दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वतश्रेणीतील एक खिंड. ही खिंड सस.पासून ३,८१० मीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील अ‍ॅकन्काग्वा (उंची ७,०३५ मी.) हे पश्चिम गोलार्धातील तसेच अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर आणि दक्षिणेकडील तूपूंगगातो (६,५७० मी.) शिखर यांदरम्यान उस्पालाता खिंड आहे. अ‍ॅकन्काग्वा शिखरच्या पायथ्याजवळून अ‍ॅकन्काग्वा नदी वाहते. अर्जेंटिनामधील मेंदोसा आणि चिलीतील सँटिआगो (चिलीची राजधानी) ही दोन शहरे या खिंडमार्गाने एकमेकांना जोडली गेली आहेत. ट्रान्स-अँडीयन (चिली-अर्जेंटिना) लोहमार्ग बांधण्यापूर्वी उस्पालाता खिंडीचा मार्ग म्हणजे माणसांच्या तसेच मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या प्राण्यांच्या रहदारीचा एक कच्चा रस्ता होता. अटलांटिक किनाऱ्‍यावरील ब्वेनस एअरीझ (अर्जेंटिनाची राजधानी) आणि पॅसिफिक किनाऱ्‍यावरील व्हॅलपारेझो बंदर (चिली) यांना जोडणारा रस्ता व लोहमार्ग या खिंडीतून जातो. त्यासाठी खिंडीखालून बोगदा काढलेला आहे. पूर्वी ब्वेनस एअरीझवरून व्हॅलपारेझोला जाण्यासाठी दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकावरील केप हॉर्न भूशिराला वळसा घालून जाणाऱ्‍या सागरी मार्गाचा वापर करावा लागे; परंतु उस्पालाता खिंडीतील मार्गामुळे सागरी मार्गावरील ५,६३० किमी.चे अंतर आणि ११ दिवसांचा प्रवास कमी झाला आहे. वसाहतकाळापासून उस्पालाता खिंडमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे; परंतु १९८४ पासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. पॅन-अमेरिकन महामार्ग या खिंडीजवळून काढलेल्या ख्रिस्त द रिडीमर नावाच्या भुयारी मार्गाद्वारे जातो.

इसवी सन १८१७ मध्ये होसे दे सान मार्तीन या अर्जेंटिनी स्वातंत्र्यसेनानी व नेत्याने चिली येथील स्पॅनिश राजेशाहीच्या विरोधातील लढ्यासाठी आपल्या देशभक्त सैन्याच्या काही तुकड्या उस्पालाता खिंडीद्वारेच पाठविल्या होत्या. त्यामुळे उस्पालाता खिंडीला ‘लिबरेटर्स खिंड’ असेही म्हणतात. स्पॅनिश भाषेमध्ये ‘शिखर खिंड’ असेही नाव आहे.

चिली-अर्जेंटिना यांच्यात शांतता करार होऊन सीमावाद मिटल्याच्या स्मरणार्थ उस्पालाता खिंडीमध्ये या दोन्ही देशांच्या सीमेवर ख्रिस्ताचा भव्य पुतळा उभारलेला आहे.

समीक्षक : वसंत चौधरी