रामफळ या पानझडी वृक्षाचा समावेश ॲनोनेसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोना रेटिक्युलॅटा आहे. सीताफळ व हिरवा चाफा या वनस्पतीही ॲनोनेसी कुलातील आहेत. रामफळ हा वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजमधील असून तेथे त्याच्या फळांना ‘बुलक्स हार्ट’ म्हणतात. जगातील सर्व उष्ण प्रदेशांत तो आढळून येतो. भारतात खाद्यफळांसाठी त्याची लागवड केली जाते.

रामफळ (ॲनोना रेटिक्युलॅटा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळ

रामफळाचा वृक्ष ९–१५ मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक व १०–२० सेंमी. लांब असून त्यांच्यावरील मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना सु. १८ उपरेषांच्या जोड्या उठून दिसतात. मार्च-एप्रिल महिन्यांत (वसंत ऋतूत) पाने गळून नवीन पालवी येते. फुले पावसाळ्याच्या सुरुवातीला येत असून ती तीन-चारच्या संख्येने व एकत्र येतात. फुले पानांशेजारी पेरावरच उगवत असून सीताफळाच्या फुलांपेक्षा मोठी, हिरवट-पिवळसर रंगाची व त्रिभागी असतात. फुलांमध्ये सहा पाकळ्या असतात. हिवाळ्यात तुरळकपणे फळे लागतात. मृदुफळ सीताफळासारखे असून पिकल्यावर पिवळसर-गुलाबी किंवा लाल रंगाचे होते. त्यांचे वजन सु. १ किग्रॅ. एवढे असू शकते. फळाचा आकार हृदयाकृती असून ते १२–१५ सेंमी. व्यासाचे व साधारणपणे बैलाच्या हृदयाच्या आकाराचे असल्यामुळे त्याला ‘बुलक्स हार्ट’ हे नाव पडले असावे. फळावर पंचकोनाकृती रेषा स्पष्ट दिसतात. त्यामुळेच जातीचे नामविशेषण रेटिक्युलॅटा देण्यात आले आहे. फळातील खाद्यगर सीताफळातील गरापेक्षा पातळ, ठिसूळ, रवाळ आणि कमी गोड असतो. त्यामुळे सीताफळाएवढे हे फळ लोकप्रिय नाही. फळामध्ये अनेक काळपट, टणक, गुळगुळीत आणि सपुष्क म्हणजे गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या बिया असतात. त्यांच्यापासून रोपे तयार करतात.

रामफळाला सीताफळापेक्षा पाणीपुरवठा अधिक लागतो. जमीन कोणतीही परंतु फार भारी नसलेली व पाण्याचा निचरा होणारी लागते. भारतात सीताफळ व रामफळ यांबरोबर वेस्ट इंडीजमधून त्यांच्याच प्रजातीतील हनुमानफळ आणि मामफळ अशा खाद्यफळांच्या जाती आणल्या गेल्या आहेत. मात्र त्यांची लागवड कमी होते.

रामफळातील खाद्यगर काहीसा आंबट-गोड, रुचकर, रवाळ, पांढरट आणि खाण्याजोगा असतो. तो पित्तनाशक व तहान कमी करणारा व स्तंभक असतो. पाने आणि बिया कीटकनाशक, तर खोडाची साल स्तंभक असते. राजस्थानात पाने व कोवळ्या फांद्यांपासून टॅनीन मिळवितात. लाकूड उपयोगी असून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवितात. सालीत ॲनोनाइन हे अल्कलॉइड असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा