डोलेराइट हा अल्पसिलिका व मध्यम कणी असलेला सामान्य अग्निज खडक आहे. अमेरिकेत याला डायाबेस म्हणतात. फेलस्पार खनिज गटाच्या प्लॅजिओक्लेज श्रेणीतील – लॅब्रॅडोराइट व पायरॉक्झीन खनिज गटातील ऑजाइट ही यातील प्रमुख खनिजे असून बऱ्याच वेळा यामध्ये मॅग्नेटाइट, इल्मेनाइट, तर कधीकधी कृष्णाभ्रक (Biotite), ऑलिव्हीन व पायराइट आणि काही दुर्मिळ प्रकारात क्वॉर्ट्झ किंवा नेफेलिन व काच असते. रासायनिक आणि खनिज घटक दृष्टीने हे खडक ज्वालामुखीय बेसाल्ट व पातालिय गॅब्रो (Plutonic Gabbro) खडकांशी समतुल्य आहेत. हे खडक रंगाने काळपट असून यांच्यातील मध्यम आकाराचे घटक कण हे गॅब्रोपेक्षा लहान अणि बेसाल्टमधील कणांपेक्षा मोठे असतात. पृथ्वीच्या कवचात या दोन खंडकांमधील खोलीत जमिनीजवळच्या भागात हा अंतर्भेदी प्रकारातील (Intrusive) प्रस्थापित खडक – शैल स्तर यांना उभ्या/तिरप्या दिशेत भेदणार्या भित्ती वा शैल स्तरांशी समांतर पाटीसारखे पसरणार्या शिलापट्ट रूपात आढळतो. मध्यम खोलीवर आढळतो म्हणून आग्निज खडकांच्या वर्गीकरणात डोलेराइट (उप) अर्धपातालिय (Hypabyssal) प्रकारात ओळखला जातो. याचे वयन (पोत) अंशा वृत्ती (Ophitic) असते. जर ऑजाइट कणात प्लॅजिओक्लेजचे स्फटिक अंतर्भूत असतील, तर वयन सर्पचित्रित असते. या खडकात मुक्त सिलिका आढळली तर अशा अतिशय दुर्मिळ खडकास क्वॉर्ट्झ डोलेराइट म्हणतात. तर कधी खडकात अत्यल्प सिलिकामुळे नेफेलिन खनिज आढळले तर अशा या दुर्मिळ खडकास नेफेलिन डोलेराइट म्हणतात. पातालिय आणि अर्धपातालिय या दोन्ही पातळींवर जेंव्हा एकाच डोलेराइटच्या खडकामध्ये स्फटिकीकरण होते तेंव्हा तो गुरुस्फटी बनतो.
डोलेराइट मुख्यतः शिलापट्ट (Sill), भित्ती (Dyke), लॅकोलिथ (Laccolith) यासारख्या अंतरभेदी रूपात आढळतो. हा कठिण, चिवट व डांबराशी एकजीव होत असल्याने रस्ता तयार करण्यासाठी याची खडी वापरतात. तसेच रस्त्याच्या कडेने तयार करण्यात येणार्या संरक्षक भिंतीसाठीही यांचा उपयोग करतात.
अलीकडे बांधकाम क्षेत्रात ब्लॅक ग्रॅनाइट या नावाने याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्वयंपाकाचा ओटा बनविण्यासाठी याचा उपयोग करतात. पॉलिश केल्यावर ते दीर्घकाळ टिकते, तसेच यातील खनिजांची स्फटिके अधिक चमकदार होऊन या पॉलिश केलेल्या पृष्ठभागावर पदार्थांचे प्रतिबिंब दिसते म्हणून बांधकाम क्षेत्रात गृहसजावाटीमध्ये डोलेराइटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वातावरण प्रक्रियेमुळे आणि पाण्याच्या सान्निध्यात याच्यात बदल होऊन प्लॅजिओक्लेजपासून सॉस्युराइट, ऑजाइट – ऑलिव्हीनपासून हॉर्नब्लेंड व सर्पेंटाइन असे हिरव्या रंगातील खनिजांमध्ये बदल होत असतात. अशा बदलेल्या खडकाना ब्रिटन आणि इतर देशांमध्ये डायाबेस, तर अमेरिकेत हिरव्या रंगामुळे याला ग्रीनस्टोन म्हणतात.
भारतात अंतर्भेदी प्रकारातील शिलापट्ट व भित्ती रूपात डोलेराइट प्रामुख्याने धारवार महासंघातील खडकांमध्ये तसेच ओरिसा, झारखंड या राज्यात ग्रॅनाइट खडकांस भेदून डोलेराइट भित्ती रूपात अनेक ठिकाणी आढळतो.
समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर