डोक्याच्या किंवा मानेच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या वेदनांना सामान्यपणे डोकेदुखी म्हणतात. जगभरातील सर्व मानवजातींमध्ये आढळणारे हे एक शारीरिक दु:ख आहे. मेंदूतील ऊती ह्या वेदनांना संवेदनाशील नसतात, कारण त्यांच्यात वेदनाग्राही चेतापेशी नसतात. परंतु मेंदूच्या भोवतालच्या भागांत वेदनाग्राही चेतापेशी असतात. जसे कर्पर स्नायू, मान आणि डोक्याचे स्नायू, चेता, रक्तवाहिन्या, त्वचा, डोळे, कान, नाक, श्लेष्मल पटले इत्यादी. अशा भागांतील वेदनाग्राही भागाचे तीव्र उद्दीपन म्हणजे डोकेदुखी.

डोकेदुखीची कारणे

डोकेदुखी ताण – प्रकारची (प्रायमरी) डोकेदुखी : प्राथमिक डोकेदुखीचा सर्वपरिचित प्रकार म्हणजे ताण-प्रकारची डोकेदुखी. डोके दुखणे हे याचे मुख्य लक्षण आहे. ९०% लोकांना या प्रकारची डोकेदुखी होते. अपुरी आणि तुटक-तुटक झोप, मानसिक ताण, नैराश्य, भावनिक समस्या इत्यादी कारणांमुळेही डोकेदुखी उद्भवते. एकेकाळी मान आणि डोके यांचे स्नायू ताणले गेल्यानेही डोकेदुखी उद्भवते, असे मानले जात असे. डोके दुखत असताना या स्नायूंमध्ये ताण नसतो, असे अनेक संशोधनांतून आढळले आहे. परंतु स्थिर व सौम्य वेदना हे प्राथमिक डोकेदुखीचे लक्षण असते. या प्रकारात डोक्याच्या पुढच्या भागात, डोळ्यांच्या मागील भागात, मानेच्या मागे, किंवा या सर्व भागांत मिळून वेदना होतात.

अधूनमधून होणाऱ्या ताण-प्रकारच्या डोकेदुखीवर वेदनाशामके देऊन विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. तसेच काही वेळा स्नायू शिथिल होण्यासाठीही औषधे देतात. ताण-प्रकारची डोकेदुखी वारंवार होत असेल तर डॉक्टर सहसा वेदनाशामके देत नाहीत. कारण कालांतराने ही औषधे अंगवळणी पडून डोकेदुखीवर ती प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे औषधांचा अंमल ओसरला की डोकेदुखी पुन्हा उद्भवते. अशी डोकेदुखी दूर करण्यासाठी डॉक्टर नैराश्यरोधी (अँटीडिप्रेसंट) औषधांची मात्रा देतात.

अर्धशिशी हा प्राथमिक डोकेदुखीचाच प्रकार आहे. या प्रकारात डोक्याच्या अर्ध्या भागात वेदना होतात. (पहा : अर्धशिशी)

त्रिशाखी शूल (त्रिशाखी चेतांमुळे चेहऱ्याला होणारी वेदना) हादेखील प्राथमिक डोकेदुखीचा एक प्रकार आहे.

अनुषंगी (सेकंडरी) डोकेदुखी : ही डोकेदुखी शरीरातील अन्य भागांच्या दुखण्यामुळे उद्भवते. या प्रकारच्या डोकेदुखीवर इलाज करताना डोकेदुखी दूर करण्याबरोबर आजार बरा करणे, हाही उद्देश असतो. नासामार्गात काही कारणांनी अवरोध झाल्यास ही डोकेदुखी उद्भवते. हा अवरोध दूर करण्यासाठी औषधे, वेदनाशामके आणि विश्रांतीचा सल्ला देतात. जीवाणूंचे संक्रामण असल्यास डॉक्टर प्रतिजैविके देतात. काही वेळा मेंदू आणि मेरुरज्जू यांना झाकून टाकणाऱ्या पटलाला संक्रामण झाल्यास (मेंदू-आवरणदाह) तीव्र डोकेदुखी होते. अशा वेळी डोक्यात घण मारल्यासारखे वाटते. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यास (स्ट्रोक) किंवा मेंदूत रक्तस्राव झाल्यास अनुषंगी डोकेदुखी उद्भवते. कानदुखीमुळेही डोकेदुखी होते. काही वेळा दृष्टिदोष असल्यास डोके सतत दुखते. डोळे तपासून चष्मा लावल्यास ही डोकेदुखी थांबते.

पन्नाशी उलटल्यानंतर अचानक डोकेदुखी झाली तर गंभीरपणे विचार करावा. एखाद्या अवयवाच्या हालचालीवर परिणाम झाल्यास, मानसिक गोंधळ असल्यास, शारीरिक स्थिती बदलल्यास, अतिश्रम केल्यास, दृष्टिदोष असल्यास आणि मानेचे स्नायू घट्ट झाल्यास डोकेदुखी उद्भवू शकते. अशा वेळी संपूर्ण चिकित्सा करावी लागते.

पाणी भरपूर पिणे, कॉफी टाळणे, पुरेशी झोप घेणे, अतिश्रम टाळणे, समतोल आहार घेणे इत्यादी डोकेदुखीवर प्रतिबंधक उपाय आहेत.