महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन किल्ला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून ३५ किमी. अंतरावर हा किल्ला असून पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखावर एका उंच भूशिरावर तो वसलेला आहे. हिम्मतगड तसेच फोर्ट व्हिक्टोरिया या नावानेही हा किल्ला ओळखला जातो.

दोन बुरुजांमधील मुख्य दरवाजा, बाणकोट.

मंडणगड ते वेळास या राज्य महामार्गावर उमरोली आणि वेश्वीगावापासून पुढे बाणकोट गावात असून येथून छोट्या घाट रस्त्याने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. गडाकडे जाणारा हा घाट रस्ता दाट आमराईतून बाणकोट टेकडीच्या माथ्यावरील पठारावर जातो. पठारावर प्रथम गडाच्या मागील बाजूचा तट, बुरूज व तटाखालील खंदक दिसून येतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार पठाराच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच उत्तरेला आहे. जमिनीकडील बाजूने सहजासहजी किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये म्हणून १० फूट खोल व १५ फूट रुंद असा खंदक खोदलेला आहे. अशा प्रकारचा खंदक कोकणातील जयगड, देवगड, यशवंतगड इत्यादी किल्ल्यांनाआहे. जांभा दगडात खोदलेला हा खंदक गडाच्या फक्त आग्नेयेकडील भागातच आहे. खंदक अर्धवट बुजलेल्या स्थितीत आहे. खंदक आणि किल्ल्याची तटबंदी डावीकडे ठेवून गडाला उजवीकडे वळसा घालत पुढे चालत रहावे. तटबंदी व बुरुजाच्या डावीकडून पुढे मुख्य दरवाजाजवळ जाता येते. दरवाजासमोरच समुद्रदर्शन होते. गडाच्या दरवाजातून उत्तरेकडे सावित्री नदीच्या पलीकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. गडाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून दोन बुरुजांमध्ये बांधलेला दरवाजा अद्यापही पूर्णावस्थेत टिकून आहे. दरवाजापासून पायऱ्यांची वाट समुद्रापर्यंत उतरते. पायऱ्या बुजलेल्या स्थितीत दिसतात. पायऱ्या संपल्यावर समुद्राजवळ गडाच्या पडकोटाचा भाग आहे. पडकोटात बुरूज व तटबंदीचे अवशेष दिसतात.

मुख्य दरवाजाची कमान शिल्लक असून दरवाजावर गणेशपट्टी आहे. त्यावर गणेशाची प्रतिमा पूर्वी असावी, पण सध्या ती अस्पष्ट दिसते. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. किल्ल्यात खूप वेली व झाडे वाढलेली होती. किल्ल्याच्या आतील भागात जास्त प्रमाणात वसाहत करता येईल अशी सपाटी नाही. किल्ल्यात चारही बाजूने तटबंदीच्या भक्कम भिंती दिसतात. बांधकामाची दोन मोठी जोती किल्ल्यात आहेत. तसेच पश्चिमेकडे एक विहीरदेखील आहे. या विहिरी शेजारील तटबंदीमध्ये एक पश्चिमाभिमुख चोर दरवाजा आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती साधारण ३ ते ३.५ फूट जाड असून त्यावर चालण्यासाठी फांजी बांधलेली आहे. किल्ल्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचे बंगले होते. या बंगल्यांची जोती किल्ल्यात पाहायला मिळतात. चोर दरवाजाच्या बाहेर समुद्राकडील उतारावर आर्थर मॅलेटनामक ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी व नवजात मुलीचे स्मारक, मॅलेट मेमोरियल आहे. या दोघींचा बाणकोट खाडीत वादळात नाव सापडल्यामुळे बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलेले आहे. या सर्व वास्तू खूप दाट झाडीत असल्यामुळे चटकन दिसत नाहीत. स्मारकाचा २० फूट उंचीचा सुबक कलाकृतींचा स्तंभ मात्र लक्ष वेधून घेतो. हा स्तंभ किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीवरून दिसू शकतो. किल्ल्याला एकूण ८ बुरूज आहेत.

मुख्य दरवाजाची कमान.

हा किल्ला पूर्णपणे शिलाहार काळातच बांधल्याचा भक्कम पुरावा नाही. निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला विजापूरकरांच्या आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. इ. स.  १५४८ साली पोर्तुगीजांनी हा किल्ला घेतला व बाणकोट गावात जाळपोळ केली. नंतर किल्ला हबशांकडे किंवा मराठ्यांकडे केव्हा गेला याची माहिती मिळत नाही. ७ मार्च १७३३ रोजी संभाजी आंग्रे यांनी सागरामार्गे बाणकोट घेण्याची तयारी सुरू केली. यामध्ये छ. शाहू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे महाडमधून हरी मोरेश्वर हे देखील आंग्रेंच्या मदतीला गेले. २३ मे १७३३ रोजी आंग्रे यांचे सरदार बंकाजी नाईक महाडिक यांनी बाणकोट जिंकून घेतला. ४ सप्टेंबर १७३३ मध्ये बाणकोट किल्ल्याचा अधिकारी हरजी नाईक कदम याने बाजीराव पेशव्यांना पत्र लिहून सरखेल कान्होजी निवर्तल्यानंतर किल्ल्याच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. २२ सप्टेंबर १७३३ रोजी सेखोजी आंग्रे बाणकोटात होते, अशी माहिती आंग्रेशकावलीत आहे. इ. स. १७५५ मध्ये कमांडर जेम्स या इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजी आंग्य्रांकडून बाणकोट जिंकून त्याचे ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ असे नामकरण केले. पुढे मराठे-इंग्रज तहानुसार इंग्रजांनी बाणकोट मराठ्यांना परत दिला व मराठ्यांनी ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ नाव बदलून पुन्हा ‘हिम्मतगड’ असे ठेवले. २०१८ पासून राज्य पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यावर जतन व संवर्धनाचे काम चालू आहे.

 

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले, भाग – २, पुणे, १९०५.
  • जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.

                                                                                                                                                                              समीक्षक : जयकुमार पाठक