भेर : उत्सव, आनंद आणि मध्ययुगीन काळात युद्धप्रसंगी वाजविले जाणारे वाद्य. महाराष्ट्रातील खानदेशात नगरदेवळे या शहरात आजही हे वाद्य वाजविले जाते. युद्धाच्या वेळेस आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यात वीरश्री चे बळ निर्माण करण्यासाठी, रणभूमीवर शंख, दुंदुभी, संबळ, भेर, तुतारी, रणशिंग, ढोल-नगारे इत्यादी वाद्य वाजवली जात असत. ही एक प्रकारची शौर्य वाद्येच होती. नगरदेवळे गाव हे जहागिरीचे गाव. त्यामुळे मुलुखगिरीवर निघताना येथील सरदारांसोबत सर्वच लवाजमा निघायचा. त्यात सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी शौर्य वाद्य वाजवणारी मंडळी पण असायची. त्या काळापासून भेर वाजविणे ही कला या परिसरात विद्यमान आहे.

भेर हे युद्धप्रसंगी वाजवले जाणारे हे एक शौर्य वाद्य आहे. याचा वापर आनंदाच्या प्रसंगी पण केला जायचा. पुर्वी ही भेर विवाह प्रसंगी विशेषतः हळद समारंभाच्या व विवाह समारंभाच्या वेळेस पण वाजवली जायची. रात्रीचे फुणके ( हळदीच्या दिवशी नवरदेव किंवा नवरीची एकट्याने मिरवणूक ), वरात ( दोघांची एकत्र मिरवणूक ) ही भेर शिवाय पूर्ण होतच नव्हती. यावेळी नवरदेव किंवा नवरी यांच्यावरून ओवाळणी टाकून हातातील सुटे नाणे या भेरमध्ये भिरकावले जायचे. कुटुंबात पुत्रप्राप्ती झाली आज भेर वाजवली जाते आणि बाळाच्या जाऊळ कार्यक्रमात काही हौशी कुटुंबे भेर वाजवतात. पुत्रप्राप्ती  झाल्यापासून साधारणतः बाराव्या दिवसांपर्यंत दररोज सकाळी भेर वाजवली जाते. ज्यांच्याकडे पुत्रप्राप्ती झाली त्यांच्या सर्व भाऊबंदकितील तसेच मित्र परिवाराच्या घरासमोर सकाळी ही भेर फुंकली जाते. बारा दिवसांनंतर बाळाची बारादीचा कार्यक्रम होतो. त्यानंतर भेर वाजवणारी व्यक्ती प्रत्येक घरी जाते. त्या घरून त्यांना धान्य पैसे किंवा कपडे पण बिदागी म्हणून दिले जातात. बाळाच्या जाऊळदान विधीच्या कार्यक्रमालाही भेर वाजवली जाते. घरापासून नदीपर्यंत जिथे आसरांची ठिकाण आहे. वाजंत्री सोबत भेर फुंकली जाते. तिच्या आवाजाने जाऊळची माहिती सर्वांना होते. दारासमोर भेर वाजवणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. यातून भाऊबंदकी म्हणजे एकच कुटुंब आहे हा संदेश जातो. अशा आनंदातून आपसातील गैरसमज, दुरावे, मानपान, राजकारणामुळे दुरावलेली मने सांधली जातात. सर्व भाऊबंदकी एकत्र येण्यासाठी भेर वाजवण्याची परंपरा एक सामाजिक दुव्याचे काम करते.

संदर्भ :

  • https://www.discovermh.com/bher-fukane/