कालखंडावर आधारलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची शाखा. ज्या काळाबद्दल लिखित स्वरूपातील माहिती उपलब्ध आहे अशा म्हणजे ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींचा पुरातत्त्वीय पद्धतीने अभ्यास या शाखेत केला जातो. एकोणिसाव्या शतकापासूनच इतिहासात ज्ञात अशा स्थळांचे उत्खनन केले जात आहे. परंतु भूतकाळातील मानवी संस्कृतीकडे बघणे हा पुरातत्त्वविद्येचा मुख्य दृष्टीकोन असल्याने फक्त लेखनपूर्व काळासाठीच (प्रागैतिहास) नव्हे, तर पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून ऐतिहासिक काळात घडलेल्या घटनांचा मागोवा घेता येतो या विचारांना तुलनेने अलीकडच्या काळात मान्यता मिळाली.
लेखनाची सुरुवात सु. ५००० वर्षांपूर्वी मेसोपोटेमियात झाली, असे मानले जाते. लिपींच्या स्वरूपात प्रत्यक्ष लेखनाचे पुरावे जगाच्या निरनिराळ्या भागांत वेगवेगळ्या काळापासून आढळतात. त्यामुळे ऐतिहासिक पुरातत्त्वाची व्याप्ती सर्वत्र सारखी नाही. यूरोपात प्राचीन ग्रीक कालखंडापासून इतिहासाचा प्रारंभ होतो, तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात यूरोपीय वसाहतींच्या स्थापनेने इतिहासकाळ सुरू झाला, असे मानले जाते. त्यामुळे अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टीकोनातून गेल्या फक्त ५०० वर्षांच्या काळाच्या अभ्यासाचा समावेश ऐतिहासिक पुरातत्त्वात होतो, तर यूरोपीय पुरातत्त्वज्ञ ऐतिहासिक पुरातत्त्व आणि मध्ययुगीन पुरातत्त्व यांच्यात फरक करतात. भारताच्या संदर्भात मौर्य काळापूर्वीच्या महाजनपदांच्या उदयापासून ते गुप्त काळाची अखेर या दरम्यानच्या काळातील स्थळांच्या पुरातत्त्वीय संशोधनाचा समावेश ऐतिहासिक पुरातत्त्वात केला जातो.
ऐतिहासिक पुरातत्त्वातील क्षेत्रीय पद्धती म्हणजे सर्वेक्षण, उत्खनन आणि अवशेषांचे विश्लेषण या कोणत्याही इतर काळाच्या पुरातत्त्वीय पद्धतींप्रमाणेच असतात. फक्त या संशोधनात उपलब्ध असलेल्या लिखित पुराव्यांचा (उदा., उत्कीर्ण लेख व ताम्रपट) आणि नेमका काळ ठरवण्यासाठी मिळालेल्या नाण्यांचा वापर केला जातो. तसेच परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने शक्य असल्यास वापरली जातात. ऐतिहासिक पुरातत्त्व आणि इतिहास यांचे नाते विचित्र स्वरूपाचे आहे. ज्या काळाबद्दल लिखित माहिती आहे, त्याबद्दल पुरातत्त्वीय पुराव्यांची गरज नाही असा आक्षेप घेतला जातो. काही वेळा ऐतिहासिक पुरातत्त्वातील (आणि मध्ययुगीन पुरातत्त्व) संशोधनाचे निष्कर्ष पारंपरिक इतिहासाच्या लेखनात दुय्यम मानले जातात; तथापि पारंपरिक स्रोतांमधून दिसणारे प्राचीन काळाचे स्वरूप मर्यादित असते. कारण अशा इतिहासात फक्त अभिजन वर्गांसंबधी (ज्यांच्याबद्दल लिहिले जात असे, असे सत्ताधारी प्रस्थापित लोक) घटनांचे प्रतिबिंब पडते. या उलट पुरातत्त्वीय संशोधनातून सर्वसामान्य लोकांचे जीवन व व्यवहार यांची माहिती मिळत असल्याने ऐतिहासिक पुरातत्त्वाला हळूहळू पुरातत्त्वविद्येची महत्त्वाची शाखा अशी मान्यता मिळाली. ऐतिहासिक पुरातत्त्वातील संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी १९९७ पासून इंटरनॅशनल जर्नल ऑफ हिस्टॉरिकल आर्किऑलॅाजी हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रकाशित होत आहे.
भारतात ऐतिहासिक कालखंडात अनेक सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे घडली. नवीन धार्मिक कल्पनांच्या बरोबरीने स्तूप, चैत्य आणि तत्सम वास्तूंची निर्मिती सुरू झाली. याच काळामध्ये नागरीकरण आणि व्यापार व उद्योगांमुळे मोठी गावे, बंदरे, व्यापारी केंद्रे आणि राजकीय सत्तेसाठी महत्त्वाची असणारी शहरे यांचा विकास झाला. नगररचना; घरांची व व्यापारी पेठांची रचना; ग्रामीण भाग, छोटी गावे आणि शहरे यांच्यातील सामाजिक व आर्थिक संबंध; ग्रामीण व नागरी जीवन पद्धती; नवीन वसाहतींचा उदय; देशांतर्गत आणि परदेशांशी असणारा व्यापार (विशेषतः रोमन साम्राज्याशी असलेला व्यापार); दळणवळणाची साधने; आर्थिक राजकीय व धार्मिक संस्थांच्या आस्थापना आणि तत्कालीन पर्यावरण हे ऐतिहासिक पुरातत्त्वातील काही महत्त्वाचे विषय आहेत.
तक्षशीला (सध्या पाकिस्तान); कनिषपूर (काश्मीर); उत्तर प्रदेशमधील हस्तिनापूर, कौशांबी, राजघाट, श्रुंगवेरपूर, अहिच्छत्र, झुसी; बिहारमधील पाटलीपुत्र, वैशाली, नालंदा, राजगीर; मध्य प्रदेशमधील महेश्वर, सांची; महाराष्ट्रातील अडम, पवनी, नाशिक, नेवासा, पैठण, तेर; चंद्रकेतूगढ (पश्चिम बंगाल); महास्थानगढ (बांगला देश); शिशुपालगढ (ओडिशा); सन्नती, ब्रह्मगिरी (कर्नाटक); नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश); अरिकामेडू (तमिळनाडू) आणि पटनम (केरळ) या स्थळांचे उत्खनन अहवाल ही भारतीय ऐतिहासिक पुरातत्त्वाची काही उदाहरणे आहेत.
संदर्भ :
- Guha, S. ‘Negotiating Evidence : History, Archaeology and The Indus civilization’, Modern Asian Studies, 39,: 399-426, 2005.
- Lewis, Barry, ‘India : Historical Archaeology’, Encyclopedia of Global Archaeology (Claire Smith Ed.), pp. 3751-3760, Springer, 2014.
- Orser, Charles E. Jr. Historical Archaeology, Third Edition, Routledge, 2018.
- Renfrew, Colin & Bahn, Paul, Archaeology, Sixth Edition, London, 2012.
- Smith, Monica, L. The archaeology of an Early Historic town in central India, Oxford, 2001.
- Trigger, Bruce, A History of Archaeological Thought, Cambridge, 1996.
- जोगळेकर, प्रमोद, ‘पुरातत्त्वातील संशोधनातील नवीन प्रवाह’, संशोधक, ७२(१), ३-१४, २००४.
- जोगळेकर, प्रमोद, संपा., शिवदे, सदाशिव, ‘उत्खननातून इतिहासाकडे नेणारे पुरातत्त्वविज्ञान’, संशोधन पत्रिका , पृष्ठे ३०-३६, इंदापूर, २०१४.
समीक्षक : सुषमा देव