एक औषधी झुडूप. भारंगी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेरोडेंड्रॉन सेरॅटम आहे. रॉथिका सेराटा अशा शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. साग हा वृक्ष याच कुलातील आहे. भारंगी मूळची आशियातील असून अनेक देशांत तिचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात कोकण, खंडाळा, महाबळेश्वर, कात्रज घाट इ. ठिकाणी ती आढळते. या वनस्पतीला इंग्रजी भाषेत ‘ब्लू फांऊंटन बुश’ असेही म्हणतात.
भारंगीचे झुडूप १–४ मी. उंच वाढते. खोड व फांद्या चौकोनी असतात; परंतु त्यांच्या कडा धारदार नसतात. पाने साधी, बहुधा त्रिदल व समोरासमोर असतात. सामान्यपणे ती १२–१५ सेंमी. लांब, लंबगोल व ओबडधोबड असतात. दर वेळेला फांद्या फुटतात तेथे लघुकोनी छदांची एक जोडी येते व दुबळक्यात फूल येते. फुले निळी, असंख्य व शोभिवंत असून लांब मंजिरीत येतात व ती सच्छद असतात. दलपुंज बाहेरून केशहीन, फिकट निळा व दंडगोलाकार असून फुलातील पुंकेसर ठळकपणे दिसून येतात. फळ आठळीयुक्त, जांभळे व चार भागांचे असून त्यात चार बिया असतात.
भारंगीच्या मुळांना तिखट, कडू व जहाल चव असते. त्यांचा वापर ज्वर व संधिवात यांवर करतात. पानांचा लेप डोकेदुखी तसेच नेत्रदाह कमी करण्यासाठी वापरतात. बिया सौम्य रेचक असतात व त्यांचा वापर काही प्रमाणात जलोदरावर करतात. नवीन संशोधनानुसार भारंगीच्या पानांमध्ये प्रतिऑक्सिडीकारक व सूक्ष्मजीवरोधी गुणधर्म असून या सर्व गुणधर्मांचा एकत्रित वापर करून नवीन औषध तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.