शोभिवंत फुलोऱ्यासाठी परिचित असलेला एक बहुवर्षायू वृक्ष. बाहवा हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅसिया फिस्चुला आहे. ‘फिस्चुला’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत ‘नळी’ असा होतो. बाहवा वृक्षाची शेंग नळीसारखी असल्यामुळे त्याच्या शास्त्रीय नावात ‘फिस्चुला’ ही संज्ञा आली आहे. चिंच, टाकळा व गुलमोहर या वनस्पतीही याच कुलातील आहेत. बाहवा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून विशेषेकरून भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका इ. देशांतील आहे. अनेक देशांत या वृक्षाची मुद्दाम लागवड शोभेकरिता केली जाते. भारतात तो जवळजवळ सर्वत्र आढळतो.
बाहवा हा मध्यम आकाराचा वृक्ष १०–२० मी. उंच वाढतो. खोडाची साल खडबडीत असते. फांद्यांचा रंग फिका व पिवळसर करडा असतो. पाने संयुक्त, मोठी व समदली पिसांसारखी असतात. दलांच्या म्हणजे पर्णिकांच्या ४–८ जोड्या असतात. पानगळ झाल्यावर उन्हाळ्यात भरभरून फुलतो तेव्हा हा वृक्ष उठून दिसतो. त्याच वेळी कोवळी पालवी येण्यास सुरुवात होते. मार्च-जूनमध्ये पिवळ्या धमक फुलांचे मोठे फुलोरे माळांसारखे खाली लोंबताना दिसतात. या फुलांवरून त्याचे इंग्रजीतील हे नाव गोल्डन शॉवर पडले आहे.
फॅबेसी कुलाच्या फॅबॉयडी उपकुलात लॅबर्नम नावाची एक प्रजाती असून तिच्या लॅ. ॲनागायरॉइड्स आणि लॅ. अल्पायनम् या दोन जाती आहेत. या दोन्ही जाती यूरोपात आढळतात. त्यांची फुले भडक पिवळ्या रंगाची असून फुलोऱ्याला ‘लॅबर्नम’ म्हणजे सोन्याची साखळी म्हणतात. या साम्यावरून भारतातील बाहवा वृक्षाला ‘इंडियन लॅबर्नम’ असेही म्हटले जाते. बाहव्याच्या फुलांकडे भुंगे, मधमाश्या आणि फुलपाखरे आकर्षित होतात. पावसाळ्यात हिरव्या व ५०–६० सेंमी. लांबीच्या शेंगा लोंबताना दिसतात. त्या हिवाळ्याच्या अखेरीस पक्व होऊन काळ्या दिसू लागतात. शेंगांमध्ये तपकिरी व चिकट गोडसर गर असतो. या गरात लहान, चपट्या व बदामी रंगाच्या कठीण बिया असतात. बिया विषारी असतात.
बाहव्याचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. मुळांची साल व पाने सारक आहेत. फळांतील गरात पेक्टिने, हायड्रॉक्सिमिथिल अँथ्रॅक्विनोन आणि शर्करा यांचे प्रमाण अधिक असते. हा गर सौम्य रेचक असल्यामुळे तो पोट साफ होण्यासाठी लहान मुलांना आणि गरोदर महिलांना देता येतो. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकणारा हा वृक्ष वनीकरणासाठी आणि उद्यानांत लावण्यासाठी तसेच जळाऊ लाकूड आणि औषधी लागवड यांसाठीही उपयोगी आहे. बाहवा हा थायलंड देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे, तर भारतातील केरळ राज्याने बाहव्याच्या फुलांना राज्यफुलाचा दर्जा दिला आहे.