आल्प्स पर्वतातील दोन खिंडी. स्वित्झर्लंड-इटली यांदरम्यानची ग्रेट (ग्रँड) सेंट बर्नार्ड, तर फ्रान्स-इटली यांना जोडणारी लिटल (पेटिट) सेंट बर्नार्ड या नावांनी या खिंडी ओळखल्या जातात. प्राचीन काळापासून पर्वत ओलांडण्यासाठी या खिंडींचा वापर केला जात आहे.

ग्रेट सेंट बर्नार्ड : स्वित्झर्लंड-इटली यांच्या सरहद्दीवरील या खिंडीला रोमन लोक ‘आल्पीस पोएनिना’ असे म्हणत. नैर्ऋत्य पेनाइन आल्प्समधील माँ ब्लां या गिरिपिंडाच्या पूर्वेस सस.पासून २,४६९ मी. उंचीवर असलेली ही खिंड आल्प्समधील सर्वाधिक उंचावरील खिंडींपैकी एक आहे. खिंडीच्या वायव्येस ३९ किमी.वर असलेले मार्तीन्यी (स्वित्झर्लंड) आणि आग्नेयीस ३४ किमी.वर ऱ्होन खोऱ्यात असलेले ऑस्टा (इटली) ही दोन ठिकाणे या खिंडमार्गाने जोडली आहेत.

इसवी सन पहिल्या शतकात या खिंडीतून रस्ता करण्यात आला होता. खिंडीतील सरोवराजवळ खडकांत खोदून तयार केलेल्या ३·७ मी. रुंदीच्या रस्त्याचे अवशेष अजून पाहावयास मिळतात. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीमुळे ही खिंड वर्षातील जेमतेम पाचच महिने वाहतुकीस खुली असे. ऐतिहासिक दृष्ट्या या खिंडीला विशेष महत्त्व होते. सेंट बर्नार्ड यांनी इ. स. अकराव्या शतकामध्ये या खिंडीत एक धर्मशाळा बांधली. खिंडीतून प्रवास करताना संकटात सापडलेल्या लोकांच्या दृष्टीने या धर्मशाळेला फार महत्त्व होते. या मार्गावरून जाताना रस्ता चुकलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी प्रसिद्ध सेंट बर्नार्ड कुत्र्यांचा उपयोग करून घेतला जाई व त्यांना तेथे तसे प्रशिक्षण दिले जात असे. आजही या धर्मशाळेमध्ये प्रवाशांना अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. गॉल, रोमन लोक तसेच शार्लमेन, सम्राट चौथा हेन्री, फ्रेडरिक बार्बारोसा, पहिला नेपोलियन यांनी या खिंडीतील मार्गाचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात. रोमनांनी लष्करी मार्ग म्हणून तिचा वापर केला होता. इ. स. १८०० मध्ये नेपोलियन आपल्या सुमारे ४०,००० सैन्यांसह या खिंडीतील रस्त्याने इटलीत उतरले होते.

सांप्रत खिंडीतून १९६४ मध्ये मोटार वाहतुकीसाठी ५·६ किमी. लांबीचा बोगदा खोदण्यात आला असून आता या मार्गाचा वापर वर्षभर होऊ लागला आहे. या बोगद्यामुळे मार्तीन्यी व ऑस्टा यांमधील प्रवासाचा वेळ जवळजवळ एका तासाने कमी झाला आहे; परंतु खिंडीतील मूळ रस्ता आणि त्यावरील धर्मशाळेचे महत्त्व कमी झाले आहे. या खिंडीच्या माथ्यावर ज्यूपिटर पोएनिनस मंदिराचे भग्नावशेष आढळतात.

लिटल सेंट बर्नार्ड : फ्रान्समधील माँ ब्लां गिरिपिंडाच्या दक्षिणेस व देशाच्या आग्नेय भागातील ग्रेयन आल्प्स यांदरम्यान सस.पासून २,१८८ मी. उंचीवर ही खिंड आहे. या खिंडीतून काढण्यात आलेल्या रस्त्याने खिंडीच्या नैर्ऋत्येस ११ किमी. अंतरावर असलेले बॉर-सॉ-मॉरीस (फ्रान्स) हे ठिकाण ईशान्येस १६ किमी.वरील व्हाले दा ऑस्टा (इटली) या ठिकाणाशी जोडले गेले आहे. हा खिंडमार्ग अन्य मार्गांच्या तुलनेत सोपा असल्यामुळे इ. स. पू. २१८ मध्ये हॅनिबल यांनी कार्थेजिनियन सैन्य इटलीमध्ये नेण्यासाठी या खिंडीतील मार्गाचा अवलंब केला होता. ग्रीक विभूती हरक्यूलस यांनीही स्पेनवरून परतताना या खिंडीचा वापर केला होता. रोमन लोक हिचा उल्लेख आल्पीस ग्राइआ (ग्रीक खिंड) असा करीत. इ. स. पू. ७७ मध्ये माँझनेव्र खिंड सुरू होईपर्यंत या खिंडीला महत्त्व होते.

समीक्षक : माधव चौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.