माजिदी, माजीद : (१७ एप्रिल १९५९). प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथाकार. त्यांचा जन्म तेहरान, इराण येथे झाला. तेहरान येथे मध्यमवर्गीय इराणी कुटुंबात वाढलेल्या माजीदींनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून हौशी नाटक समूहांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रामॅटिक आर्टस्’ या संस्थेत त्यांनी शिक्षण घेतले. इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबाफ यांच्या बॉयकॉट (१९८५) या चित्रपटात त्यांनी वलेह नावाच्या तरुणाची भूमिका साकारली होती. माजिदींनी दिग्दर्शित केलेल्या चिल्ड्रन ऑफ हेवन (१९९८) या चित्रपटाची परकीय भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्काराकरिता निवड झाली होती. ऑस्कर पुरस्काराकरिता निवड झालेला हा पहिला इराणी चित्रपट होय. मात्र या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला नाही. द कलर ऑफ पॅराडाईज (२०००), बरान (२००१), दी विलो ट्री (२००५) हे चित्रपट माजिद माजिदींनी दिग्दर्शित केले. अफगाणी विस्थापितांची व्यथा मांडणारा बेअरफूट टू हार्ट (२००२) हा माहितीपट (documentary) देखील माजीदींनी दिग्दर्शित केला. भारतात विशाखापट्टणम् येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माजिदींनी दिग्दर्शित केलेला दी साँग ऑफ स्पॅरोज हा चित्रपट दाखवण्यात आला होता. माजीदींनी ७ माहितीपट, ४ लघुपट आणि ९ सिनेमांची निर्मिती केली आहे. झी स्टुडियोने निर्मिती केलेल्या बियाँड दी क्लाऊडस् (२०१८) या चित्रपटाचे दिग्दर्शन माजीदींनी केले. हा त्यांचा नववा पूर्ण लांबीचा चित्रपट (फीचर) आहे. भाऊबहिणीच्या नातेसंबंधावर व माणुसकीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड (२०२०) हा माजिदींचा चित्रपट मोहम्मद पैगंबर यांच्या बालपणावर आधारित आहे.
माजिदींच्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय व कल्पनांचा वापर केलेला आढळून येतो. इराण येथील राजकीय वातावरण, तेथील सरकारने केलेली मुस्कटदाबी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादलेली बंधने या सर्वांना सामोरे जात माजीदींनी केलेली निर्मिती महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कथा सांगण्याची वेगळी हातोटी आणि वास्तववाद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न प्रेक्षकांना भावतो. माजिदींच्या चित्रपटांमध्ये इस्लामिक क्रांतीनंतरच्या इराणमधील जीवनाचे दर्शन तर घडतेच, पण सामाजिक आणि राजकीय समस्यांवर त्यांचा चित्रपट हळुवारपणे प्रभावी भाष्य करतो.
मानवतावाद हे माजिदीच्या चित्रपटाचे महत्त्वाचे अंग आहे. त्यांचे चित्रपट सध्याच्या काळात घडणारे असले तरी, इराणमधील जुन्या व नव्या जीवनपद्धतीचा मिलाफ त्यामध्ये दिसून येतो. इराणमध्ये टिकून असलेल्या सूफी संस्कृतीची झलक त्याच्या सिनेमातून पहायला मिळते. त्याच्या चित्रपटांची शैली काव्यमय आहे. बरेचसे प्रसंग घडत असताना, पडद्यावर सूफी कविता उलगडल्याचा भास हे चित्रपट बघत असताना होतो. प्रशिक्षित कलावंत न घेता सामान्य लोकांकडून पाहिजे तसे काम करवून घेण्यात माजिदींची हातोटी आहे. त्यांच्या मतानुसार, प्रशिक्षित अभिनेते न घेता कथेच्या मागणीनुसार पात्रनिवड केली, की ती पात्रे प्रेक्षकांना अधिक जिवंत व जवळची भासतात. उदा., बरान या चित्रपटाकरिता अनेक महिने शोधून त्यांनी अफगाणिस्तान सीमेजवळच्या विस्थापितांच्या (रेफ्युजी) छावणीमधील मुलगी निवडली. जिच्याकडून त्यांनी कणखर आणि बाणेदार असलेल्या आणि प्रसंगी हळव्या व तरल मुलीची भूमिका करवून घेतली.
माजिदींच्या चित्रपटांमध्ये वास्तवाचे चित्रण असते. त्यांच्या चित्रपटातील घटनांचा वेग बरेचदा संथ असतो. प्रसंग, पात्रे, त्यांच्या हालचाली यांचे तपशीलवार वर्णन त्यात असते. बालपण, निरागसपणा, क्षमाशीलता इत्यादी गोष्टी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनुभवायला मिळतात. माजिदींच्या चित्रपटांमध्ये लहान मुले किंवा पौगंडावस्थेतील मुले मुख्य भूमिकेत असल्याचे पहायला मिळते. त्यांच्यामते, ‘बालपण किंवा पौगंडावस्थेचा काळ आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा काळ असतो. या काळात घेतलेले अनुभव आयुष्यभर सोबत करतात.’ मनुष्याची विचारक्षमता, जाणिवा आणि नीती-अनिती संदर्भातल्या कल्पना या बालपणीच्या निरागस वयात कशा असतात आणि नंतर काळानुसार त्या कशा बदलत जातात, याचा शोध चित्रपटाच्या माध्यमातून घेण्याचे कार्य माजिदींनी केले. माजिदींच्या मते, ‘जात, धर्म व वांशिक भेदभावापलीकडे जाऊन केवळ माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे आणि कलेच्या भाषेतून, माणुसकी, प्रेम आणि मैत्रीसंदर्भातील कल्पना, आदिम कल्पना व आशय मांडणारा चित्रपट जगभरच्या प्रेक्षकांना सहजी, विनाअडसर कळतो आणि म्हणूनच तो लोकप्रियदेखील होतो.’
माजिदी जगभरात नावाजल्या गेलेल्या चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक असून आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. माँट्रिअल वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या तीन चित्रपटांना अनुक्रमे १९९७, १९९९ आणि २००१ मध्ये पुरस्कार मिळाले. चीन शासनाने बीजिंग ऑलिपिंक स्पर्धेच्या निमित्ताने बीजिंग शहराची ओळख करून देण्याकरिता व्हिजन बीजिंग या माहितीपटाची निर्मिती करण्यासाठी ज्या मोजक्या पाच दिग्दर्शकांना आमंत्रित केले त्यांत माजिदींचा समावेश होता.
समीक्षक : अभिजित देशपांडे