हॉस्मनाइट

स्पिनेल गटातील हे द्वितियक व तृतीयक मँगॅनिजचे जटिल ऑक्साइड असलेले प्राथमिक खनिज आहे. याचे स्फटिक, चतुष्कोणीय असून पुष्कळदा जुळे स्फटिक आढळतात. ते कणमय वा संहत (घट्ट) रूपांतही आढळते. रा. सं. Mn2+Mn23+O4. रंग काळसर, तपकिरी; कस गडद तपकिरी किंवा फिकट उदी; चमक पोलादासारखी; कठिनता ५–५.५, वि.गु. ४.८६. अतितप्त शिरांच्या रूपात किंवा बदललेल्या अवसादी (गाळाच्या) खडकांमध्ये किंवा मँगॅनीजयुक्त खनिजांच्या स्फटिकीभवनाने हॉस्मनाइट तयार होते. मँगॅनीजयुक्त खडकांच्या रूपांतरणातही ते तयार होते. बोर्नाइट, मँगॅनाइट, सिलोमिलेन इ. खनिजांबरोबर ते आढळते.

हॉस्मनाइट हे खनिज मुख्यत: अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया, चीन इ. ठिकाणी तसेच भारतात मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकातील मँगॅनीज खाणीतून अल्प प्रमाणात आढळते. योहान फ्रीड्रीख लूटव्हिख हॉस्मन (१७८२–१८५९) हे जर्मनीतील गटिंगेन विद्यापीठात खनिजविज्ञानाचे प्राध्यापक होते. १८२७ मध्ये विल्हेल्म हैडिंगर यांनी या खनिजाला हॉस्मन यांच्या नावावरून हॉस्मनाइट हे नाव दिले.

समीक्षक : अजित वर्तक