हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन ही निरपेक्ष कालमापनाची एक पद्धत असून ती प्रामुख्याने चतुर्थक कालखंडातील हिमयुगाशी निगडित घटनांच्या कालमापनासाठी उपयुक्त ठरली आहे. या पद्धतीत निक्षेपांच्या विशिष्ट अशा अगदी पातळ थरांचा उपयोग करून घेतला जातो. हे निक्षेप बर्फाशी संबंधित असतात व त्यांना हिमवाहित मृत्तिकास्तर असे म्हणतात. गेरार्ड डी. गीर (१८५८–१९४३) या स्वीडिश भूवैज्ञानिकांनी या पद्धतीचा सर्वप्रथम वापर केला (१८८४). त्यांनी स्टॉकहोमजवळ मातीचे हिमवाहित थर मोजून त्यांचा हिमयुग संपण्याच्या कालमापनासाठी उपयोग करता येईल, हे सुचवले.
पृथ्वीवर प्राचीन काळात अनेकदा फार मोठ्या भूभागावर बर्फ पसरलेला होता. या कालखंडाला हिमयुग (Ice Age/Glaciation) असे म्हणतात, तर बर्फाचे आच्छादन कमी असण्याच्या काळाला आंतरहिमयुग (Interglacial) असे नाव आहे. चतुर्थक कालखंडात (Quaternary) पृथ्वीवर शेवटचे हिमयुग १२,००० ते ११,५०० वर्षपूर्व या काळात होते. बर्फाची चादर (Ice sheet) जिथे होती, त्याजवळ असलेल्या जलाशयांच्या काठांवर हिवाळा आणि उन्हाळा यांच्यात वेगळ्या प्रकारचे निक्षेप होतात. उन्हाळ्यात वितळलेल्या बर्फाच्या पाण्यात वाहून आलेल्या मातीचा थर जाड व फिक्कट रंगाचा असतो, तर हिवाळ्यात पाण्याच्या संथ प्रवाहासोबत आलेल्या मातीमुळे पातळ व काळसर थर तयार होतो. अशा प्रकारे दरवर्षी थरांची एक जोडी (Varve Couplet) बनते. या स्तरांची गणना करून हिमवाहित मृत्तिकास्तरांमधील जीवाश्मांचे वय ठरवता येते. ही पद्धत गेल्या वीस हजार वर्षांमधील कालमापनासाठी उपयोगी पडते. शेवटचे हिमयुग संपताना सु. १३,००० वर्षांपूर्वी बर्फाची चादर आक्रसायला सुरुवात झाली, हे हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापनामुळे सिद्ध झाले. हिमयुगांच्या दरम्यान पृथ्वीवर सर्वत्र बर्फाची चादर नव्हती. त्यामुळे हिमयुगीन घटनांशी संबंध आलेल्या प्रदेशांच्या बाबतीतच ही कालमापन पद्धती उपयुक्त ठरली आहे. अर्थातच उष्ण कटिबंधातील आणि हिमयुगाच्या घटनेशी संबंध नसलेल्या प्रदेशांसाठी ही पद्धत उपयुक्त नाही.
संदर्भ :
- Lamoreux, S. ‘Varve Chronologyʼ, Tracking Environmental Change Using Lake Sediments : Volume 1, Basin Analysis, Coring and Chronological Techniques (W. M. Last & J. P. Smol Eds.,), pp. 247-260, Dordrecht : Kluwer, 2001.
- Walker, Mike, Quaternary Dating Methods, Chichester, UK : John Wiley, 2005.
- क्षीरसागर, अनुपमा, प्राचीन संस्कृतीचे कालमापन, पुणे, १९९८.
समीक्षक : अनुपमा क्षीरसागर