भुईरिंगणी ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम झँथोकार्पम आहे. सोलॅनम प्रजातीत सु. १,५०० जाती असून भारतात त्यांपैकी सु. ४० जाती आढळतात. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका इ. भागांत भुईरिंगणीचा प्रसार झाला आहे. भारतात ती सर्वत्र तणासारखी वाढलेली आढळते. महाराष्ट्रात तिला काटेरिंगणी असेही म्हणतात.

भुईरिंगणी (सोलॅनम झँथोकार्पम) : (१) जमिनीवर पसरलेली वनस्पती, (२) फूल व कळ्या, (३) फळे

भुईरिंगणी बहुवर्षायू, काटेरी व अनेक शाखा असलेली वेल असून ती सु. १·२ मी. उंच वाढते. वाढताना ती जमिनीवर पसरते. खोड आणि फांद्या नागमोडी असून कोवळ्या फांद्यांवर चांदणीच्या आकाराचे केस असतात. जुन्या फांद्या वेड्यावाकड्या व जमिनीलगत पसरलेल्या असून त्यांवर तीक्ष्ण, पिवळे व चकचकीत काटे असतात. पाने साधी व केसाळ असून कडा काही ठिकाणी विभाजित असतात. पानांतील शिरा व उपशिरा काटेरी असून देठांवर काटे असतात. फुलोरा ससीमाक्ष प्रकारचा असून त्यात मुख्य अक्षाच्या टोकाला फुले असतात. फुले २ सेंमी. लांब व जांभळी असतात. मृदुफळ १·२–२ सेंमी. व्यासाचे, पिवळे किंवा पांढरट असून त्यावर हिरवे व वेगवेगळ्या आकारांचे चट्टे असतात. फळाभोवती निदलपुंजाचे  आवरण असते. फळात अनेक लहान बिया असून त्या गुळगुळीत असतात.

भुईरिंगणी ही वनस्पती औषधी असून आयुर्वेदात वेगवेगळ्या व्याधींवर वापरली जाते. दशमूळ औषधातील एक घटक म्हणून भुईरिंगणीचे मूळ वापरतात. कोवळ्या पानांचा रस लघवी साफ होण्यासाठी देतात. मुतखडा, ताप, खोकला आणि छातीतील वेदना यांवरही ती उपयुक्त आहे. तिच्या पानांची भाजी करून खातात. पाने बोकडांना खाऊ घालतात. फळे आमटीत वापरतात. बिया कृमिनाशक असून खरूज, दमा व खोकला यांवर उपयोगी आहेत.

रिंगणी : भारतात सोलॅनम प्रजातीतील आणखी एक वनस्पती आढळते. तिला रिंगणी किंवा रानरिंगणी असे नाव असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम इंडिकम आहे. भारतात विशेषेकरून दक्षिणेत व कोकणात तिचा प्रसार झालेला आहे. या वनस्पतीची सामान्य शारीरिक लक्षणे भुईरिंगणीप्रमाणे आहेत. मात्र रिंगणी या वनस्पतीची मृदुफळे किंचित लहान म्हणजे सु. ८ मिमी. व्यासाची असतात. या वनस्पतीचे सर्व भाग औषधी असून ती दशमुळाचा काढा तयार करण्यासाठी वापरतात.

This Post Has One Comment

  1. नितीन नवगिर..

    खूप छान माहिती दिल्या बद्दल आपले धन्यवाद..

प्रतिक्रिया व्यक्त करा