हॉलंडाइट

बेरियम धातूसह मँगॅनीज धातूचे ऑक्साइड खनिज (Ba (Mn4+6 Mn3+2) O16). स्फटिक एकनताक्ष व लहान प्रचिनाकार; ते धाग्याप्रमाणे तंतुरूपातही आढळते. रंग काळा वा रुपेरी करडा; कस काळा भंगुर; चमक मंद धातूसारखी; कठिनता ४–६; वि. गु. ४.९५. रा. सं. Ba (Mn2+, Mn4+)8 O16 म्हणजे बेरियम व मँगॅनीज यांचे मँगॅनेट. कधीकधी यात सोडियम, शिसे व (फेरिक) लोह यांचे आयन (विद्युत् भारित अणू) असतात, म्हणून याला एकत्रित कोरोनाडाइट गट म्हणतात. यातील (Ba (Mn4+6 Fe3+2) O16) लोहमिश्रित खनिजास फेरिहॉलंडाइट म्हणतात. काही नमुन्यात स्फटिकांचे अष्टफलक एकावर एक रचले जाऊन बोगद्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झालेली पाहावयास मिळते.

मँगॅनीज खनिजांच्या पायरोल्यूसाइट – मँगॅनाइट समूहातील हॉलंडाइट हे महत्त्वाचे खनिज आहे. त्यामुळे मँगॅनीज मिळविण्यासाठी ते वापरतात.

हॉलंडाइट हे भारतात मध्य प्रदेशातील मँगॅनिजाच्या धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूच्या) निक्षेपांत मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच ते महाराष्ट्र, आंध्र प्रदेश-तेलंगणा, ओरिसा, राजस्थान व कर्नाटकांतील मँगॅनिजाच्या खाणीतही आढळते. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील काजलिडोंगरी खाणीत मिळालेल्या हॉलंडाइट या प्रथम खनिजाचे नाव भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे संचालक सर टी. एच्. हॉलंड (१८६८–१९४७) यांच्या नावावरून ठेवण्यात आले.

संदर्भ : www.mindat.org

समीक्षक : सुधाकर पंडित