बोर या वनस्पतीचा समावेश ऱ्हॅम्नेसी कुलातील झिझिफस प्रजातीत केला जातो. झिझिफस प्रजातीत सु. ४० जाती असून भारतात या प्रजातीतील सु. १७ जाती वन्य अवस्थेत आढळून येतात. त्यापैकी पुष्कळ जातींची मांसल आठळीयुक्त फळे खाद्य आहेत व ती बोर या सामान्य नावाने ओळखली जातात. भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळणाऱ्या बोर वनस्पतीचे शास्त्रीय नाव झिझिफस मॉरिशियाना आहे. या वृक्षाचा प्रसार सर्वत्र घडून आल्यामुळे त्याचे मूळस्थान निश्‍चित सांगता येत नाही. मात्र तो दक्षिण आशियातील असावा, असे वैज्ञानिकांचे मत आहे. म्यानमार, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या देशांत तो दिसून येतो. भारतात वनांमध्ये तसेच लागवडीखाली या बोराचे वृक्ष आढळतात. हिमालयात समुद्रसपाटीपासून सु. १,००० मी. उंचीपर्यंत तो आढळून येतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बोराच्या इतर जाती आढळतात. झिझिफस प्रजातीतील झिझिफस झिझिफस (झिझिफस जुजुबा) ही बोराची आणखी एक जाती भारतात आणि अन्य देशांत आढळून येते. पाने, फुले, फळे इ. संदर्भात झि. मॉरिशियाना  आणि झि. झिझिफस या दोन्ही जातींमध्ये खूप साधर्म्य दिसून येते.

बोर (झिझिफस मॉरिशियाना): (१) वृक्ष, (२) पाने व फळांसहित फांदी

बोर वृक्ष लहान, सदापर्णी व काटेरी असून सु. १२ मी. उंच वाढतो. खोडाची साल गडद काळी व भेगाळलेली असते. खोडाला अनेक शाखा फुटलेल्या असतात. पाने साधी, एकाआड एक, लहान, लंबगोल व तीन मुख्य शिरांची असतात. पानांचा रंग वरच्या बाजूला हिरवा व खालच्या बाजूला पांढरट असतो. पानांचे काटे तीक्ष्ण व देठाजवळ जोडीने असून एक काटा सरळ तर दुसरा वाकडा असतो. फुलोरे पानांच्या बेचक्यांत वल्लरीत येत असून फुले लहान व हिरवट पांढरी असतात. ती एप्रिल–ऑक्टोबर या महिन्यांत येतात आणि सु. ४–५ महिन्यांनंतर त्यांना फळे येतात. फळे गोल व लंबगोल असून जातीनुसार ती लहानमोठी असतात. ती सुरुवातीला हिरवी असून पिकायला लागली की पिवळी व भगवी होऊन शेवटी लाल होतात. फळे मांसल असून प्रत्येक फळात एक कठीण बी असते. मधमाशी व घरमाशी यांच्याद्वारे या वनस्पतीमध्ये परागण होते.

बोराचे मूळ व पाने ज्वरनाशक असून फळे शुक्रवर्धक व पित्त कमी करणारी आहेत. फळे प्रतिऑक्सिडीकारक, शामक व चवीला आंबटगोड असून गर पौष्टिक व चविष्ट असतो. फळांमध्ये प्रथिने, कर्बोदके, आणि जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम असते. महाराष्ट्रात बोराची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यापासून सरबत व कँडी तयार करतात. तसेच बोरे वाळवून त्यांची पावडर तयार करतात. ती पावडर मिठाई आणि चटणी तयार करण्यासाठी वापरतात. बाजारात सुकलेली बोरे उपलब्ध असतात. काही ठिकाणी या वृक्षाची पाने उंट, गुरे आणि बकऱ्या यांना चारा म्हणून खाऊ घालतात. लाखेचे कीटक पोसण्यासाठी या वृक्षाचा वापर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा