चाइल्ड, व्हेरे गॉर्डन : (१४ एप्रिल १८९२ — १९ ऑक्टोबर १९५७). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लिश वंशाचे रेव्हरंड स्टीफन एच. चाइल्ड आणि हॅरिएट एलिझा या दांपत्यापोटी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स, सिडनी येथे झाला. चाइल्ड यांनी पुरातत्त्वविद्येचे तांत्रिक शिक्षण घेतले नव्हते, तर ते अभिजात साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. सिडनी विद्यापीठात शिकत असताना त्यांचा हेगेल, एंगेल्स आणि मार्क्स यांच्या लेखनाशी संबंध आला (१९११-१४).
चाइल्ड यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अभिजात साहित्याचे अध्ययन पूर्ण केले आणि ते ऑस्ट्रेलियाला परतले (१९१६). तथापि डाव्या चळवळीशी संबंध, समाजवादी बाजूचे लेखन आणि युद्धविरोधी मतांमुळे त्यांना सतत पोलीस चौकशी व नोकरीतून हकालपट्टी अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागले (१९१६-२१). अखेर त्यांनी डाव्या विचारसरणीच्या लेबर पक्षात नोकरी केली (१९१९-२२). त्यानंतर इंग्लंडला गेल्यावर चाइल्ड डाव्या विचारसरणीच्या लिबरल पक्षाच्या संसद सदस्याचे खासगी सचिव होते (१९२२-२७). यांतून चाइल्ड यांच्या डाव्या विचारसरणीची जडणघडण झाली. तसेच १९३४ पासून सोव्हिएत महासंघ आणि पूर्व यूरोपमध्ये त्यांनी दिलेल्या भेटींमुळे मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा त्यांचा पाया भक्कम झाला.
चाइल्ड यांना स्कॉटलंडमधील एडिंबरा विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी निमंत्रित करण्यात आले (१९२७). तेथे ते १९४६ पर्यंत कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक उत्खनने केली. पुढे ते लंडन येथे इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॅाजीत संचालक आणि प्राध्यापक या पदांवर रुजू झाले आणि तेथे ते १९५६ पर्यंत होते. नवीन संचालकाला संस्थेची पुढील वाटचाल आपल्या मनासारखी करता यावी, म्हणून त्यांनी एक वर्ष अगोदरच निवृत्ती घेतली. १९५७ मध्ये ते ऑस्ट्रेलियाला परतले. माउंट व्हिक्टोरिया (न्यू साउथ वेल्स) येथील एका कड्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.
डेव्हिड हॅरिस यांनी चाइल्ड यांच्या पुरातत्त्वीय संशोधनाचा आणि त्यांच्या सैद्धांतिक मांडणीचा अभ्यास करून त्यांचे योगदान तीन प्रकारचे आहे, असे दाखवून दिले : १. संस्कृतींचे स्वरूप आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्व, २. सांस्कृतिक उत्क्रांती आणि ३. इतिहासाचे मार्क्सवादी स्पष्टीकरण. चाइल्ड यांच्या द डॉन ऑफ यूरोपियन सिव्हिलायझेशन (१९२५) या ग्रंथात सांस्कृतिक इतिहासाचा दृष्टिकोन आहे. द मोस्ट एन्शंट ईस्ट (१९२८) या ग्रंथात सांस्कृतिक अभिसरण (diffusion) ही संकल्पना मध्यवर्ती होती. द मोस्ट… आणि द ब्राँझ एज (१९३०) या त्यांच्या ग्रंथांत पुरातत्त्वीय विवेचन ज्या गृहित कालक्रमावर आधारलेले होते, त्यात कार्बन-१४ कालमापन पद्धतीच्या शोधानंतर फरक पडला; तथापि चाइल्ड यांच्या संस्कृतींच्या उत्क्रांती संबंधी वैचारिक बैठकीचे महत्त्व पुरातत्त्वविद्येत कायम राहिलेले दिसते. विशेषतः प्राचीन काळाचे गौरवीकरण न करता पुरातत्त्वीय पुराव्यांचा आढावा घेऊन पुराश्मयुगीन यूरोपीय संस्कृतींचे वस्तुनिष्ठ वर्णन करणे, ही त्यांची भरीव कामगिरी होती.
चाइल्ड यांच्या सुप्रसिद्ध ‘क्रांती’ या संकल्पनेचे पहिले विवेचन त्यांच्या न्यू लाइट ऑन द मोस्ट एन्शंट ईस्ट (१९३४) या ग्रंथात आढळते. औद्योगिक क्रांतीमुळे समाजात जसे आमूलाग्र बदल घडून आले, तसेच प्रचंड बदल नवाश्मयुगीन क्रांती आणि नागरी क्रांती यांच्यामुळे घडून आले होते, असे प्रतिपादन त्यांनी संपूर्ण यूरोपमधून जमा केलेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे केले. शिकार व अन्न गोळा करून जगणाऱ्या, टोळ्यांची समाजरचना असलेल्या पुराश्मयुगीन मानवी समाजांचे शेती व पशुपालनावर गुजराण करणाऱ्या स्थिर समाजांमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला नवाश्मयुगीन क्रांती अथवा कृषी क्रांती असे म्हणतात. शेती व पशुपालन करण्याची कल्पना प्रथम मध्य पूर्वेत उदयाला आली मग ती जगभर पसरली, असा सिद्धांत चाइल्ड यांनी मांडला. शेती आणि पशुपालनावर गुजराण करणाऱ्या समाजांचे गुंतागुंतीच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय रचना असलेल्या समाजांमध्ये कसे रूपांतर होते, या संबंधीच्या सिद्धांताला नागरी क्रांती असे म्हणतात. चाइल्ड यांनी नागरीकरणाची दहा वैशिष्ट्ये सांगितली होती. पुढील काळात ही वैशिष्ट्ये सर्वत्र उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर नागरीकरणाच्या सिद्धांतात बदल झाले. तसेच नवाश्मयुगातील अर्थव्यवस्थेतील बदल आणि खेडी, गावे ते शहरे असा नागरीकरणाचा प्रवास हे दीर्घकाळ चाललेल्या प्रक्रियेचा भाग होते, हे लक्षात आल्यामुळे आता या दोन्हींना ’क्रांती’ असे संबोधले जात नाही.
चाइल्ड यांच्या पुरातत्त्वीय कारकिर्दीचे एक महत्त्वाचे विश्लेषक ब्रूस ट्रिगर यांनी चाइल्ड यांच्या विचारांवर फ्रान्झ बोआस (१८५८—१९७२), आल्फ्रेड क्र्योबर (१८७६—१९६०) आणि ज्युलियन स्टेवर्ड (१९०२—१९७२) या तीन अमेरिकन मानवशास्त्रज्ञांचा प्रभाव असल्याचे दाखवून दिले. मानवशास्त्रातील संकल्पना आणि त्यांची मूळची समाजवादी विचारसरणी यांमधून चाइल्ड यांनी त्यांचा संस्कृतीचा विशिष्ट सिद्धांत तयार केला. या सिद्धांतात कोणत्याही संस्कृतीची ओळख ठरणारी लक्षणे होती आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानविषयक घटक होते. दोन भिन्न संस्कृतींमध्ये परस्परसंबंध येताना सांस्कृतिक लक्षणे नाही, तर तंत्रज्ञानविषयक ज्ञानाचे झपाट्याने अभिसरण होते, हे चाइल्ड यांच्या लक्षात आले. धातूसंबधी तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे उदाहरण घेऊन अभिसरणाचे विश्लेषण करताना चाइल्ड यांनी मानवी स्वभावाची मूळ प्रवृत्ती आणि विख्यात जर्मन तत्त्वज्ञ हेगेल (१७७०—१८३१) याच्या विरोधविकासाच्या तत्त्वाचा (Dilectic) उपयोग केला होता. प्रागैतिहासिक काळातील अर्थव्यवस्थेवर आणि राजकीय विचारसरणीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये उत्पादना संबंधी घटक हे सर्वांत महत्त्वाचे आहेत, हे त्यांचे प्रतिपादन मार्क्सवादी विचारधारेशी सुसंगत होते. तथापि सामाजिक बदलाच्या साधनाबद्दलची चाइल्ड यांची भूमिका तेव्हाच्या सोव्हिएत महासंघातील मार्क्सवादी पुरातत्त्वीय सिद्धांतापेक्षा वेगळी होती. विशेष म्हणजे चाइल्ड यांची मार्क्सवादी शैलीची पुरातत्त्वीय मांडणी पाश्चात्त्य पुरातत्त्वज्ञांना जहाल वाटत असली, तरी चाइल्ड हे बुर्झ्वा (Bourgeois) आहेत, असे तत्कालीन सोव्हिएत महासंघातील पुरातत्त्वज्ञांचे मत होते.
प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनासाठी आणि पाश्चात्त्य पुरातत्त्वामध्ये मार्क्सवादी सिद्धांतांचा सर्वप्रथम वापर करण्यासाठी चाइल्ड प्रख्यात ठरले. त्यांच्या विचारांचा, संशोधन पद्धतींचा आणि सिद्धांतांचा पुरातत्त्वविद्येवर अनेक दशके मोठा प्रभाव होता. अनेक अभ्यासकांनी त्यांचा विसाव्या शतकातील असामान्य प्रतिभेचा महान पुरातत्त्वज्ञ असा गौरव केला आहे.
संदर्भ :
- Greene, Kevin, ‘V. Gordon Childe and the vocabulary of revolutionary change’, Antiquity, 73: 97-109, 1999.
- Childe, V. G. The Dawn of the European Civilization, London, 1925.
- Childe, V. G. The Most Ancient Near East, London, 1928.
- Childe, V. G. The Bronze Age, New York, 1930.
- Childe, V. G. New Light on the Most Ancient Near East, New York, 1934.
- Harris, David R. Ed., The Archaeology of V. Gordon Childe : Contemporary Perspectives, Chicago, 1994.
- McNairn, Barbara, The Method and Theory of V. Gordon Childe, Edinburgh, 1980.
- Trigger, Bruce, Gordon Childe: Revolutions in Archaeology, London, 1980.
समीक्षक : सुषमा देव