व्हीलर, सर मॉर्टिमर : (१० सप्टेंबर १८९०–२२ जुलै १९७६). प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आणि एक कुशल उत्खननतज्ज्ञ. पुरातत्त्वशास्त्राला एक वैज्ञानिक ज्ञानशाखा म्हणून समाजमान्यता मिळावी, यासाठी ते कार्यरत होते. इंग्लंडमधील ⇨मेडन कॅसल येथील शास्त्रशुद्ध उत्खननाबरोबर, उत्खननाची विशिष्ट पद्धत विकसित करणे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक या पदावरील त्यांची कारकीर्द या सर्वांसाठी व्हीलर विख्यात आहेत.
सर रॉबर्ट एरिक मॉर्टिमर व्हीलर यांचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला. त्यांनी लंडन विद्यापीठातून एम.ए. ही पदवी घेतली (१९१२). पुरातत्त्वीय अभ्यासासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली (१९१२) व ऐतिहासिक वारसाजतनाची जबाबदारी असणाऱ्या रॉयल कमिशनसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली; तथापि पहिले महायुद्ध सुरू झाल्याने हे काम थांबले. व्हीलरना रॉयल आर्टिलरीत कमिशन मिळाले. फ्रान्समध्ये प्रत्यक्ष आघाडीवर सैनिकी सेवा करून युद्ध संपल्यावर व्हीलर लंडनला परतले (१९१९). त्यांच्या लष्करी सेवेसाठी त्यांना मिलिटरी क्रॉसने सन्मानित करण्यात आले होते.
व्हीलर यांनी पुढे त्यांचा पुरातत्त्वीय अभ्यास चालू केला. त्यांनी लंडन विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी मिळविली (१९१९) व त्याच वर्षी त्यांची वेल्स विद्यापीठात व्याख्याता म्हणून नेमणूक झाली. यानंतर त्यांनी नॅशनल म्युझियम ऑफ वेल्सचे संचालकपद भूषवले (१९२२–२६). या पदावर असताना त्यांनी वेल्समधील पुरातत्त्वसंशोधनाला वेगळी दिशा दिली. त्यांनी सरगोशियम (१९२१-२२), ब्रेकन गेयर (१९२४-२५) व केर्लीऑन (१९२६) या रोमन कालखंडातील किल्ल्यांचे उत्खनन केले. प्रीहिस्टॉरिक ॲन्ड रोमन वेल्स या आपल्या ग्रंथातून त्यांनी संशोधनाचे निष्कर्ष मांडले (१९२५). १९२१–२६ या सहा वर्षांच्या काळात ते एक उत्तम पुरातत्त्वज्ञ व लोकांशी उत्कृष्ट संवाद साधणारे निष्णात तरुण प्रशासक म्हणून प्रसिद्ध झाले.
व्हीलर यांनी लॅन्केस्टर हाउस येथील लंडन म्युझियममध्ये कीपर म्हणून काम केले (१९२६-३४). या काळात त्यांनी लंडन म्युझियमला ऊर्जितावस्था आणली. त्यांनी ग्लुसेस्टरशायरमधील नोडेन्स या ठिकाणी उत्खनन केले (१९२८-२९). यानंतर दक्षिण इंग्लंडमध्ये व्हेरुलामियम या लोहयुग-रोमन काळातील नगराचे सर्वेक्षण केल्यानंतर (१९३०-३४) त्यांनी डॉर्सेट येथील मेडन कॅसल या प्रचंड मोठ्या किल्ल्याचे उत्खनन केले (१९३४-३७). या दोन्ही संशोधनांचे अहवाल त्यांनी प्रकाशित केले.
लंडन विद्यापीठात १९३७ मध्ये सुरू झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीमध्ये व्याख्याता या पदावर व्हीलर यांची निवड झाली. ही संस्था सुरू होण्यामागे स्वतः व्हीलर यांनी परिश्रम घेतले होते व पुरातत्त्व विषयासाठी अशी स्वतंत्र संस्था निर्माण करण्यामागे त्यांची विशिष्ट भूमिका होती. मेडन कॅसल येथील उत्खननानंतर व्हीलर यांचा युरोपीय पुरातत्त्व विषयातील रस काही प्रमाणात कमी झाला असला, तरी त्यांनी डॉर्सेट भागातील लोहयुगाची तुलना करण्यासाठी ब्रिटनी आणि नॉर्मन्डी या भागांत संशोधनमोहीम हाती घेतली (१९३८-३९). या मोहिमेचा अहवाल त्यांनी आपली सहकारी किटी रिचर्डसन हिच्या सहकार्याने प्रसिद्ध केला (१९५७). रोमन कालखंडातील तटबंदीसंबंधी आजही हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर व्हीलर यांनी पुन्हा सैनिकी सेवेत प्रवेश केला (१९४१). अल्-अलेमिन व सालेर्नो इथल्या लढायांमध्ये त्यांनी कामगिरी केली. या काळात त्यांनी ब्रिगेडियर म्हणून तोफखान्यात काम केले. पुढे त्यांची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली (१९४४). त्या वेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या खात्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. सर जॉन मार्शल यांच्यानंतर खात्यात बऱ्याच प्रमाणात नोकरशाही प्रवृत्तीची वाढ झाली होती. या खात्याच्या कारभाराची चौकशी सर लिओनार्ड वूली यांच्यामार्फत करण्यात आली होती (१९३८). त्यांनी दिलेल्या अहवालात खात्याच्या क्षमतेविषयी व पुरातत्त्वीय उत्खननांच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारने मुद्दाम ’बाहेरून’ म्हणजे मायदेशातून महासंचालक आणून खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलले. या पार्श्वभूमीवर व्हीलर यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या निवडीमागे सर लिओनार्ड वूली यांचा अहवाल कारणीभूत होता, असे मानले जाते; तथापि ग्रेगरी पोशेल यांच्यासारख्या काही अभ्यासकांना हे मत मान्य नाही.
व्हीलर यांची भारतातील कारकीर्द :
व्हीलर यांची भारतातील कारकीर्द १९४४ ते १९४८ अशी आहे. व्हीलरनी भारतीय पुरातत्त्वामधे जे योगदान दिले आहे, ते मुख्यतः खालील बाबतींत आहे :
१. व्हीलरनी ⇨ हडप्पा, ⇨ अरिकामेडू आणि ⇨ ब्रह्मगिरी या तीन ठिकाणी उत्खनने केली. या उत्खननांमध्ये स्तरविज्ञानाला प्रचंड महत्त्वाचे स्थान होते. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याआधी संशोधनाचे ध्येय निश्चित करून, नंतरच विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून केलेल्या या संशोधनांचे अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने एन्शंट इंडिया या नियतकालिकात प्रसिद्ध केले.
२. व्हीलरनी तक्षशिला येथे व त्यांच्या उत्खननांच्या ठिकाणी पुरातत्त्वातील प्रशिक्षणाची सोय केली. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. तक्षशिला येथे विद्यार्थ्यांना त्यांनी उत्खननतंत्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी उदा., ब्रजबासी लाल, बी.के. थापर (भारत), फरीद खान, अहमद हसन दाणी (पाकिस्तान) यांनी आपापल्या देशांमध्ये पुरातत्त्वीय संशोधनाची धुरा समर्थपणाने सांभाळली.
३. पुरातत्त्व या विषयाच्या वाटचालीसाठी व्हीलर यांनी ठरवलेला आराखडा अतिशय वेगळा होता. पुरातत्त्व हा विषय मुळात मानव्य शाखेचा असला, तरी त्याचा आवाका खूप मोठा आहे आणि त्याच्या विकासासाठी निरनिराळ्या वैज्ञानिक शाखांची मदत घेतली जावी, असा त्यांचा आग्रह होता. पुरातत्त्वीय स्थळांवरील पर्यावरणाचा परिणाम जाणून घेण्यासाठी त्यांनी डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेला मातीच्या सर्वेक्षणाचा अहवाल देण्याची सूचना केली होती (१९४४). उच्च दर्जाच्या पुरातत्त्वीय संशोधनासाठी नैसर्गिक व समाजविज्ञानाच्या विविध शाखांमधील ज्ञानाचा एकत्रित वापर केला जावा, असे त्यांचे ठाम मत होते.
४. व्हीलर यांना ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननाचा जास्त अनुभव असला, तरी पुरातत्त्वविद्येच्या सर्व पैलूंना सारखेच महत्त्व असल्याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामध्ये प्रागैतिहासिक संशोधनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला.
व्हीलर लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीमध्ये परत गेले व तेथून सेवानिवृत्त झाले (१९५५). त्या वेळी व्हीलर यांना उत्कृष्ट ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळालेली होती. पुरातत्त्व या विषयाची लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रेडिओ आणि दूरदर्शन या माध्यमांचा वापर केला. त्यांनी ॲनिमल, व्हेजिटेबल, मिनरल (१९५२-६०), बेरीड ट्रेझर (१९५४-६०) आणि क्रॉनिकल (१९६६) या तीन दूरदर्शनमालिकांची निर्मिती केली.
प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञा व लेखिका जॅकिता हॉक्स यांनी लिहिले आहे की, ‘सर मॉर्टिमर व्हीलर यांच्याजवळ असामान्य नेतृत्वगुण व कार्यशक्ती होती. प्राचीन काळात ते असते, तर एखाद्या महाकाव्याचे नायक ठरले असते; परंतु ते स्वतःच प्राचीन काळाच्या शोधात रमून गेले.’ आधुनिक काळात व्हीलर यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना काही अभ्यासकांनी त्यांच्या कामामागे असलेल्या वसाहतवादी प्रेरणांची चर्चा केली आहे. व्हीलर यांनी भारतीय पुरातत्त्वाला जे ’वैज्ञानिक’ वळण दिले, तो त्यांच्या वसाहतवादी लष्करी-राजकीय धोरणांचा एक भाग होता, असे या अभ्यासकांना वाटते. व्हीलर यांनी भारतात जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा ब्रिटिश पुरातत्त्वाच्या क्षेत्रात त्यांचे नाव मोठे होते. त्यांनी ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली, ती पाहता त्यांच्या कामावर फारशी टीका न होता त्यांचे काम स्वीकारले गेले. व्हीलर यांच्या अभ्यासक जॅकिता हॉक्स यांना व्हीलर यांचे काम चोख वा निर्दोष असणे हे यामागचे कारण वाटते; परंतु पुरातत्त्वज्ञा सुदेष्णा गुहा यांच्या मते, ‘व्हीलर भारतात आले तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीची चिकित्सा करू शकतील असे वरिष्ठ पुरातत्त्वज्ञ भारतात नव्हतेʼ; तथापि भारतीय पुरातत्त्वाला प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणून व्हीलर यांचे कार्य उल्लेखनीय असेच आहे.
व्हीलर यांचे लंडन येथे निधन झाले.
संदर्भ :
- Chadha, Ashish ‘Sir Mortimer Wheeler and The Archaeological Method in India (1944-1948)ʼ, Journal of Social Archaeology 2 (3): 378-401, 2002.
- Cuncliffe, Barry Ed. Murrary, T. ‘Sir Mortimer Wheelerʼ, The Encycleopedia of Archaeology: The Great Archaeologists Volume II, Santa Barbara, 1999.
- Hawkes, Jacquetta Adventurer in Archaeology: The Biography of Sir Mortimer Wheeler, London, 1982.
- Wheeler, R. E. M. Archaeology from the Earth, Delhi, 2004.
- Wheeler, R. E. M. Civilizations of the Indus Valley and Beyond, London, 1966.
- Wheeler, R. E. M. Five thousand years of Pakistan : An Archaeological Outline, Karachi, 1992.
- Wheeler, R. E. M. My Archaeological Mission to India and Pakistan, London,1976.
समीक्षक – शरद राजगुरू