जोशी, रामचंद्र : (? १९२० — ६ ऑक्टोबर १९९७). विख्यात भारतीय आद्य पुरातत्त्वीय भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म कर्जत येथे झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत बी. एस्सी. पदवी घेतल्यानंतर (१९४२) त्यांनी मुंबई विद्यापीठातून भूविज्ञान या विषयात एम. एस्सी. पदवी संपादन केली (१९४५). शिक्षण पूर्ण होताच ते धारवाडला व्याख्याता म्हणून नोकरी करू लागले.

लंडनच्या सुप्रसिद्ध इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी येथील पर्यावरण व पुरातत्त्व या क्षेत्रातले अग्रणी एफ. ई. झॅायनर (१९०५—१९६३) हे भारतात आले होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी जोशींना मिळाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जोशी यांनी पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट ही पदवी संपादन केली (१९५४). ‘प्लाइस्टोसीन स्टडीज इन मलप्रभा बेसीन’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यानंतर त्यांची कर्नाटक विद्यापीठात नव्याने स्थापन झालेल्या भूविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली (१९५४). पुढे ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या संस्थेच्या प्रागैतिहास विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले (१९५७). या संस्थेत त्यांनी पंधरा वर्षे काम केले व अनेक प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांचा शोध लावला. मध्य प्रदेशातील आदमगढ नावाच्या प्रागैतिहासिक शैलाश्रयाचे (Rock shelter) त्यांनी उत्खनन केले व या उत्खननाचा अहवाल पुस्तक रूपात प्रसिद्ध केला (१९७८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात अधिकारी असतानाच त्यांनी नेपाळमध्ये काठमांडूच्या परिसरात केलेले संशोधन हा तेथील पुरातत्त्वीय संशोधनात अतिशय महत्वाचा टप्पा मानला जातो.

एक भूवैज्ञानिक या नात्याने जोशी यांनी अश्मयुगीन संस्कृतीच्या गाळाच्या निक्षेपांमध्ये मिळणाऱ्या अवशेषांच्या अभ्यासाची पद्धत तयार केली. त्यांचे गोदावरीच्या खोऱ्यातील भूपुरातत्त्वीय संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील कोकण किनाऱ्यावर सखोल सर्वेक्षण करून तेथे मिळणारी सूक्ष्म अवजारे वापरणारी संस्कृती (microlithiic culture) व इतिहासपूर्व काळात समुद्राच्या पातळीत वेळोवेळी झालेले बदल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी रायगडच्या पायथ्यापाशी असणाऱ्या पाचाड येथे एका शैलाश्रयाचे उत्खनन केले. दख्खनच्या पठारावर, विशेषतः महाराष्ट्रात मध्याश्मयुगात हवामान अधिक आर्द्र होते व त्यामुळे मध्याश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळे कमी प्रमाणात मिळतात, अशी सिद्धांतकल्पना त्यांनी मांडली होती.

पुरातत्त्वीय संशोधनामध्ये पर्यावरणासंबंधी निष्कर्ष काढण्यासाठी व प्राचीन वसाहतींमध्ये विविध कामे कशी व नेमकी कोणत्या भागांमध्ये चालत असत हे समजण्यासाठी रासायनिक पद्धतींचा अधिक वापर व्हायला हवा, असे त्यांचे मत होते. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण चार विद्यार्थ्यांनी पी. एचडी. पदवी संपादन केली. १९७२ मध्ये ते डेक्कन कॅालेज, पुणे येथे प्रागैतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथूनच ते १९८१ मध्ये सहसंचालक या पदावर असताना निवृत्त झाले.

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

                                                                                                                                       समीक्षक : अनुपमा क्षीरसागर