पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अथवा भौतिक पुराव्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील मानवांच्या वैचारिक क्षमतेचा अभ्यास करणे, याला ‘बोधनिक पुरातत्त्वविज्ञानʼ (Cognitive Archaeology) किंवा ‘आकलनाचे पुरातत्त्वविज्ञानʼ असे म्हणतात. ही पुरातत्त्वविद्येची तुलनेने अलीकडची एक उपशाखा आहे. प्राचीन मानवांची कला आणि लेखन यांच्या अभ्यासातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेची आणि आकलनशक्तीची माहिती मिळते. अशा प्रकारचे संशोधन अनेक दशके केले जात असले, तरी याविषयी प्रामुख्याने कला इतिहास व घटनांचे वर्णन अशा अंगाने पाहिले जात असे व त्यांत पुरातत्त्वीय दृष्टिकोनाचा अभाव होता. पुरातत्त्वीय संशोधनात अनेक वस्तू मिळतात. त्यांत प्रामुख्याने दैनंदिन वापराच्या वस्तू व काही प्रतीकात्मक वस्तूही असतात. अशा पुरावस्तूंचा उपयोग प्राचीन काळात कशा प्रकारे केला जात असावा, याची मांडणी करणे हे बोधनिक पुरातत्त्वविज्ञानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. प्रक्रियावादी पुरातत्त्वानुसार भूतकाळातील माणसे कशा प्रकारे विचार करीत होती आणि अशा विचारांचा व त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावता येईल, याची पद्धत विेकसित करणे गरजेचे आहे; तथापि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाच्या काही समर्थकांच्या मते, बोधनिक पुरातत्त्वविज्ञानात पूर्वीच्या काळात लोक कसा विचार करत असतील याची कल्पना करून एकप्रकारे त्यांच्या मनात शिरणे आणि भूतकाळातील प्रतीकांचा अनुभव घेणे आवश्यक आहे. अर्थातच असे करणे म्हणजे सिद्ध न करता येण्याजोगी व्यक्तिसापेक्ष विधाने करणे होय. बोधनिक पुरातत्त्वीय निष्कर्षांची एक मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे. विचार आणि बोलीभाषा यांचे थेट पुरावे उपलब्ध नसल्याने बोधनिक पुरातत्त्वविज्ञानात मानवशास्त्र, भाषाशास्त्र आणि पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे प्राचीन विचारप्रक्रियेची प्रारूपे बनविली जातात.

बोधनिक पुरातत्त्वाचे दोन भाग पडतात : आपल्या मानवजातीच्या (होमो सेपिएन्स) अगोदर ज्या मानवसदृश (उदा., ऑस्ट्रॅलोपिथेकस)आणि इतर मानवजाती (उदा., होमो इरेक्टस) होत्या, त्यांच्यामधील आकलनक्षमतेच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. कारण स्वभान आणि भाषेचा वापर यांचा उगम होमो सेपिएन्सच्या अगोदर झालेला आहे. चिंपँझींना मानवी भाषा शिकविण्याच्या प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे की, हे प्राणीदेखील माणसांप्रमाणे भाषिक कौशल्याचा काही भाग आत्मसात करू शकतात. त्यांना बोलता येत नसले, तरी ते खाणाखुणा वापरण्याचे तंत्र शिकू शकतात. बोधनिक पुरातत्त्वाचा दुसरा भाग आपल्या मानवजातीमधील आकलनक्षमतेच्या उत्क्रांतीशी संबंधित आहे. होमोसेपिएन्समध्ये प्रतीकांचा वापर करून परस्परसंवादाची कला आणि बोलण्याची भाषिक क्षमता पूर्ण विकसित झाली. तसेच उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मेंदूमध्ये कसकसे बदल घडत गेले, याचा अभ्यास बोधनिक पुरातत्त्वविज्ञानात केला जातो. अधिक प्रगत आकलनक्षमतेचा संबंध जगभरात अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या लेखनकलेशी, कलात्मक दृष्टिकोनाशी, काळ या संकल्पनेशी, नियोजन करण्याच्या क्षमतेशी आणि धर्मविषयक संकल्पनांशी आहे. साहजिकच पुरातत्त्वीय माहितीखेरीज भाषाशास्त्र, मानसशास्त्र, मेंदूवरच्या जीववैज्ञानिक संशोधनातून मिळणारी माहिती आणि मानवेतर प्रायमेट गणातील प्राण्यांमधील आकलनक्षमता व त्यांचे वर्तन या सगळ्यांचा विचार बोधनिक पुरातत्त्वविज्ञानात केला जातो.

संदर्भ :

  • Croft, William ‘Evolutionary Linguisticsʼ, Annual Review of Anthropology, 2008.
  • Donald, Merlin Origins of the Modern Mind : Three Stages in the Evolution of  Culture and Cognition, Cambridge, Massachusetts, 1991.
  • Griffin, Donald Animal Minds, Chicago, 2001.
  • Kemmerer, David; Allan, K. Ed. Neurolinguistics Mind, Brain and Language,  2014.
  • Mithen, S. The Prehistory of the Mind, London,1996.
  • जोगळेकर, प्रमोद ‘प्राण्यांमधील माणसेʼ, विज्ञानयुग, १९९९.

समीक्षक – सुषमा देव

प्रतिक्रिया व्यक्त करा