प्राचीन काळातील समाज व जीवन यांच्याकडे मार्क्सवादाची तत्त्वे वापरून पाहण्याचा एक दृष्टीकोन. पुरातत्त्वाची ही वेगळी शाखा नसून पुरातत्त्वीय पुराव्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठीची एक विशिष्ट सैद्धांतिक मांडणी आहे. मार्क्सवाद म्हणजे साम्यवादी विश्वक्रांतीचे कृतिशील पुरस्कर्ते आणि साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचे मूळ प्रणेते कार्ल मार्क्स (१८१८—१८८३) आणि त्यांचे सहकारी व सहलेखक फ्रीड्रिख एंगेल्स (१८२०—१८९५) यांनी प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली होय.

पुरातत्त्वात मार्क्सवादाची तत्त्वे वापरण्याचे अनेक टप्पे आढळतात. पहिला टप्पा हा रशियात साम्यवादी (बोल्शेविक) क्रांती झाल्यानंतरचा असून तो सु. १९२० ते १९६० असा आहे. या क्रांतीनंतर तयार झालेल्या सोव्हिएत महासंघातील पुरातत्त्वज्ञांना पुरातत्त्वीय अभ्यासात मार्क्सवादाची तत्त्वे उपयोगात आणणे भाग होते. उत्खननात मिळणाऱ्या वस्तू आणि आर्थिक-सामाजिक रचनासंबंधी निष्कर्ष यांची थेट सांगड घालण्यासाठी मार्क्सवाद पुरेसा आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. त्यामुळे प्राचीन काळातील विविध सामाजिक वर्गांच्या इतिहासाकडे बघण्यासाठी पुरातत्त्वीय सोडून इतर कोणत्याही पुराव्यांची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती. प्रारंभीच्या काळात अशी भूमिका घेणाऱ्यांमध्ये आर्टिमी आर्टसिखोव्हस्की (१९०२-१९७८) आणि बोरिस रिबाकोव (१९०८-२००१) हे मॅास्को विद्यापीठातील पुरातत्त्वज्ञ अग्रेसर होते. सोव्हिएत महासंघातील पुरातत्त्वीय संशोधनांवर व्लादिस्लाव रावडोनिकास (१८९४-१९७८) या लेनिनग्राडमधील (सेंट पीटर्झबर्ग) मार्क्सवादी पुरातत्त्वज्ञांचा मोठा प्रभाव दीर्घकाळ होता.

कोणत्याही मानवी समाजाची रचना आणि वैशिष्ट्ये ही त्या समाजाच्या उत्पादनाच्या पद्धतीवर (mode of production) अवलंबून असतात असे, मार्क्सवादी विचारसरणीत मानले जाते. त्यात उत्पादनासंबंधी घटक (विज्ञान-तंत्रज्ञान आणि इतर सर्व मानवी आणि नैसर्गिक संसाधने) आणि उत्पादनासंबंधी परस्परसंबंध (म्हणजे उत्पादन करणे आणि उत्पादित वस्तूंचे सुलभ वितरण करण्यासाठीच्या साखळीतील घटक) यांचा समावेश होतो. कार्ल मार्क्स यांनी इतिहासाकडे बघताना सर्वस्वी वेगळा दृष्टीकोन वापरला. त्यांनी ऐतिहासिक साधने वापरून उत्पादन पद्धतीशी निगडित आर्थिक-सामाजिक रचनेचे अनेक प्रकार असतात, असे सांगितले. भांडवलशाहीचा उदय होण्याआधी कोणतीही वर्गव्यवस्था नसलेला व शोषण नसलेला प्राथमिक साम्यवाद (Primitive Communism), सरंजामशाहीतील गुलामी व शोषणावर आधारीत उत्पादन व्यवस्था (feudalism) आणि आशियातील उत्पादन पद्धतीवर (Asiatic mode of production) आधारलेली सामाजिक रचना असे आर्थिक-सामाजिक रचनांचे प्रकार अस्तित्वात होते. कार्ल मार्क्स यांच्या विचारसरणीला ऐतिहासिक भौतिकवाद (Historical materialism) असे म्हणतात. मानवाचा इतिहास हा शोषण करणारे आणि शोषण केले जाणारे या वर्गामधील संघर्षाचा इतिहास आहे आणि अशा संघर्षातूनच विकास होतो, हे विरोधविकासाचे तत्त्व (Dilectic) हा मार्क्सवादाचा मुख्य गाभा आहे. अखेर संघर्षातून शासनाची गरज नसलेला आणि कोणाचेच शोषण न होणाऱ्या सामाजिक दृष्ट्या समान असलेल्या व्यक्तींचा समाज निर्माण करणे, हे मार्क्सवादाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुरातत्त्वीय संशोधनात श्रमजीवी अथवा श्रमिक वर्गाच्या (Proletariat) अभ्यासाकडे आणि वर्गसंघर्षातूनच घडणाऱ्या सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष होते, कारण जगभरात सर्वत्र पुरातत्त्वीय संशोधन हे प्रामुख्याने मध्यमवर्गीय जाणिवांशी निगडित आहे आणि ते बुर्झ्वा वर्गाच्या (Bourgeois) हातात आहे, असे मार्क्सवादी विचारांचा पुरस्कार करणारे पुरातत्त्वज्ञ मानतात.

मार्क्सवादी विचारांत पाश्चात्त्य पुरातत्त्वज्ञांमध्ये व्ही. गॉर्डन चाइल्ड (१८९२-१९५७) या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञांचे नाव अग्रणी आहे. त्यांच्यावर मार्क्सवादी सिद्धांतांचा मोठा प्रभाव होता. विशेषतः प्रागैतिहासिक काळातील अर्थव्यवस्थेवर आणि राजकीय विचारसरणीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये उत्पादनासंबंधी घटक हे सर्वांत महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. तथापि सोव्हिएत महासंघातील मार्क्सवादी पुरातत्त्वीय सिद्धांतापेक्षा सामाजिक बदलाचे साधन कोणते असते याबद्दलची चाइल्ड यांची भूमिका वेगळी होती. उत्पादनासंबंधी घटक, विशेषतः तंत्रज्ञान आणि संकल्पना, या अभिसरणाने (diffusion) पसरतात आणि ते सामाजिक व आर्थिक बदलांचे कारण असते, असे त्यांचे मत होते.

पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात १९६० ते १९८० दरम्यान नवपुरातत्त्व या भूमिकेचा उदय झाल्यानंतर पुरातत्त्वज्ञांमध्ये प्रचंड वैचारिक घुसळण सुरू झाली. याच काळात मोठ्या प्रमाणात सैद्धांतिक चर्चा घडून येत असताना मार्क्सवादी तत्त्वांचा उपयोग पुरातत्त्वीय अन्वेषणांसाठी करावा ही विचारसरणी नव्याने पुढे आली. याला १९६०-७० या दशकातील मार्क्सवादाची नव्याने मांडणी करण्याचा आग्रह धरणाऱ्या फ्रेंच नव-मार्क्सवादाची अथवा संरचनावादी मार्क्सवादाची (Structural Marxism) बैठक होती. फ्रेंच मानवशास्त्रज्ञांनीही या भूमिकेचा स्वीकार केला होता. नव-मार्क्सवाद आणि पारंपरिक अथवा कर्मठ मार्क्सवाद यांत एक महत्त्वाचा फरक आहे. विचारधारांची अधिरचना (Ideological Superstructure) ही संपूर्णपणे आर्थिक पाया अथवा पायाभूत संसाधनांवर अवलंबून असते, असे कर्मठ मार्क्सवादात मानले जाते; तथापि यामधील एक कारण आहे असे मानून दुसरी गोष्ट त्याचा परिणाम आहे असे न मानता नव-मार्क्सवादात दोन्हीला समान महत्त्व दिले जाते.

फ्रीडमन आणि रोलॅन्ड्स यांनी नव-मार्क्सवादावर आधारित संस्कृतीच्या ‘उत्क्रांतीचे’ एक प्रारूप बनवले असून (१९७८) त्यात त्यांनी भिन्नभिन्न सामाजिक गटांमधील तणाव आणि झगडे यांना महत्त्व दिले आहे. अँटोनियो गिलमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पेन आणि पोर्तुगालमधील नवाश्मयुगीन आणि कांस्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळांचा अभ्यास करून (१९८१) समतेवर आधारित समाजापासून ते सत्तेची उतरंड असलेल्या सामाजिक रचनेचा उदय कसा झाला, याचे स्पष्टीकरण दिले. समाजातील प्रमुखांनी बळाचा वापर करून सत्ता मिळविली आणि ती टिकवत असताना त्यांनी अशा अभिजनांनी गरीब वर्गांचे सतत शोषण केले ही सिद्धांत कल्पना वापरून काढलेले त्यांचे निष्कर्ष हे नव-मार्क्सवादी पुरातत्त्वाचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

चाइल्ड यांच्याप्रमाणे पुढील काळात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अनेक पाश्चात्त्य पुरातत्त्वज्ञांनी (उदा., स्प्रिग्स १९८४) सोव्हिएत शैलीच्या मार्क्सवादापेक्षा नव-मार्क्सवादाचा अंगीकार केला. अशा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आधुनिक मार्क्सवादी पुरातत्त्वीय दृष्टीकोनामध्ये पूर्वीच्या सोव्हिएत महासंघातील पुरातत्त्वीय विश्लेषणात दिसत असे तसा राजकीय आशय जवळजवळ दिसत नाही. या खेरीज विसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर आणखी एक महत्त्वाचा फरक पडला आहे, तो म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरीस मार्क्सवादी पुरातत्त्वीय दृष्टीकोन असा पूर्णपणे अलग काढता येण्याजोगा राहिलेला नाही. अनेक संशोधनांमध्ये मार्क्सवादामधील आर्थिक सिद्धांत, सामाजिक घटकांमधील संबंध, वर्ग आणि शोषणाच्या संकल्पना आणि सामाजिक रचना यांचे अनेक पैलू हे ज्यांना ‘मार्क्सवादी’ असे स्पष्टपणे म्हणता येणार नाही, अशा इतर पुरातत्त्वीय विचारधारांमध्ये समाविष्ट झालेले दिसतात.

संदर्भ :

  • Akin, Soner, ‘A Review on the Roots of Marxist Approach in Archaeology’, International Journal of Archaeology, 3 (4) : 33-38. 2015.
  • Iacono, Francesco, ‘Marxist Archaeologies’, The Oxford Handbook of Archaeological Theory (Andrew Gardner, Mark Lake & Ulrike Sommer Eds.), Oxford Handbooks Online, 2018.
  • McGuire, Randall H. A Marxist Archaeology, San Diego, 1992.
  • Spriggs, M. Ed.,  Marxist Perspectives in Archaeology, Cambridge, 1984.
  • Trigger, Bruce G. A History of Archaeological Thought, New York, 2007.

                                                                                                                 समीक्षक : सुषमा देव