हॉडर, इयन रिचर्ड : (२३ नोव्हेंबर १९४८). समकालीन पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रभाव असणारे आणि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचे अग्रणी, ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. त्यांचे वडील ब्रामवेल विल्यम हॉडर हे भूगोलाचे प्राध्यापक होते. इयन हॉडर यांनी बालपणी सिंगापूर आणि नायजेरियात भरपूर प्रवास केला होता. त्यांनी ऑक्सफर्डमध्ये मॅग्डालेन कॉलेज स्कूलमधून शिक्षण घेतले आणि लंडन विद्यापीठातून बी. ए. (१९७१) पदवी घेतली. पुरातत्त्वविद्येतील त्यांचे शिक्षण लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीत झाले. त्यानंतर ते केंब्रिजला गेले आणि केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ डेव्हिड क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त केली (१९७६).

हॉडर यांनी लीड्स विद्यापीठात व्याख्याता हे पद स्वीकारले (१९७४-१९७७). तीन वर्षांनंतर ते पुन्हा केंब्रिज विद्यापीठामध्ये व्याख्याता (१९७७-१९९०) या पदावर परतले व नंतर प्रपाठक (१९९०-१९९६) आणि प्राध्यापक (१९९६) झाले. हॉडर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (कॅलिफोर्निया) नव्याने तयार करण्यात आलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक मानवशास्त्र विभागात डनलेव्ही फॅमिली प्रोफेसर (Dunlevie Family Professor) आणि विभागप्रमुख या पदावर रुजू झाले (१९९९). त्यांनी बिंगहॅम्टन येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (१९८४-१९८९), मिनेसोटा विद्यापीठ, मिनिआपोलिस (१९८६-१९९४), ॲमस्टरडॅममधील व्हान गिफेन इन्स्टिट्यूट फॉर प्री-अॅन्ड प्रोटोहिस्ट्री (१९८०) आणि पॅरिसमधील सॉबॉन विद्यापीठ (१९८५) येथे अभ्यागत प्राध्यापक अशी अनेक सन्माननीय पदे भूषवली आहेत.

हॉडर यांनी केनिया (१९७४-१९७६, १९८०-१९८३), दक्षिण इटलीतील कॅलाब्रिया (१९७९-१९८०), सुदान (१९७८-१९७९) आणि १९९३ पासून तुर्कस्तानमध्ये चतालहुयुक (Çatalhöyük) येथे नाविन्यपूर्ण असे पुरातत्त्व आणि लोकजीवनशास्त्रीय कार्य केले आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी वेंडेन्स अँबो (१९७३-१९७४), लेडस्टन (१९७६-१९७८), शेफील्ड परगण्यातील मॅक्से (१९८०) आणि हॅडेनहॅम (१९८१-१९९०) येथे उत्खनन केले आहे. हॅडेनहॅम हा हॉडर यांचा पहिला मोठा उत्खनन प्रकल्प होता. या स्थळावर ख्रिस इव्हान्स त्यांचे सहकारी होते. त्या दोघांनी मिळून पुढे केंब्रिजमध्ये पुरातत्त्व विभागाची स्थापना केली.

सन १९७० नंतर हॉडर यांनी चार्ल्स ऑर्टन यांच्याबरोबर पुरातत्त्वशास्त्रात अवकाशीय विश्लेषणासाठीचे (Spatial analysis) तंत्र विकसित केले. त्यासाठी त्यांनी मानवी भूगोलात पूर्णपणे विकसित झालेल्या संख्याशास्त्रीय पद्धतींचा यशस्वीपणे उपयोग केला होता. प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या (Processual archaeology) बहराच्या काळात हे संशोधन वाखाणले गेले [ नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा कालखंड ]. ही पद्धत त्यांनी ब्रिटनमधील रोमन काळाच्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या अभ्यासासाठी वापरली. परंतु प्राचीन काळातील विशिष्ट सांस्कृतिक आकृतिबंध निर्माण होण्याची कारणे पुरातत्त्वीय नमुन्यांमधून ओळखण्यासाठी या तंत्रांचा वापर समाधानकारकपणे करता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी  केनिया, झांबिया आणि सुदानमध्ये अनेक वर्षे लोकजीवनशास्त्रीय क्षेत्रीय संशोधन केले. सिंबॉल्स इन ॲक्शन (१९८२) या पुस्तकात त्यांनी या संशोधनाचे निष्कर्ष मांडले आहेत. या संशोधनातून हॉडर यांनी सामाजिक उत्क्रांतिवादी आणि अनुकूलनाशी निगडित मानवी वर्तनासंबंधीच्या प्रचलित संकल्पनांच्या वापराला जोरदार आव्हान दिले होते. त्यांच्या या कल्पना प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या विरोधी व्यापक प्रतिक्रियेचा मुख्य भाग बनल्या [ प्रक्रियावादोत्ततर पुरातत्त्व ].

पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्राला हॉडर आणि त्यांचे विद्यार्थी यांनी मोठी कलाटणी देण्याचे काम केले आहे. हॉडर यांच्या विचारधारेचा १९८० पासून चार दशके जागतिक पातळीवर विलक्षण प्रभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०-८० या दशकाच्या उत्तरार्धात अनेकजणांनी पुरातत्त्व आणि मानवशास्त्रातील प्रत्यक्षार्थवादाच्या (positivism) भूमिकेची गंभीर समीक्षा करण्यास सुरुवात केली. सामाजिक विज्ञानांमधील नवीन सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या प्रवाहांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यात स्त्रीवादी, मार्क्सवादी, प्रतीकवादी, संरचनावादी आणि रचनाविघटनवादी (Deconstructionist) अशा अनेक विचारसरणींचा समावेश आहे. या प्रकारची समीक्षा करणारे हॉडर यांचे पहिले पुस्तक सिंबॉलिक अँड स्ट्रक्चरल आर्किऑलॉजी १९८२ मध्ये प्रसिद्ध झाले. यात त्यांनी ‘प्रतीकात्मक पुरातत्त्वʼ (Symbolic Archaeology) ही पुरातत्त्वात वैज्ञानिक पद्धतीच्या वापराला आक्षेप घेणारी नवीन मांडणी केली. पुरातत्त्वीय वस्तू या मानवी कृतींची व वर्तनांची सांकेतिक प्रतीके असतात. त्यामुळे त्यांचा अर्थ ‘मजकूर वाचण्याच्या पद्धतीनेʼ लावला पाहिजे. तसेच प्रतीकांमधील अर्थ ऐतिहासिक संदर्भातच ‘वाचलाʼ पाहिजे. असे करताना जी काही पर्यायी स्पष्टीकरणे देता येतील, ती सर्व एकाच पातळीवर असल्याचे मान्य करायला हवे (multivocality), असा या विचारांचा सारांश आहे. हा प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा (Post-processual Archaeology) उगम मानला जातो. स्वतः हॉडर यांनी १९८५ मध्ये ही संज्ञा प्रथम वापरली. प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व ही एक प्रकारे पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रातील नवपुरातत्त्वाच्या प्रसाराची प्रतिक्रिया असून या प्रतिक्रियेचा काळ संपलेला नाही. यानंतर हॉडर यांनी द प्रेझेंट पास्ट (१९८२) आणि रिडिंग द पास्ट (१९८६) या पुस्तकांमधून आपली नवी विचारधारा पुढे नेली.

पुरातत्त्वीय वस्तूंचा योग्य अर्थ लावण्यासाठी मानवी संस्कृतीमधील घडामोडींचा पर्यावरण आणि वर्तनाशी निगडित संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे, हा हॉडर यांच्या या विचारसरणीचा मुख्य भाग आहे. त्याला संदर्भप्रणीत पुरातत्त्व (Contextual Archaeology) असे म्हणतात. ही भूमिका विशद करणारे हॉडर यांचे हे संपादित पुस्तक १९८७ मध्ये प्रसिद्ध झाले. तसेच या विचारांचा उपयोग दर्शवणारे हॉडर यांचे डोमेस्टिकेशन ऑफ यूरोप हे पुस्तक (१९९०) हा महत्त्वाचा टप्पा आहे. हॉडर यांनी नवपुरातत्त्वाच्या प्रसाराविरुद्ध प्रारंभ केलेल्या चळवळीतून १९९० नंतर ‘अर्थबोधवादी पुरातत्त्वʼ ही नावाने वेगळी विचारधारा पुढे आली. द आर्किऑलॉजिकल प्रोसेस (१९९९) या पुस्तकातून ही विचारधारा समजून येते. कोणत्याही गोष्टीचे अनेक अर्थ लावता येतात आणि हे सगळे अर्थ आपापल्या परीने योग्यच मानले पाहिजेत, असे यात मानले जाते.

हॉडर यांच्या १९९० नंतरच्या लेखनात विज्ञानाच्या तटस्थपणाच्या भूमिकेवरची टीका वाढलेली दिसते. तसेच त्यांच्यावरील स्त्रीवादी विचारसरणीचा प्रभाव स्पष्टपणाने जाणवतो. पुरातत्त्व ही एक सामाजिक प्रक्रिया आहे असा त्यांचा युक्तिवाद असून विविध समुदायांच्या आवडीनिवडी आणि गरजांना प्रतिसाद देणे हे पुरातत्त्वशास्त्राचे कर्तव्य आहे, असे ते मानतात. पुरातत्त्वाचा संबंध जितका भूतकाळाशी आहे, तेवढाच तो वर्तमानाशीही आहे हे गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे. म्हणूनच सांस्कृतिक वारसा आणि मानवी हक्क यांच्यातील संबंधांबद्दल त्यांनी भरपूर लेखन केले आहे. या अभ्यासाचा एक भाग म्हणून, भूतकाळासंबंधी पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाच्या वर्तमानकाळातील भूमिकांबद्दल गंभीर विचार करायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

समाजविज्ञानातील नवीन सिद्धांतांचा पुरातत्त्वात वापर करण्याचा आग्रह धरणारे अभ्यासक आणि प्रत्यक्षार्थवादी यांच्यातील ताणतणावामुळे हॉडर सन २००० नंतर अस्वस्थ झालेले दिसतात. मानव आणि इतर भौतिक जग यांच्यामधील परस्परावलंबन यांचा मागोवा घेण्यासाठी हॉडर यांनी ‘थिएरी ऑफ एन्टॅन्गलमेंटʼ मांडली. चतालहुयुक येथील उत्खननातून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करताना त्यांनी या दिशेने विचार केला आहे. त्यांचा हा दृष्टीकोन प्रामुख्याने समकालीन फ्रेंच विचारवंत ब्रुनो लटॉ (Bruno Latour) यांच्या ‘ॲक्टर-नेटवर्कʼ सिद्धांतांवर (Actor-Network Theory) आधारित आहे. त्यांच्या एन्टॅन्गल्डः ॲन आर्किऑलॉजी ऑफ द रिलेशनशिप्स बिटवीन ह्यूमन्स अँड थिंग्ज (२०१२) या पुस्तकात ॲक्टर-नेटवर्क सिद्धांतांच्या संदर्भात मानवी संस्कृतीमधील वारसा, स्मृती आणि धार्मिक रितीरिवाज यांचे महत्त्व विशद केले आहे.

हॉडर यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले आहेत. त्यामध्ये लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी गॉर्डन चाइल्ड पारितोषक (१९७१), स्वीडिश सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजचे ऑस्कर माँटेलिअस पदक (१९९५), युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया म्युझियमचे ल्युसी व्हार्टन ड्रेक्सेल पदक (२००९) आणि रॉयल अँथ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे हक्सले मेमोरियल पदक (२००९) यांचा समावेश आहे.

हॉडर स्टॅनफर्ड येथील वर्तनविज्ञानातील प्रगत अभ्यास केंद्रात १९८७ मध्ये फेलो होते. तसेच ब्रिटिश अकॅडमीचे फेलो, रॉयल अँथ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे फेलो आणि सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजचे फेलो आहेत. त्यांना ब्रिस्टल विद्यापीठ (२००९) व लायडेन विद्यापीठ (२०११) यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत. तुर्कस्तानातील त्यांच्या पुरातत्त्वीय योगदानासाठी  त्यांना तुर्कस्तानच्या सांस्कृतिक मंत्रालयाने राष्ट्रीय पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

संदर्भ :

  • Ange, Dante,  ‘Hodder, Ian (Theory)ʼ, Encyclopedia of Global Archaeology (Ed., Claire Smith), pp. 5010-5013, Springer, 2020.
  • Hodder, Ian; Håkan, Karlsson & Bjornar, Olsen, ‘40 Years of Theoretical Engagement: A Conversation with Ian Hodderʼ, Norwegian Archaeological Review 41: 26-42, 2008.
  • छायाचित्र स्रोत :  https://stanford.academia.edu/IanHodder
  • http://www.ian-hodder.com/

                                                                                                                                                                             समीक्षक : जयेंद्र जोगळेकर