जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले.

तुळजा लेणी-समूह, जुन्नर.

तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यांत एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. यांशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली आहेत. या लेण्यांत अद्यापि एकही शिलालेख आढळलेला नाही.

लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. आतील डावीकडील व मागील भिंतीत प्रत्येकी दोन व उजवीत एक अशा एकूण पाच खोल्या बौद्धभिक्षूंच्या निवासासाठी खोदलेल्या आहेत.

वर्तुळाकार चैत्यगृह, लेणे क्र. ३, तुळजा लेणी, जुन्नर.

लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह असून हे या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. त्याचा व्यास ८.२३ मी. असून जमिनीपासून छतापर्यंतची उंची ७.६२. मी. आहे. या लेण्याच्या मध्यभागी २.५९ मी. व्यास व ३ मी. उंची असलेला साधा स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग (१.३२ मी. उंच) गोलाकार असून त्यावर  ‘अंड’ (१.६७ मी. उंच) आहे. अंडावर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे.

स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ (प्रत्येकी उंची ३.३५ मी.) असून त्यांचा खालचा भाग रुंद व वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे. त्यामुळे हे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात. विशेष म्हणजे या स्तंभांना स्तंभपाद व स्तंभशीर्ष नाहीत. स्तंभांच्या भोवती वर्तुळाकार प्रदक्षिणापथ (१.०७ मी. रुंद) आहे.

स्तूपाच्या वर घुमटाकार छत असून, त्यावर प्रदक्षिणेच्या छतावर लेणे कोरले त्यावेळी लाकडी फासळ्या (तुळया) बसविल्या होत्या. तसेच छतावर व बाजूच्या भिंतींवर मातीचा गिलावा लावून त्यावर रंगीत चित्रे काढली होती. येथील एका उभ्या स्त्रीचे चित्र आणि अस्पष्टपणे दिसून येणारी पुष्पनक्षी अजिंठा येथील लेणे क्र. १० मधील चित्रांच्या समकालीन असावी, असे दिसून येते. अष्टकोनी स्तंभांवरही चित्रे काढण्यात आली होती. लेण्याचा दर्शनी भाग अस्तित्वात नसल्याने त्याचे संपूर्ण विधान ओळखणे कठीण आहे. या चैत्यगृहाच्या स्तूपासमोर इतर चैत्यगृहांत आढळतो तसा आयताकार सभामंडप नसावा, असे दिसते; परंतु चैत्यगृहाला दरवाजा असल्याच्या खुणा येथे आढळतात.

चैत्याचा गोल आकार व वर्तुळात मांडणी केलेले स्तंभ, असे हे पश्चिम भारतातील एकमेव चैत्यगृह आहे. सुरेश जाधव यांनी तुळजा लेणे क्र. तीनशी पितळखोरा लेणे क्र. ३, अजिंठा लेणे क्र. १०, भाजा व कोंडाणे येथील चैत्यगृहांचा तौलनिक अभ्यास करून तुळजा लेणे क्र. तीनचा काळ इ. स. पू. सुमारे ६५-५३ ठरविला आहे. तसेच स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून हे चैत्यगृह दख्खनमधील प्रारंभीच्या लेण्यांपैकी एक असावे, असे दिसते. एस. नागराजू यांच्या मते, तुळजा लेणी-समूहातील लेणे क्र. १, ६, ७ व १३ विहारांच्या स्थापत्यविकासाच्या पहिल्या टप्प्यातील उदाहरणे असून ती इ. स. पू. ३०० ते २५० या दरम्यान खोदली गेली असावीत.

लेणे क्र. ४ लहानसे विहार असून त्याचा दर्शनी भाग तुटला आहे. डावीकडील मागील बाजूस दोन खोल्या असून एकीस आधुनिक लाकडी चौकट बसविली आहे आणि बाजूच्या खोलीत तुळजाभवानीची स्थापना केली आहे.

लेणे क्र. ५ ते १२ यांचा दर्शनी भाग संपूर्णपणे तुटलेला आहे. लेणे क्र. ८ ते १२ पर्यंत कड्याच्या वरच्या बाजूस काही कलाकुसर व थोडीबहुत शिल्पे शिल्लक राहिली आहेत. त्यांत वेलबुट्टी, वेदिका, चैत्यकमानी इ. सुबकपणे कोरलेल्या दिसतात. शिल्पांत स्तूपाची पूजा करणारे भक्त, युगूल व उडता किन्नर किंवा गंधर्व दिसतात. किन्नराचा कमरेवरील भाग मानवी असून त्याने तुरेदार फेटा परिधान केला आहे. त्याचे पाय पक्ष्याचे असून त्याला मोरपिसारा आहे. या कलाकुसरीचे व शिल्पांचे साम्य मानमोडी टेकडीवरील भूतलेणी समूहातील शिल्पांशी मिळते-जुळते आहे.

लेणे क्र. १३ हे या गटातील शेवटचे लेणे असून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर लागते. याचाही दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपात बाजूच्या व मागील भिंतींत खालच्या बाजूस दगडी बाक कोरलेले आहेत. याचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असावा. अलीकडेच तुळजा लेणींच्या पश्चिमेस साफ-सफाईचे काम चालू असताना अजून काही खोल्या आढळून आल्या आहेत.

संदर्भ :

  • Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
  • Nagraju, S. Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981.
  • Suresh, Vasant, ‘Tulja Leni and Kondivte Chaityagrihas: A Structural Analysis’, Ars Orientalis, Michigan, 2000.
  • जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
  • जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१ भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                 समीक्षक : मंजिरी भालेराव