सस्तन प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या सर्व्हिडी (मृग) कुलात बारशिंगा या मृगाचा समावेश होतो. बारशिंगा फक्त भारतात आढळतो. तो सर्व्हस प्रजातीतील असून त्याचे शास्त्रीय नाव सर्व्हस ड्यूव्हाउसेली आहे. भारतात त्याच्या स. ड्यूव्हाउसेली ड्यूव्हाउसेली, स. ड्यूव्हाउसेली ब्रँडेरी आणि स. ड्यूव्हाउसेली रणजितसिंगी अशा तीन उपजाती आढळतात. उत्तर प्रदेश, सुंदरबन व आसाम येथील दलदलीच्या प्रदेशात ड्यूव्हाउसेली उपजाती आढळते, तर मध्य प्रदेशात ब्रँडेरी आणि रणजितसिंगी या उपजाती आढळतात. त्यांपैकी रणजितसिंगी उपजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आसामातील काझीरंगा आणि मानस अभयारण्ये, मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्य तसेच उत्तर प्रदेशातील तराईचा प्रदेश येथे बारशिंगा आढळून येतो. आसाममधील बारशिंगा उंच जागी पाण्याच्या जवळपास राहतो, तर तराईमधील बारशिंगा दलदलीच्या प्रदेशातून सहसा बाहेर येत नाही. पाण्याच्या सान्निध्यात राहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना इंग्रजीत स्वॅम्प डियर हे नाव पडले आहे.
बारशिंग्याच्या शरीराची उंची सु. १३० सेंमी. व वजन सु. १८० किग्रॅ. असते. रंग फिकट तपकिरी ते पिवळसर असतो. पोटाचा आणि शेपटीखालचा भाग पांढरा असतो. नराला आयाळीसारखे लांब केस असतात. नराचा रंग मादीपेक्षा गडद असतो. फक्त नराच्या डोक्यावर शिंगे असतात. त्यांना मृगशिंगे म्हणतात. ही शिंगे सामान्यपणे दोन प्रकारांची असतात; पहिल्या प्रकारात, ही शिंगे प्रथम पाठीकडे झुकतात व वाढ होताना डोक्यावर येतात. शिंगांना बाजूस शाखा असतात. दुसऱ्या प्रकारात, मूळ शिंगांना प्रथम काटकोनात शाखा फुटते. त्यामुळे पुढे या शाखेला आणि मूळ शिंगांना फुटणाऱ्या शाखांना अडथळा होत नाही. प्रौढ नराची शिंगे सु. ७५ सेंमी. लांब असतात. काही वेळा यापेक्षा अधिक लांब शिंगे (सु. १०४ सेंमी) असलेले बारशिंगे आढळले आहेत.
बारशिंगा त्यांच्या शिंगांमुळे आकर्षक दिसतो. प्रत्येक शिंगाला १०-१४ शाखा फुटतात. म्हणून त्यांना हिंदीत बारशिंगा नाव पडले आहे. काही वेळा शिंगांना २०पर्यंतही शाखा फुटतात. बारशिंग्याची शिंगे संयोजी ऊतींपासून बनलेली असतात. या शिंगांची वाढ होण्यापूर्वी त्यांच्यावर मखमली त्वचेचे आवरण असते. ती त्वचा वाढली आणि हाडांप्रमाणे कठीण होऊ लागली की ती वाळून जाते. शिंगांची वाढ शरीरात तयार होणाऱ्या लैंगिक संप्रेरकांमुळे होते. ठराविक काळानंतर ही शिंगे गळून पडतात व त्यांच्या जागी नवीन शिंगे तयार होतात. खच्ची केलेल्या आणि वयस्क नरांत या संप्रेरकांचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्या शिंगांची वाढ होत नाही.
बारशिंगा कळपाने राहतो. कळपात नर, मादी आणि पिले यांची मिळून संख्या २० असते. प्रजननकाळात ही संख्या ६०पर्यंत वाढते. तो रवंथ करणारा प्राणी असून गवत, पाने व जलीय वनस्पती हे त्याचे मुख्य अन्न आहे. पहाटे आणि सायंकाळी संधिप्रकाशात तो अन्नासाठी भटकतो. त्याची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता सर्वसाधारण असते. मात्र गंधक्षमता तीव्र असते. धोक्याची जाणीव झाल्यावर सर्व कळप मोठ्याने ओरडून एकमेकांना सावध करतो.
बारशिंग्याचा प्रजननकाळ वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळा असतो. आसामात हा काळ एप्रिल-मे, तर उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात नोव्हेंबर-जानेवारी असतो. प्रजननकाळात नरांच्या एकमेकांशी झुंजी होतात आणि विजयी नर स्वत:चे कळप तयार करतात. एका कळपात २५–३० माद्या असतात. प्रजननाचा काळ संपला की पुन्हा नव्याने कळप तयार होतात. गर्भावधी सहा महिन्यांचा असतो. मादी एका खेपेला एकाच पिलाला जन्म देते. दोन वर्षांनी पिलू वयात येते.