बावची ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोरॅलिया कॉरिलिफोलिया आहे. ती मूळची भारतातील असून तिचा प्रसार श्रीलंका, पाकिस्तान, चीन आणि आफ्रिकेच्या दक्षिण भागातील उष्ण प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. भारतात राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांमध्ये तिची लागवड केली जाते.
बावचीचे झुडूप ६०–१६० सेंमी. उंच वाढते. खोडावर व पानांवर अनेक ग्रंथी असतात. पाने साधी, एकाआड एक, लांबट गोल व दातेरी असून त्यांवर काळे ठिपके आणि थोडे केस असतात. पानांच्या बगलेत ऑगस्ट–डिसेंबर दरम्यान पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या लहान फुलांचे झुबके येतात. शेंगा लहान, साधारण चपट्या, टोकदार, काळ्या व एकबीजी असतात. फळाच्या सालीला बी चिकटून असते.
बावचीची फळे मूत्रवर्धक आणि पित्तवर्धक आहेत. बियांपासून तेल काढतात. तेलामध्ये सोरॅलीन हा एक घटक असतो. कंडुरोग, खरूज, कुष्ठरोग व कोड अशा त्वचेच्या रोगांवर हा घटक गुणकारी आहे. बावचीचे तेल सुगंधी पदार्थांत व उटण्यांमध्ये वापरतात. मात्र, अतिवापरामुळे यकृताचे विकार उद्भवतात. पानांमध्ये ‘जेनिस्टाइन’ हे संप्रेरक असते. ते प्रतिऑक्सिडीकारक आणि कृमिनाशक असते. या संप्रेरकाची रचना स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या इस्ट्रोजेनासारखी असल्याने गर्भारपणात बावची वनस्पतीचा वापर जपून करतात. कर्करोगाच्या उपचारावर ते गुणकारी असल्याचे दिसून आले आहे.