झिओलाइट गटातील ह्यूलँडाइट हे एक टेक्टोसिलिकेटी (Tectosilicates) खनिजमाला. या अगोदर हे स्वतंत्र कॅल्शियमयुक्त झिओलाइट गटातील खनिज गणले जायचे, परंतु नंतर अनेक खनिजांचा हा समुही गट असल्याचे लक्षात आल्यानंतर, याला मालागट मानतात. साधारणपणे यामध्ये ह्यूलँडाइट – कॅल्शियम, ह्यूलँडाइट – सोडीयम, ह्यूलँडाइट – पोटॅशियम, ह्यूलँडाइट – स्ट्रॉन्शियम आणि ह्यूलँडाइट – बेरियम ही खनिजे असतात. यातील स्ट्रॉन्शियम आणि बेरियम ही अण्वीय संरचनेतील कॅल्शियमच्या जागी येतात, तर सोडीयम आणि पोटॅशियम हे संरचनेतील कॅल्शियमचा काही भाग पुनर्स्थित (Replace) करतात. ही खनिजे एकसारखी दिसत असल्याने वेगळी काढण्यासाठी विशेष अभ्यासाचा आधार घ्यावा लागतो.

ह्यूलँडाइट स्फटिक

ह्यूलँडाइट स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार; परंतु स्फटिकांची सममिती पुष्कळदा समचतुर्भुजीसारखी, बाजूचे पिनॅकॉइड (दोन समांतर फलक असलेले उघडे स्फटिकरूप) ठसठशीत, पुष्कळदा हिऱ्यासारखा आकार. ते पुष्कळदा पर्णित (पानांसारख्या) राशींच्या रूपांतही आढळते. पाटन : ह्यूलँडाइटची स्फटिक संरचना १०१० परिपूर्ण; कठिनता ३.५-४; वि.गु. २.१८ – २.२०; चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी; रंग पांढरा, पिवळा, करडा, तांबडा, रंगहीन; पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे, पारभासी; ठिसूळ, रा. सं. मुख्यत: सजल कॅल्शियम ॲल्युमिनियम सिलिकेट Ca(Al2Si7O18).6H2O. कॅल्शियमच्या जागी सोडियम, पोटॅशियम, स्ट्रॉन्शियम वा बेरियम येऊ शकतात. ते बंद नळीत तापविल्यास पाणी मिळते. स्फटिकरूप व मोत्यासारखी चमक असलेली परिपूर्ण पाटनाची एक दिशा यांमुळे ते वेगळे ओळखता येते.

ह्यूलँडाइट हे द्वितीयक (खडक तयार झाल्यानंतरच्या नैसर्गिक प्रक्रियांनी तयार झालेले) खनिज असून ते स्टिलबाइट, कॅल्साइट व इतर झिओलाइट खनिजांबरोबर ज्वालामुखीय बेसाल्ट खडकांच्या पोकळींमध्ये मुख्यत: आढळते आणि कधीकधी पट्टिताश्म खडकांत आणि उष्णजलीय शिरांमधूनही आढळते. आइसलँड, सायप्रस, फेअरो बेटे, आंद्रिआसबर्ग, हार्झ पर्वत, टायरॉल (ऑस्ट्रिया), अमेरिका व नोव्हास्कोशा येथे आणि भारतात मुंबईजवळ, जळगांव, औरंगाबाद जिल्ह्यात उत्तम गुणवत्तेचे ह्यूलँडाइट आढळते. पाणी मृदू करण्यासाठी ते वापरतात. इंग्रज खनिजसंग्राहक एच्. ह्यूलँड यांच्या सन्मानार्थ या खनिजाला ह्यूलँडाइट हे नाव देण्यात आले आहे.

समीक्षक : यू. डी. कुलकर्णी