जस्ताचे हे खनिज पूर्वी जस्त धातू मिळविण्यासाठी वापरीत. त्याचे स्फटिक समांतरषट्फलकीय अथवा विषम त्रिभुजफलकी समूहाचे असून ते लहान असतात. ते बहुधा मूत्रपिंडाकार व कधीकधी गुच्छाकार, झुंबराकार, स्फटिकी पुटे व मधमाश्यांच्या पोळ्यासारखे पुंज असतात. सुकलेल्या हाडांसारखे दिसतात म्हणून खनिजाला ड्राय-बोन ओअर (धातुक) म्हणतात. तसेच कणमय ते मातकट रूपात आढळते. त्याचे पाटन समांतरषट्फलकीय (1011) परिपूर्ण पण क्वचित आढळते. कठिनता ४—४.५ ( कार्बोनेटच्या दृष्टीने उच्च); दुधी काचेप्रमाणे पारभासी; वि. गु. ४.३०-४.४५; चमक काचेसारखी; रंग बहुधा ओंगळ उदी, शिवाय रंगहीन, पांढरा, हिरवट, निळसर, गुलाबी; पिवळ्या प्रकारात कॅडमियम असून त्याला टर्की-फॅट ओअर म्हणतात. कस पांढरा; रा. सं. ZnCo3. कधीकधी जस्ताची जागा फेरस लोहाने किंवा द्विसंयुजी मँगॅनिजाने आणि क्वचित कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॅडमियम, तांबे, कोबाल्ट व शिसे यांनी घेतलेली असते.

स्मिथसोनाइट

स्मिथसोनाइट अगलनीय असून ते थंड हायड्रोक्लोरिक अम्लात फसफसून विरघळते. अम्लांमधील फसफसणे, जस्तदर्शक परीक्षा, कठिनता व उच्च विशिष्ट गुरुत्व यांमुळे ते वेगळे ओळखता येते.

बहुधा स्मिथसोनाइट चुनखडकांतील जस्ताच्या निक्षेपांच्या ऑक्सिडीभूत पट्ट्यात आढळते. त्याच्या जोडीने स्फॅलेराइट, गॅलेना, हेमिमॉर्फाइट, सेर्‍युसाइट, कॅल्साइट व लिमोनाइट ही खनिजे आढळतात. स्मिथसोनाइट कधीकधी कॅल्साइटच्या छद्मरूपात आढळते. जस्ताच्या प्राथमिक खनिजांत बदल होऊन त्याचे द्वितीयक खनिज तयार होते. ते लॉरियम (ग्रीस; शोभिवंत प्रकार), सार्डिनिया (इटली; पिवळा झुंबराकार प्रकार) आणि ब्रोकन हिल खाण, नॉर्दर्न र्‍होडेशिया व नैर्ऋत्य आफ्रिका (सूक्ष्मस्फटिक प्रकार), बिटॉम व टारनुव्हस्की (पोलंड) आणि लेडव्हिल (कोलोरॅडो, अमेरिका) येथे आढळते. १८८०-९० पर्यंत ते जस्ताचे मुख्य धातुक (कच्च्या रूपातील धातू) होते; नंतर जस्त स्फॅलेराइटपासून (ZnS) मिळविण्यात येऊ लागले.

पूर्वी स्मिथसोनाइट याला कॅलॅमीन म्हणत. मात्र स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनचे संस्थापक जेम्स स्मिथसन या खनिजवैज्ञानिकांच्या नावावरून त्याला स्मिथसोनाइट हे नाव पडले. याशिवाय त्याला झिंक स्पार असेही म्हणतात.

संदर्भ : https://www.mindat.org/min-3688.html

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर