विविध आर्थिक व सामाजिक कारणांसाठी कामगार व इतर आर्थिक दृष्टीने दुर्बल शोषित वर्गांमध्ये झालेल्या झगड्यांचा पुरातत्त्वीय साधने वापरून केलेला अभ्यास म्हणजे वर्गलढ्याचे पुरातत्त्व. याचा संबंध कामगारांशी असल्याने तो औद्योगिक पुरातत्त्वीय संशोधनाचाही एक भाग आहे. वर्गलढा अथवा वर्गयुद्ध ही संकल्पना मार्क्सवादी विचारधारेतील मुख्य भाग असल्याने असे संशोधन मार्क्सवादी पुरातत्त्वाचाही एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तसेच वर्गलढा या संकल्पनेतच संघर्ष आणि हिंसा अभिप्रेत असल्याने अशा संशोधनाचा समावेश संघर्षाचे पुरातत्त्व या पुरातत्त्वाच्या शाखेत करता येतो.

लुडलो येथील संपकरी वस्तीतील बायका-मुले ठार झालेला ’मृत्यूचा खड्डा’, कोलोरॅडो, अमेरिका.

भांडवलशाही समाजव्यवस्थेत वर्गसंघर्षांचे वैयक्तिक घातपात, प्रतिकारासाठी शोषितांच्या टोळ्यांनी केलेला हिंसाचार आणि बंडातून प्रस्थापित व्यवस्था उलटवणे असे अनेक प्रकार असू शकतात. या सर्व प्रकारच्या वर्गसंघर्षाच्या पुरातत्त्वीय खुणा मिळू शकतात. ऐतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनात वापरल्या जाणार्‍या सर्वसाधारण पद्धतीचा वापर वर्गलढ्याच्या पुरातत्त्वात केला जातो. वर्गसंघर्षात घडलेल्या घटनांच्या पुरातत्त्वीय अवशेषांची तपशीलवार नोंदणी केली जाते. तसेच उपलब्ध असल्यास त्या घटनेच्या साक्षीदारांची कथने, सहभागी लोकांच्या आठवणींच्या नोंदी आणि इतर लिखित पुराव्यांची पुरातत्त्वीय पुराव्यांशी सांगड घालून अनुमाने काढली जातात.

जगभरातील पुरातत्त्वीय संशोधन हे प्रामुख्याने मध्यमवर्गीय जाणिवांशी निगडित असल्याने व ते सहसा बुर्झ्वा वर्गाच्या (Bourgeois) हातात असल्याने त्यात श्रमजीवी अथवा श्रमिक वर्गाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, अशी विचारसरणी पुरातत्त्वामध्ये मार्क्सवादी विचारांचा वापर केल्यानंतर उदयाला आली. विसाव्या शतकाच्या मध्यावर मानवी इतिहासातील औद्योगिक कालखंडाचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची (औद्योगिक पुरातत्त्व) सुरुवात झाली. तथापि उद्योगांशी संबंधित कामगारवर्ग आणि मालकवर्ग अथवा भांडवलदारवर्ग यांच्यामध्ये विविध पातळ्यांवर झालेल्या संघर्षाकडे विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत फारसे गांभीर्याने बघितले जात नव्हते. अशा प्रकारे वर्गलढ्याचे पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येतील तुलनेने नवीन शाखा असल्याने वर्गलढ्याच्या पुरातत्त्वाची उदाहरणे कमी प्रमाणात आहेत.

वर्गलढ्याच्या पुरातत्त्वात अमेरिकेतील रसेल कटलरी फॅक्टरीचे उदाहरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. मॅसॅच्युसेट्समध्ये टर्नर्स फॉल्स येथे ही रसेल कटलरी फॅक्टरी ग्रीनफील्ड येथून स्थलांतरित झाल्यानंतर (१८७०) तिच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली (१८८०). नव्या यंत्रांमुळे रोजगार कमी होत गेल्याने आणि पगारात कपात झाल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढत गेला. या फॅक्टरीच्या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननांमधून हे दिसून आले की, तेथे कमी प्रतीच्या व तुटक्याफुटक्या अशा असंख्य वस्तू पडलेल्या होत्या. कामगारांनी मुद्दामच असे केले होते, या लिखित नोंदींना पुरातत्त्वीय पुराव्याने दुजोरा मिळाला. रसेल कटलरी फॅक्टरी हे औद्योगिक घातपाताचे एक उदाहरण मानले जाते.

अमेरिकन इतिहासात ’लुडलो हत्याकांड’ (Ludlow Massacre) या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या घटनेचा वर्गलढ्याच्या दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात कोळसा खाणींमधील कामगार १९१३ मध्ये संपावर गेले होते. हा संप वर्षभर चालला होता. संप चिरडण्यासाठी लुडलो या संपकरी कामगारांच्या वस्तीवर कोलोरॅडो नॅशनल गार्डने २० एप्रिल १९१४ रोजी हल्ला करून मुख्यतः तंबू असणारी वस्ती जाळून टाकली. त्या वेळी झालेल्या संघर्षात बायकामुलांसह एकवीस जण मेले होते.  त्यानंतर पुढील सात महिने खाणमालक कंपनी व तिच्या बाजूने असणारे प्रशासन आणि कामगार यांच्या सशस्त्र झगड्यात किमान पंचाहत्तर जण बळी पडले होते. ही घटना अमेरिकन इतिहासात ’कोलोरॅडो कोलफील्ड वॉर’ या नावाने ओळखली जाते. या रक्तरंजित घटनेशी संबंधित पुरातत्त्वीय अवशेषांच्या सखोल अभ्यासाने कामगारांची हलाखीची स्थिती आणि मालक कंपनीची दडपशाहीची भूमिका यांच्या बाबतींत अनेक नवे पैलू उजेडात आले.

अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यात लोगन काउंटीत कामगार युनियनमध्ये सामील होण्याच्या मागणीसाठी १९२१ या वर्षी कोळसा खाणीतील कामगार आंदोलन करत होते. त्या दरम्यान संघर्षाची हिंसक घटना घडली. ब्लेअर माउंटनच्या माथ्यावर हजारो कामगार जमा झाले असताना कंपनीच्या सशस्त्र भाडोत्री गुंडांनी आणि वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डने त्यांच्यावर मशीनगननी हल्ला चढवला. या वेळी बळी गेलेल्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. पुरातत्त्व वैज्ञानिकांना धातूशोधक यंत्रे वापरून ब्लेअर माउंटनच्या माथ्यावर काडतुसांच्या पुंगळ्या व झाडांवर असलेल्या गोळ्यांच्या खुणा तपासून आणि उपलब्ध दस्तऐवजांवरून त्या वेळी काय घडले असावे, याबद्दल महत्त्वाचे निष्कर्ष काढता आले.

वर्गलढ्यातील विशिष्ट घटनांच्या पलीकडे जाऊन अधिक व्यापक पुरातत्त्वीय संशोधनाचे महत्त्वाचे एक उदाहरण म्हणजे ‘लॅटिमर हत्याकांड’. १० सप्टेंबर १८९७ रोजी पेनसिल्वेनियात हेजलटन गावाजवळ असलेल्या कोळसा खाणींमध्ये काम करणार्‍या पोलिश, स्लाविक आणि लिथुआनियन कामगारांचा मोर्चा निघाला होता. हे सु. चारशे कामगार आपल्याला स्थानिक अमेरिकन (अँग्लो-सॅक्सन) कामगारांएवढेच वेतन मिळावे, यासाठी आंदोलन करत होते. मोर्चावर लुझर्न काउंटीचा शेरीफ आणि खाण कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पंचवीस जण ठार झाले, तर कित्येक जखमी झाले. या कामगारांच्या वसाहतींच्या पुरातत्त्वीय अभ्यासांतून दिसून आले की, या कामगारांकडे अन्नाची प्रचंड कमतरता होती. ज्या अन्नाला आणि फळांना ’इंग्लिश बोलणारे’ हातही लावणार नाहीत, अशा अन्नावर या परदेशी मजुरांना जगावे लागत होते. विशेषतः या गरीब परदेशी लोकांना मांस मिळत नसल्याचे सिद्ध झाले. लॅटिमर हत्याकांडांनंतर न्यायालयात शेरीफ आणि इतरांवर खटलाही झाला होता, पण ज्युरीमध्ये परदेशी मजुरांचे प्रतिनिधी नसल्याने त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या संशोधनासाठी कंपनीचे नकाशे, वसाहतींच्या ठिकाणी असलेल्या झोपड्यांचे दगडी पाये, हवाई छायाचित्रण आणि इतर पुरातत्त्वीय साधनांचा उपयोग करण्यात आला.

संदर्भ :

  • Andrews, Thomas G. Killing for Coal : America’s Deadliest Labor War, Harvard University Press, 2010.
  • Beans, Bruce E. ‘Lattimer Massacre’, American Archeology Winter : 12-18, 2014-2015.
  • McGuire, Randall H. & Walker, Mark, ‘Confronting Class’, Historical Archaeology, 33: 159-183, 1999.
  • Patel, S. S. ‘Mountain top rescue’, Archaeology Magazine, 65(1): 122-128, 2012.
  • Paynter, Robert, ‘The archaeology of equality and inequality’, Annual Review of Anthropology, 18 : 369 -399, 1989.
  • Shackel, Paul A. The Archaeology of American Labor and Working-Class Life, Gainesville,  2009.

                                                                                                                                                                                  समीक्षक : सुषमा देव