पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये मिळणाऱ्या परोपजीवींचा अभ्यास करण्याची पद्धती. मानव आणि मानवेतर प्राण्यांत अनेक प्रकारचे परोपजीवी आढळतात. इतर सजीवांचा वापर करून जे सजीव आपले अन्न मिळवतात त्यांना परोपजीवी (parasite) असे म्हणतात. त्यांचा अभ्यास परोजीवीविज्ञानात (parasitology) केला जातो. परोपजीवी दोन प्रकारचे असतात. प्राण्यांच्या बाह्य शरीरावर राहणाऱ्या परोपजीवींना बाह्य परोपजीवी (ectoparasite) म्हटले जाते. पिसवा, ढेकूण आणि डास ही बाह्य परोपजीवींची काही उदाहरणे आहेत. जे परोपजीवी इतर प्राण्यांच्या शरीरांत विविध उतींमध्ये राहतात त्यांना अंतर्परोपजीवी (endoparasites) असे म्हणतात. अन्नमार्गात राहणारे जंत हे अंतर्परोपजीवींचे उदाहरण आहे. शरीराच्या आत, विशेषतः पेशींच्याही आत राहणाऱ्या परोपजीवींमध्ये विषाणूंचा समावेश होतो.

आइया इरिनी येथील ट्रायचुरिस ट्रायचुरा सूत्रकृमीचे रोमन कालखंडातील दफनामधून मिळालेले अंडे.

मानवेतर प्राणी आणि मानव अस्तित्वात असल्यापासूनच त्यांच्यावर जगणारे परोपजीवी अस्तित्वात आहेत. अनेक परोपजीवी हे मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यात रोग निर्माण करतात. मानवेतर प्राणी आणि मानव यांच्यामधील संबंधांचा हा एक प्रकार आहे. पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये परोपजीवींचे पुरावे विविध स्वरूपांत आढळतात. पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये मिळणाऱ्या परोपजीवींच्या अभ्यासाला पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान असे म्हणतात. अशा संशोधनात जैविक-पुरातत्त्वीय अवशेषांचा उपयोग केला जात असल्याने ही जैवपुरातत्त्वविज्ञानाची एक शाखा मानली जाते.

पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञानात सूक्ष्मदर्शकांचा वापर आणि डीएनए रेणूंच्या चाचण्या अशा अनेक पद्धतींचा उपयोग करून पुरातत्त्वीय निक्षेपांमधून परोपजीवींचा शोध घेतला जातो. पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञानामधील संशोधनाचे पहिले उदाहरण विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे आहे. शिस्टोसोमा हिमॅटोबियम (Schistosoma haematobium) हे चपटे कृमी माणसाच्या मूत्रपिंडात राहणारे परोपजीवी असून त्यांच्यामुळे शिस्टोसोमिॲसिस (Schistosomiasis) हा रोग होतो. इजिप्तमधील बाराव्या घराण्याच्या (इ. स. पू. १९९१—१८०२) दोन ममींच्या मूत्रपिंडांच्या छेदांचे सूक्ष्मदर्शक वापरून निरीक्षण केल्यानंतर त्यांत शिस्टोसोमा हिमॅटोबियम या प्रजातीची अंडी आढळली.

माणसांमध्ये आतड्यात राहणारे (Ascaris lumbricoides) या प्रजातीचे जंत (सूत्रकृमी) हे सर्वसामान्यपणे आढळणारे अंतर्परोपजीवी आहेत. एजियन समुद्रातील की (Kea) या बेटावर आइया इरिनी या कांस्ययुगातील दफनामध्ये या जंतांची अंडी आढळली. या दफनाचा कालखंड इ. स. पू. १६०० ते ११०० असा आहे. त्याचप्रमाणे आता लंडन शहराचा भाग असलेल्या प्रिचर्सकोर्ट या मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळाच्या उत्खननात जंतांची अंडी मिळाली आहेत.

फ्रान्समधील मेनेझ ड्रेगन गुहेतील इ. स. पू. ५०००० वर्षे काळातील टोक्सोकॅरा कॅनिस सूत्रकृमीचे अंडे.

फ्रान्सच्या पश्चिम भागातील ब्रिटनी या प्रांतात असलेल्या मेनेझ ड्रेगन येथे पुराश्मयुगीन गुहा आहे. या गुहेत इ. स. पू. तीस हजार या काळात मानवी वास्तव्य असल्याचे पुरावे मिळाले. तेथील पुरातत्त्वीय निक्षेपात टोक्सोकॅरा कॅनिस (Toxocara canis) या सूत्रकृमी परोपजीवींच्या अंड्यांचे पुरावे मिळाले आहेत. या परोपजीवींमुळे कुत्रे आणि माणसांमध्ये होणाऱ्या रोगाला टोक्सोकॅरियासिस (Toxocariasis) असे म्हणतात. हा टोक्सोकॅरा कॅनिस परोपजीवीचा सर्वांत जुना पुरावा आहे.

ट्रायचुरिस ट्रायचुरा (Trichuris trichiura) हे नेमॅटोडा प्रकारचे सामान्य जंतांपेक्षा आकाराने थोडे लहान असलेले परोपजीवी कृमी (व्हिपवर्म) माणसांमध्ये ट्रायचुरियासिस (Trichuriasis) हा रोग निर्माण करतात. अस्वच्छ राहणीमानामुळे माणसाच्या आतड्यात राहणाऱ्या या कृमींचा संसर्ग होतो. चतालहुयुक (Çatalhöyük) या तुर्कस्तानातील अनातोलिया भागातील नवाश्मयुगीन स्थळावर इ. स. पू. ८००० पासून ट्रायचुरिस ट्रायचुरा याचे पुरावे मिळतात. यूरोपात हा रोग नवाश्मयुगापासून असल्याचे पुरातत्त्वीय अभ्यासातून दिसून आले. ट्रायचुरिस परोपजीवी शेतीच्या आणि पशुपालनाच्या प्रसाराबरोबर सर्वत्र पसरला, असे पुरातत्त्वीय पुराव्यांमधून दिसून आले. तथापि ब्रिटनमधील साउथ वेल्समधील मध्याश्मयुगीन निक्षेपामध्ये या कृमींच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले. या संशोधनामुळे असे दिसते की, भटक्या अवस्थेत असतानाच ट्रायचुरिस परोपजीवींनी माणसांमध्ये प्रवेश केला असावा.

माणसांमध्ये आतड्यात एन्टेरोबियस व्हर्मिक्युलॅरिस (Enterobius vermicularis) हे नेमॅटोडा प्रकारचे परोपजीवी (पिनवर्म) राहतात आणि विष्ठेतून बाहेर पडलेल्या अंड्यांच्या माध्यमातून यांचा संसर्ग होतो. त्यांच्यामुळे होणाऱ्या रोगाला एन्टेरोबियासिस (Enterobiasis) असे म्हणतात. अमेरिकेच्या युटे राज्यात असलेल्या होपुग आणि डेंजर या गुहांमध्ये मिळालेल्या मानवी विष्ठेचे विश्लेषण केले असता या इ. स. पू. ७८३८ मधील विष्ठेत या परोपजीवींच्या संसर्गाचा पुरावा मिळाला.

मानवांमध्ये प्लास्मोडियम या एकपेशीय प्राण्यांच्या चार प्रजातींमुळे हिवताप होतो. हिवतापामुळे होणारे ९९ टक्के मृत्यू प्लास्मोडियम फाल्सिपेरम (Plasmodium falciparum) या परोपजीवींमुळे होतात. अनोफिलिस (Anopheles) प्रजातीच्या डासांची मादी चावल्यामुळे माणसांमध्ये प्लास्मोडियमचा संसर्ग होतो. इजिप्तमधील अबिडॉस येथे आढळलेल्या दोन ममींच्या शरीरात या प्रजातीचे प्राचीन डीएनए रेणू मिळाले. या ममींचा कालखंड इ. स. पू. ३५०० ते १८०० असा आहे. इजिप्तमध्ये हिवताप सु. चार हजार वर्षांपासून आहे, हे या संशोधनातून दिसून आले.

ज्यांच्यात जननिक द्रव्य (Genetic material) आरएनए रेणू आहे, अशा विषाणूंमध्ये रिट्रोव्हिरिडी या कुलाचा समावेश होतो. या कुलातील विषाणू (रिट्रोविषाणू) विशिष्ट प्रकारचे असतात. त्यांच्यातील आरएनए रेणूंपासून डीएनए रेणू तयार होतात आणि ते आश्रयी सजीवाच्या (Host) जननिक द्रव्यात जाऊन बसतात. अशा डीएनए रेणूमध्येच कायमचे समाविष्ट झालेले अनेक रिट्रोविषाणू मानवी जनुकसंचात (सु. ८ %) आहेत. त्यांच्यातले अनेक रोगांना कारणीभूत ठरतात. डेनिसोव्हा मानव (Denosovan) आणि निअँडरथल मानवांच्या डीएनए रेणूंच्या अभ्यासामध्ये मानव जनुकसंचात न आढळणारे सहा रिट्रोविषाणू आढळून आले. यांतील दोन प्रकारचे रिट्रोविषाणू फक्त निअँडरथल मानवांमध्ये तर एक रिट्रोविषाणू केवळ डेनिसोव्हा मानवामध्ये आढळला. यावरून असे दिसते की, हे रिट्रोविषाणू डेनिसोव्हा मानव आणि निअँडरथल मानव आजच्या आधुनिक मानवांच्या उत्क्रांती शाखेपासून अलग होण्याआधीचे (सु. आठ लाख वर्षांपूर्वीचे) परोपजीवी आहेत.

संदर्भ :

  • Anastasiou, E. Ed., Mitchel, P. D. ‘Parasites in European populations from prehistory to the industrial Revolution’, Sanitation, Latrines and Intestinal Parasites in Past Populations, pp. 203-217, Ashgate : Farnham, 2015.
  • Bouchet, F. ‘Recovery of Helminth Eggs from Archaeological Excavations of the Grand Louvre (Paris, France)’, Journal of Parasitology,  81: 785-787, 1995.
  • Kenward, Harry, Invertebrates in Archaeology in the North of England, York, 2007.
  • Ledger, Marissa L. & Mitchell, Piers D. ‘Tracing zoonotic parasite infections throughout human evolution’, International Journal of Osteoarchaeology, 1-12, 2019.

                                                                                                                                                                                                                    समीक्षक : सुषमा देव