ऐतिहासिक पुरातत्त्वाप्रमाणे मध्ययुगीन काळाचे पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येची कालखंडावर आधारलेली शाखा आहे. या शाखेची उद्दिष्टे, संशोधन पद्धती आणि पुरातत्त्वीय निष्कर्षांचे स्वरूप हे सर्वसाधारणपणे ऐतिहासिक काळाच्या पुरातत्त्वाप्रमाणेच आहे. या संशोधनातही उपलब्ध असलेल्या लिखित पुराव्यांचा (अरबी, लॅटिन व यूरोपातील विविध स्थानिक भाषा) वापर केला जातो. भारतीय संदर्भात या काळाचे दस्तऐवज संस्कृतखेरीज विविध भारतीय प्रादेशिक भाषा आणि पर्शियन भाषा यांत असल्याने त्यांचा उपयोग केला जातो. तसेच नाणी, अभिलेख व परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने शक्य असल्यास वापरली जातात.

दौलताबाद येथील उत्खनन.

यूरोपात रोमन साम्राज्याच्या अंतापासून (इ. स. पाचवे शतक) ते नव्या जगाच्या शोधापर्यंत म्हणजे इ. स. १५०० दरम्यानच्या काळाला मध्ययुग असे म्हणतात. या काळामध्ये सरंजामशाहीवर आधारित समाजरचना होती. सरंजामशाहीचा पूर्ण पगडा असताना समाजात धर्मसत्ता (चर्च), राजे-उमराव (Aristocracy) आणि कोणतेही अधिकार नसलेले सामान्यजन (Fief) अशी त्रिस्तरीय समाजचरना होती. हा काळ इतिहासात  ’अंधारयुग’ म्हणून ओळखला जातो. हे ज्ञानविज्ञानाच्या दृष्टीने अंधारयुग असले, तरी याच काळात शहरांचा उदय होऊन त्यांची वाढ झाली; व्यवहारोपयोगी कलाकौशल्ये विकसित झाली आणि आपल्या मर्यादित जगातून बाहेर पडून नवीन भागात प्रवास करावा ही भावना यूरोपात वाढीस लागली. त्यातूनच यूरोपात जहाजबांधणी उद्योगाचा व बंदरांचा विकास, दर्यावर्दी लोकांनी काढलेल्या सागरी मोहिमा, शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाचा विकास आणि पुढील काळात नवीन प्रदेशांवर राज्य करण्याच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या वसाहती या मध्ययुगातल्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या.

मध्ययुगाच्या पूर्वार्धात इस्लामच्या उदयानंतर अरबस्थान व आशियाच्या अनेक भागांत ज्ञानविज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होत असताना बगदाद, दमास्कस, समरकंद व इस्तंबूल अशी नवी शहरे विकसित होत होती. मध्ययुगाच्या उत्तरार्धात यूरोपात ऑक्सफर्ड, केंब्रिज, नेपल्स, पिसा, पदुआ, बोलोन्या, फेरारा, रोम व पॅरिस अशा अनेक ठिकाणी नवीन विद्यापीठे उदयास आली. तसेच जेनोवा, व्हेनिस, लंडन, अॅमस्टरडॅम व लिस्बन यांसारखी नवी शहरे निर्माण झाली. भारतात राजधानी, सत्ताकेंद्रे अथवा व्यापारी पेठा म्हणून आग्रा, कालिंजर, सुरत, अहमदाबाद, औरंगाबाद, विजापूर, तंजावूर, मदुराई व विजयानगर अशा शहरांची वाढ झाली. तसेच भारतात कांचीपुरम, वलभी, तेल्हाडा व विक्रमशीला अशी काही विद्यापीठे अस्तित्वात होती. या विद्यापीठांमधील व शहरांमधील इमारतींचे स्थापत्य आणि नगररचना यांचा अभ्यास मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वात केला जातो.

मध्ययुगातील धर्मसत्तेशी निगडित कॅथीड्रल, चॅपेल व मठ (monastrty) यांचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास चर्चचे पुरातत्त्व (Church Archaeology) या उपशाखेत केला जातो. यूरोपात मध्ययुगीन काळात कोट-किल्ले, राजप्रासाद, मनोर आणि व्हिला अशा अनेक वास्तू निर्माण झाल्या, तर भारतात मोठेमोठी मंदिरे, मशिदी आणि संरक्षणासाठी उपयुक्त कोट-किल्ले व गड निर्माण झाले. या सर्व वास्तूंचा अभ्यास मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वामध्ये केला जातो. जहाजांचे पुरातत्त्व (Archaeology of Ships and Boats) ही एक उपशाखा, जहाजबांधणी केली जाणारी बंदरे व गोदींचा विशेष अभ्यास करते. तसेच सागरी सफरींच्या दरम्यान अनेक जहाजे बुडत असत. अशा बुडलेल्या जहाजांचे विशेष संशोधन नौकाबुडीच्या (Archaeology of Shipwrecks) केले जाते. नौका व जहाजे यांच्याशी निगडित पुरातत्त्वीय उत्खननाच्या पद्धती जमिनीखालील उत्खनन पद्धतींपेक्षा निराळ्या असतात.

मध्ययुगीन काळातील एखाद्या विशिष्ट स्थळाचे मोठ्या प्रमाणावरचे पुरातत्त्वीय उत्खनन जरी शक्य असले, तरी ते व्यवहारात आणणे अवघड जाते; कारण मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळे अवाढव्य आकाराची असतात. भारतीय उपखंडामध्ये त्यांचे आधुनिक गावे व शहरे यांच्यात रूपांतर झाल्याने तेथे लोकवस्ती असते आणि अनेकदा तेथे उत्खनन करण्याजोगी जागा सहजासहजी उपलब्ध होत नाही. वाढत्या नागरीकरणामुळे शहरांची वाढ होताना महत्त्वाचे मध्ययुगीन अवशेष नष्ट होण्याचे प्रमाणही भारतात खूप आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगात सगळीकडे उद्भवणाऱ्या या समस्यांवर मात करण्यासाठी आता पुरातत्त्वविज्ञानातील लिडार (LIDAR) आणि ड्रोनवर आधारित छायाचित्रणाचा वापर केला जातो.

सोसायटी फॉर मिडिव्हल आर्किऑलॅाजी ही संस्था मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वातील संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी १९५७ पासून मिडिव्हल आर्किऑलॅाजी हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध करत आहे. या नियतकालिकात पाचव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंतच्या काळातील पुरातत्त्वीय संशोधनावरचे लेख स्वीकारले जातात.

दिल्ली येथील लाल कोट, पुराना किल्ला; उत्तर प्रदेश येथील फतेहपूर सिक्री; राजस्थान येथील चितोडगड, कुंभलगड; गुजरात येथील संजाण, चंपानेर; महाराष्ट्रातील केळशी, वाकाव, पंढरपूर, दौलताबाद, कंधार; हंपी (कर्नाटक); बिहार येथील तेल्हाडा, विक्रमशीला; पश्चिम बंगाल येथील बालुपूर, मोघलमारी आणि केरळ येथील विळिंझम व कोटापुरम या स्थळांचे उत्खनन अहवाल ही भारतीय मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वाची काही उदाहरणे आहेत.

संदर्भ :

  • Crabtree, Pam J. Ed., Medieval Archaeology : An Encyclopedia, New York, 2001.
  • Datta, A.; Sanyal, R.; Saha, S.; Chatterjee, S. & Mondal, M. Excavations at Moghalmari : An Interim Report, Kolkata : The Asiatic Society, 2008.
  • Gerrard, Chris, Medieval Archaeology : Understanding Traditions and Contemporary Approaches, Routledge, 2003.
  • Mate, M. S. ‘Daulatabad : road to Islamic archaeology in India’, World Archaeology, 14(3) : 335–341, 1983.
  • Sinopoli, C. M. & Morrison, K. D. The Vijayanagara metropolitan survey, Volume 1. Ann Arbor, 2007.

     समीक्षक : सुषमा देव