल्या वस्तुसंग्रहालयात गुन्हेगारांनी बनवलेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. तसेच न्यू कॅलेडोनिया वसाहतीमधील गुन्हेगारांनी बनवलेल्या विविध वस्तूंचा आणि अंदमानातील ब्रह्मदेशी कैद्यांनी बनवलेल्या नारळाच्या व लाकडी वस्तूंचा पुरातत्त्वीय अभ्यास करण्यात आला. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील ब्रिटिश गुन्हेगार वसाहतीच्या स्थळांवर पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले. या खेरीज टास्मानियातील (ऑस्ट्रेलिया) व्हान डीमेन्स लँड या ब्रिटिश वसाहतीचा २०१० मधील पुरातत्त्वीय संशोधन प्रकल्प हे गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्वाचे उल्लेखनीय उदाहरण आहे.

प्राचीन काळापासून तुरुंगांच्या वास्तुरचनेत अनेक बदल झाले आहेत. ’फिलाडेल्फिया पद्धत’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या तुरुंग वास्तुरचनेत, एका मध्यवर्ती ठिकाणी कैद्यांना न दिसता त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला उंच मनोरा असे आणि अनेक दिशांना कोठड्यांच्या रांगा असत. असा पहिला तुरुंग (सेल्युलर जेल) फिलाडेल्फियात चेरीहिल भागात १८२९ मध्ये बांधण्यात आला. कैद्यांना वेगळे आणि पूर्ण एकांतवासात ठेवल्याने त्यांच्यात सुधारणा लवकर होते, अशी कल्पना यामागे होती. अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर जेल हा अशाच रचनेचा असून त्यात मुळात मध्यवर्ती मनोरा आणि सात भाग होते.

गुन्हेगारांच्या वसाहतींच्या स्थळांचे आता जगभरात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांमध्ये रूपांतर झाले आहे. गुन्हेगारांच्या वसाहतींमधील जीवन खडतर होते. त्यांचा संबंध दडपशाही, कैद्यांचा छळ, त्यांच्या वेदना, त्यांच्या मनातील पाप-पश्चात्तापाचा संघर्ष, कटु आठवणी, त्यांना दिल्या जाणार्‍या शिरच्छेदासारख्या शिक्षा, भयंकर वातावरणात टिकून राहण्यासाठी करावा लागणारा दैनंदिन झगडा अशा अनेक गोष्टींशी आहे. अशी ’काळा वारसा’ (Dark Heritage) असणारी ठिकाणे आता पर्यटनस्थळे म्हणून विकसित झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांना शिक्षा करण्यासाठी निर्माण केलेला अंदमानातील  येथील सेल्युलर जेल हे आता पर्यटनस्थळ बनले आहे. हेन्री शॅरिए (१९०६ — १९७३) या फ्रेंच लेखकाच्या सुटकेच्या प्रयत्नांवर आधारित पॅपिलॉन (१९६९) या पुस्तकामुळे फ्रेंच गियानातील गुन्हेगारांची वसाहत प्रसिद्ध झाली. तसेच एकोणिसाव्या शतकात कॅप्टन आल्फ्रेड ड्रेफ्रस (१८५९ — १९३५) या लष्करी आधिकार्‍याला जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी फ्रेंच गियानात पाठवण्यात आले होते. तो १८९६ पासून पाच वर्षे डेव्हिल्स आयलंडवर ज्या झोपडीत राहिला तिकडे आणि अशा इतर स्थळांकडे आता पर्यटक आकर्षित होतात.

संदर्भ :

  • Anderson, Clare, ‘The Andaman Islands Penal Colony : Race, Class, Criminality and the British Empire’, IRSH, 63:25-43, 2018.
  • Casella, Eleanor Conlin, & Fennelly, Katherine, ‘Ghosts of Sorrow, Sin and Crime : Dark Tourism and Convict Heritage in Van Diemen’s Land, Australia’, International Journal of Historical Archaeology, 20 : 506-520, 2016.
  • Deniz Dokgöz, G. Prison Architecture, A Typological Analysis of Spatial Organizations in respect to Punishment Systems, Masters Dissertation, İzmir Institute of Technology, İzmir, Turkey, 2002.
  • Foucault, Michel, Discipline and Punish : The Birth of the Prison (Surveiller et punir : Naissance de la prison), Paris, 1977.

                                                                                                                                                                                                                                 समीक्षक : सुषमा देव