पुरातत्त्वविद्येची एक शाखा. ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींकडे किंवा आधुनिक जगाच्या इतिहासाकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून पाहता येते, तर अगदी नजीकच्या काळातील घटना आणि घडामोडींकडेही तसेच बघता येईल या कल्पनेतून समकालीन पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येची शाखा उदयास आली. विसावे शतक आणि एकविसाव्या शतकाची सुरुवात ही या शाखेची व्याप्ती आहे. हा आधुनिक कालखंडच असल्याने समकालीन पुरातत्त्व हा आधुनिक काळाच्या पुरातत्त्वाचा एक भाग आहे. काही अभ्यासक यात फक्त दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळाचा समावेश करतात, कारण आधुनिक काळ संपून दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर आधुनिक जगाचा उदय (Post-Modern World) झाला, असे ते मानतात.

शीतयुद्धाच्या काळातील बर्लिन भिंतीचे अवशेष.

समकालीन पुरातत्त्वीय अभ्यासाला १९६०-१९७० या दशकात प्रारंभ झाला असला, तरी या शाखेची सैद्धांतिक जडणघडण होण्याची सुरुवात एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी झाली आहे. समकालीन पुरातत्त्वाची मूळ चौकट कायम ठेवून (पुरातत्त्वीय अवशेषांना अन्वेषणात अधिक महत्त्वाचे स्थान असणे) या शाखेत इतर माहिती स्रोत (उदा., मौखिक इतिहास) व अन्वेषणाचे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणले जाते.

विसावे शतक हे असंख्य घडामोडींचे होते आणि त्यातल्या अनेक घडामोडी हिंसक होत्या. या शतकातच दोन महायुद्धे लढली गेली आणि शीतयुद्धाच्या काळात जगभरात अनेक ठिकाणी (उदा., कोरिया, व्हिएतनाम, अफगाणिस्तान) संघर्ष घडून आले. या शतकात सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानात (लोकोपयोगी व विध्वंसक) विलक्षण प्रगती झाली. अणुऊर्जा तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॅानिक्स, संगणक, अब्जांश तंत्रज्ञान अशा कितीतरी नवीन क्षेत्रांचा उदय झाला. तसेच जगभरात अनेक मोठमोठी महानगरे उदयाला आली आणि हवाई प्रवासामुळे जगभरात व्यापार व लोकांच्या हालचालींचे प्रमाण प्रचंड वाढले. या सर्व घडामोडींचा भौतिक अवशेषांच्या माध्यमातून वेध समकालीन पुरातत्त्वात घेतला जातो. त्यामुळे रणभूमी पुरातत्त्व, शीतयुद्धाचे पुरातत्त्व, बंदिछावण्यांचे पुरातत्त्व, जनसंहाराचे पुरातत्त्व व औद्योगिक पुरातत्त्व हे विषय समकालीन पुरातत्त्वात समाविष्ट आहेत. या खेरीज जनसमूहांच्या स्थलांतराचा व विस्थापितांचा अभ्यास, कृषी क्षेत्रातील ट्रॅक्टर व अभियांत्रिकी विकासाचा मागोवा, उद्योगधंदे व कारखान्यांचा अभ्यास, संदेशवहन तंत्रज्ञानाचा विकास, चित्रपट व प्रसार माध्यमांमधील तंत्रज्ञान, मुद्रणकलेतील तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञानाचा विकास, उपग्रहांचे तंत्रज्ञान व अणुऊर्जा तंत्रज्ञान अशा अनेक नवनवीन विषयांचा समावेश समकालीन पुरातत्त्वात केला जात आहे. समकालीन पुरातत्त्वातील संशोधनासाठी २०१३ मध्ये जर्नल ऑफ कन्टेम्पररी आर्किऑलॅाजी हे नियतकालिक सुरू झाले.

सेमीपलाटिंस्क (कझाकस्तान) येथील अणुचाचण्यांची जागा.

ज्या बाबतींत भरपूर लिखित पुरावे आहेत, अशा ठिकाणीही समकालीन पुरातत्त्वीय अभ्यासातून वेगळी माहिती मिळू शकते, हे दाखवणारे एक उदाहरण बर्लिनमधील एका लष्करी गुप्तवार्ता केंद्राचे आहे. शीतयुद्धाच्या काळात काम चालणारे हे केंद्र १९९२ मध्ये बंद झाल्यानंतर त्याचे उत्खनन करण्यात आले. शीतयुद्धाच्या काळातील स्टासी या पूर्व जर्मन गुप्तचर यंत्रणेने बरीचशी कागदपत्रे नष्ट केल्यामुळे पुरातत्त्वीय संशोधनातून मिळालेली माहिती मोलाची ठरली.

नजीकच्या काळातील समस्यांसाठी पुरातत्त्वीय पद्धत वापरून काढलेले निष्कर्ष उपयुक्त ठरतात, हे दाखवणारे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण अमेरिकन समकालीन पुरातत्त्वात आहे. ॲरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी १९७० नंतरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा अभ्यास केला. उत्पादन होणारे अन्न प्रत्यक्ष घरात येते तेथपर्यंत किती अन्नाची नासाडी होते आणि घरांमध्येही किती अन्न वाया जाते याबद्दल उत्कृष्ट सांखिकी माहिती पुरातत्त्वीय संशोधनातून मिळाली. या माहितीचा अन्नाची नासडी कमी करण्यासाठीच्या धोरणात्मक नियोजनात झाला.

 

संदर्भ :

  • Belford, Paul, ‘Contemporary and Recent Archaeology in Practice’, Industrial Archaeology Review, 36(1): 3-14, 2014.
  • Cocroft, W. & Schofield, G. ‘The Secret Hill : Cold War Archaeology of the Teufelsberg’, British Archaeology, 126 : 38-43, 2012.
  • Gonzalez-Ruibal, Alfredo, An Archaeology of the Contemporary Era, Routledge, 2018.
  • Orser, Charles E. Jr. A Historical Archaeology of the Modern World, Springer, 1996.
  • Saunders, Nicolas J. ‘Excavating Memories : Archaeology and the Great War, 1914-2001’, Antiquity, 76 : 101-108, 2001.

                                                                                                                                                                                         समीक्षक : सुषमा देव