महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती. या नाण्यांचे संशोधन व प्रकाशन प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी (१८९३—१९८५) यांनी प्रथम केले.

संचयातील ६८४ नाण्यांपैकी ६८२ नाणी शिसे या धातूची तर दोन तांब्याची  होती. १९३९ साली सापडलेल्या सातवाहनांच्या तऱ्हाळे नाणेसंचयानंतर (१६०० नाणी) महाराष्ट्रात सापडलेला हा सर्वांत मोठा नाणेसंचय आहे.  नाणेसंचयातील  सर्व नाणी गोलाकार आहेत.

तांब्याची नाणी : नाणेसंचयात तांब्याची केवळ दोन नाणी सापडली आहेत.  ती दुसऱ्या ठिकाणाहून आली असावीत. यांपैकी एक नाणे गंजलेले आहे. त्याच्या दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती असून त्याच्या पाठीवर तक असा लेखाचा तुटक भाग दिसतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. हे नाणे बहुधा सातकर्णी नावाने शेवट होत असलेल्या सातवाहन राजाचे असावे. दुसरे नाणे तुटलेल्या अवस्थेत आढळले.

शिशाची नाणी : शिशाच्या ६८२ नाण्यांपैकी ३६९ नाणी वाशिष्ठीपुत्र शिव श्री पुळुमावी, १९१ नाणी वासिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णीची, तर उर्वरित १२२ नाण्यांवरचे लेख अतिशय अस्पष्ट असून ओळखता येत नाहीत.

​शिवश्री पुळुमावीची नाणी : मिराशी यांच्या मते, शिवश्री पुळुमावी व वाशिष्ठिपुत्र पुळुमावी हे दोन भिन्न राजे नसून एकच आहेत; तथापि​ या बाबतीत दोन विभिन्न मतप्रवाह आढळतात व त्याप्रमाणे ​ इतर नाणेसंशोधक व तज्ज्ञांच्या मते हे दोन  भिन्न राजे होते. नाण्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा असून नाण्याच्या गोलाकार कडेवर रञो वासिष्ठीपुतस सिव- सिरी- पुळुमाविस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून काही वेळा उज्जैन चिन्हांच्या वर्तुळांवर चंद्रकोर आढळते. नाण्यांच्या आकारामध्ये व वजनांमध्ये वैविध्य आढळते.

​​स्कंद सातकर्णीची नाणी : स्कंद सातकर्णीच्या नाण्यांवर दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा व  रञो वसिठी- पुतस खद- सातकणिस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्यांच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून त्यावरील वर्तुळांवर काही वेळा चंद्रकोर दिसून येते.

नाणेसंचयाचे महत्त्व : या नाणेसंचयातील नाण्यांवर​ प्रथमच ​शिवश्री पुळुमावी​ व ​स्कंद सातकर्णी​ या ​सातवाहन नृप​तींचा  मातृकुलवाचक उल्लेख असणारा मोठा लेख ​आढळून आला. तसेच ​या नाण्यांमुळे ​सातवाहनांच्या उत्तर कालखंडात त्यांच्या आधिपत्याखाली हा भाग असल्याचे कळ​ले.

संदर्भ :

  • Sarma, I. K., Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
  • Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade-Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
  • मिराशी, वा. वि., जर्नल ऑफ न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, खंड : ३४, वाराणसी.
  • पाठक, ए. एस. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

                                                                                                                                           समीक्षक : मंजिरी भालेराव