बॅनर्जी, निखिल : (१४ ऑक्टोबर १९३१ – २७ जानेवारी १९८६ ).
मैहर घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे एक सुप्रसिद्ध भारतीय सतारवादक. त्यांचा जन्म पं. बंगालमधील कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जितेंद्रनाथ व आईचे नाव दुर्गाराणी होते. त्यांचे वडीलदेखील उत्तम सतारवादक होते. निखिल बॅनर्जींना सतारवादनाचे प्रारंभीचे शिक्षण वडिलांकडून मिळाले.
निखिल बॅनर्जी यांनी वयाच्या नवव्या वर्षी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. तेव्हा आकाशवाणीवर वादक म्हणून नेमणूक होणारे ते सर्वांत लहान कलाकार होते. पुढे त्यांनी उस्ताद मुश्ताक अली खाँ, वीरेंद्रकिशोर रायचौधरी आणि राधिकामोहन मिश्र या गुरुंकडेही सतारवादनाचे शिक्षण घेतले. बॅनर्जींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकून उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांनी निखिल बॅनर्जी यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांच्याकडून त्यांना सात वर्षे सतारवादनाचे सखोल प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर बॅनर्जींनी अल्लाउद्दीन खाँ यांचे सुपुत्र अली अकबर खाँ आणि कन्या अन्नपूर्णादेवी यांच्याकडून सतारवादनाचे शिक्षण घेतले. नंतर ते अली अकबर खाँ यांच्यासोबत वादनाच्या जुगलबंदीचे कार्यक्रमही करत असत.
१९५४ मध्ये कोलकात्याच्या तानसेन संमेलनात निखिल बॅनर्जींनी केलेला कार्यक्रम खूप गाजला. त्यांचा पहिला परदेश दौरा १९५५ मध्ये झाला. तेव्हा ते भारत सरकारचे पोलंड, रशिया आणि चीनच्या सांस्कृतिक प्रतिनिधीमंडळाचे प्रतिनिधी होते. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तान, नेपाळ आणि अन्य ठिकाणांचेही दौरे केले. साठच्या दशकामध्ये त्यांनी नियमितपणे यूरोप आणि अमेरिकेचे दौरे केले.
भारतीय संगीतामध्ये निखिल बॅनर्जी हे एक कुशल, सुरेल व तालबद्ध, लयबद्ध पैलू असणारे सतारवादक म्हणून ओळखले जातात. भावभावना, विचार यांची खोली व परिपूर्ती त्यांच्या सतारवादनातून अनुभवास मिळत असे. तंत अंग व गायकी अंग यांचा संगम व समतोल त्यांच्या वादनात साधलेला आहे. त्यांच्या वादनावर उस्ताद अमीरखाँ साहेबांचा प्रभाव आहे.
सन १९६८ मध्ये त्यांना पद्मश्री, १९७४ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर १९८७ मध्ये भारत सरकारने त्यांना कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. निखिल बॅनर्जींचा विवाह रोमा यांच्याशी झाला. त्यांना दोन मुली आहेत.
८० च्या दशकामध्ये कोलकाता येथील दोवेर लेन संगीत संमेलनातील कार्यक्रम हा त्यांच्या संगीत कारकिर्दीतील शेवटचा कार्यक्रम ठरला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
संदर्भ :
- ‘वसंत’, संपा. गर्ग, लक्ष्मीनारायण; संगीत विशारद, २२ वी आवृत्ती, हाथरस, १९९८.
समीक्षण – सुधीर पोटे