फान्सी हा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष असून त्याचा समावेश फॅबेसी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव डाल्बर्जिया लँसेओलॅरिया आहे. शिसू व शिसवी या वनस्पतीदेखील याच कुलात मोडतात. फान्सी वृक्ष मूळचा भारतीय उपखंडातील असून भारत, श्रीलंका, नेपाळ व भूतान या देशांत मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगररांगांपासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील वनांमध्ये तो आढळतो. त्याला फणशी असेही म्हणतात. मात्र तो फणसाहून वेगळा आहे.
फान्सी वृक्ष ६–१८ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर १·५–२ मी. असून साल पिवळसर करड्या रंगाची असते. पाने संयुक्त व १०–१५ सेंमी. लांब आणि पर्णिका ९, ११, १३ किंवा १५ असून त्या लंबगोलाकार, टोकदार व निळसर-हिरव्या रंगाच्या असतात. हिवाळ्यात पानगळ होऊन साधारणपणे मार्च महिन्यात पालवी येते, तर एप्रिल महिन्यात फुले येतात. फुले लहान व १ सेंमी. लांब असून प्रत्येक फुलामध्ये १० पुंकेसर असतात. फळे शिंबा प्रकारची असून ती लहान, हिरवी, चपटी आणि टोकदार असतात. शेंगा वाळल्यावर बदामी तपकिरी होतात. प्रत्येक शेंगेत १ किंवा २ चपट्या बिया असतात. वाळलेल्या शेंगा वाऱ्याबरोबर उडून जाऊन बीजप्रसार होतो. या बिया सहजपणे रुजतात.
फान्सीच्या फुलांतील मकरंद गडद तांबूस आणि उग्र वासाचा असतो. बियांतील तेल संधिवातावर उपयुक्त असते. फान्सीचे लाकूड पिवळसर करड्या रंगाचे, कठीण आणि टिकाऊ असून ते महाग असते. त्याला पॉलिशही चांगले होते. त्याचा उपयोग बांधकामासाठी, वाद्ये बनविण्यासाठी, तसेच फर्निचरसाठी होतो. शोभेकरिता फान्सी हा वृक्ष उद्यानांमध्ये लावला जातो.