बार्बरा जे. फिनलेसपिट्स : ( ४ एप्रिल, १९४८ )

बार्बरा जे. फिनलेस – पिट्स या रसायनशास्त्रज्ञ असून हवेचे प्रदूषण हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. त्यांचा जन्म कॅनडामधील ओटावा शहरात झाला. १९७० मध्ये कॅनडामधील पीटरबरो, ऑन्टेरियो येथील ट्रेंट विद्यापीठातून विज्ञान विषयातील पदवी मिळाल्यानंतर अमेरिकेतील रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी १९७१ साली मास्टर्स तर १९७३ साली रसायनशास्त्रात पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर तेथेच त्यांना संशोधनासाठी अधिछात्रवृत्ति (Research Fellowship) मिळाली. १९७४ ते १९९४ या कालावधीत कॅलिफोर्निया विद्यापीठ (फुलेट्रोन) येथे त्यांनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर कॅलिफोर्निया (आयर्विन) विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात त्या रुजू झाल्या. सध्या त्या तेथेच कार्यरत आहेत. ‘एअर यूसीआय’ या हवा अभ्यास संस्थेच्या त्या सहसंचालकही आहेत.

हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांना जगभरात दरवर्षी लाखो लोक बळी पडत असतात. यावरील नियंत्रणासाठी वातावरणात असलेल्या कणांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रियांची उकल होणे गरजेचे असते. बार्बरा पिट्स यांनी आपले संशोधन वातावरणात असलेल्या कणांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रिया तपासून हवा प्रदूषणाचे रसायनशास्त्र उलगडणे यावर केंद्रित केले. त्यामुळे प्रदूषणाच्या आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान फार मोलाचे आहे.

वातावरणातील विविध स्तरांमधील असंख्य वायू कणांच्या रेण्वीय क्रिया या मूलत: वातावरण प्रदूषणाला कारणीभूत असतात. बार्बरा फिनलेस पिट्स व त्यांचे सहकारी यांचे या रेण्वीय क्रिया व पर्यावरणात प्रकाश रासायनिक प्रदूषणाच्या रासायनिक प्रक्रिया यावर महत्त्वाचे संशोधन करत आहेत. वातावरणात नायट्रिक ऑक्साईडचे रुपांतर नायट्रोजन ऑक्साईडमध्ये कसे होते, ओझोन, नायट्रिक आम्ल व कार्बनी नायट्रेटस कसे तयार होतात यावरील त्यांचे संशोधन देखील महत्त्वाचे आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून नायट्रोजन ऑक्साईडस बाहेर टाकले जातात. ते वायुरूप हायड्रोजन क्लोराईडशी अभिक्रिया करतात. त्यातून वातावरणात धुक्याची निर्मिती करणारी संयुगे निर्माण होतात. घातक रसायने यात मिसळून काळे धुकेही तयार होते. पाण्याची वाफही या अभिक्रियेस मदत करत असते. या बाबींचा उल्लेख त्यांच्या २००९ मधील शोधनिबंधात आला आहे. आपल्या सभोवतालच्या हवेत क्लोरीन-नायट्रोजन संयुगे बनत असतात. त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाईट पद्धतीने होत असतो हे देखील त्यांनी दाखवून दिले आहे.

वातावरणाच्या वरच्या व खालच्या स्तरामधील रासायनिक प्रक्रियांच्या हवा प्रदूषण व हवा बदल यातील सहभागाची उकल करताना वातावरणातील विविध स्तरांवरील वायू कणांच्या रेणवीय क्रियांवर त्यांचा गट संशोधन करत आहे.

आपल्या २०१० मधील शोधनिबंधामध्ये वातावरणातील खालच्या स्तरावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमधील हॅलोजन या वायूचा सहभाग त्यांनी स्पष्ट केला. तसेच क्लोरीनचे आयन हे ओझोन निर्मितीस पोषक असतात तर ब्रोमिनचे आयन त्याचा नाश करतात हा महत्त्वाचा निष्कर्षही त्यांनी मांडला. त्यातून वातावरणातील ओझोन थराच्या ऱ्हासाचे कोडे उलगडण्यास मदत झाली.

हवामान बदलाचा मुद्दा व त्यामुळे एकूणच पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर होणारे त्याचे घातक परिणाम याबाबतची सजगता वाढत असली तरी त्याबाबत अजूनही आवश्यक ती कार्यवाही होताना दिसत नाही. बार्बरा या मात्र हवामान बदलाबद्दल सतत धोक्याचा इशारा देऊन या समस्येचे निराकरण करण्याकरिता अमेरिकेत व जगभरात सर्व स्तरांवर पाठपुरावा करत आहेत.

वातावारणीय रसायनशास्त्र (Atmospheric Chemistry) या विषयावरील २०० पेक्षा अधिक शोधनिबंधांच्या त्या लेखिका किंवा सहलेखक आहेत. तसेच या विषयावरील दोन पुस्तकांचे त्यानी कै. जेम्स ए. पिट्स या आपल्या पती समावेत सहलेखन केले आहे.

बार्बरा यांच्या रसायनशास्त्र व हवा प्रदूषणाबाबतच्या संबंधातील महत्त्वपूर्ण संशोधन व योगदानाबद्दल त्याना ब्रिटनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या संस्थेचा पर्यावरण पुरस्कार देण्यात आला. त्याशिवाय अमेरिकन केमिकल सोसायटीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत, त्यातील काही पुरस्कार असे – अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिछात्र (Fellow) म्हणून निवड, अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ऑरेंज कौंटी विभागाचा ‘रसायनशास्त्र माध्यमातून सेवा (Service Through Chemistry)’ पुरस्कार, अमेरिकन केमिकल सोसायटीचा पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञानातील क्रिएटिव्ह ॲडव्हान्सेससाठीचा पुरस्कार, वैज्ञानिक नेतृत्व आणि तांत्रिक उत्कृष्टतेसाठीचा (Coalition for Clean air) कार्ल मोयर पुरस्कार आणि अमेरिकन केमिकल सोसायटीचे गार्वेन-ओलीन (Garven-Olin) पदक.

संदर्भ :

समीक्षक : सुधाकर आगरकर