मॉन्सेरात, आंतोन्यो : ( १५३६–१५ मार्च १६०० ). परकीय प्रवासी व स्पॅनिश जेझुइट धर्मगुरू. त्याचा जन्म स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतातील विक दे ओझोनात येथे झाला. त्याला रोम येथे सोसायटी ऑफ जीझसमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले (१५५८). पुढे त्याची भारतात जाण्यासाठी निवड करण्यात आली (१५७४) व नंतर फादर ॲक्वाविव्हा यांच्याबरोबर अकबराच्या दरबारात पाठवण्यात आले (१५७८). हे जेझुइट पंथाचे भारतातील पहिले मिशन होते. सुरतमार्गे आग्र्यात आल्यावर मॉन्सेरातची नेमणूक अकबराचा मुलगा मुराद याचा शिक्षक म्हणून करण्यात आली. त्याने अकबराबरोबर काबूलच्या मोहिमेत भाग घेतला होता. परंतु तब्येत बिघडल्यामुळे तो जलालाबादच्या पुढे जाऊ शकला नाही व एका तुकडीबरोबर लाहोरला परतला. १५८२ मध्ये त्याला अकबराच्या राजदूताबरोबर गोव्यात पाठवण्यात आले.

मॉन्सेरातला अ‍ॅबिसिनियामध्ये जाण्याची आज्ञा देण्यात आली (१५८९). तेथे तो प्रथम सध्याच्या ओमानमधील डफार येथे अरब लोकांच्या कैदेत पडला. तेथून सुटल्यावर काही दिवसांनंतर त्याला तुर्की लोकांनी पकडले. त्याने एका भारतीय व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने आपली सुटका करून घेतली व तो गोव्यास परतला. पुढे त्याची साष्टीमध्ये नेमणूक झाली. साष्टीमध्येच त्याचा मृत्यू झाला.

मॉन्सेरातने आपल्या सुरत ते आग्रा प्रवासाचे वर्णन केले आहे. तो सुरतेत उतरल्यावर सुलतानपूरमार्गे सातपुडा डोंगर रांग, नर्मदा ओलांडून मांडू, उज्जैन, सारंगपूर, पिपलाधार नरवर, ग्वाल्हेर, धोलपूरमार्गे आग्र्याला पोहोचला. या प्रवासात त्याने भेटी दिलेल्या शहरांचे वर्णन करून ठेवलेले आहे. तो सुरतेबद्दल लिहितो, ‘हे शहर तापी नदीच्या काठावर असून शहरात मजबूत किल्ला आहे. त्याचे संरक्षण २०० तिरंदाज करतात. शहरात गोपी नावाचा तलाव असून त्याच्या कडेने २०० फूट लांबीच्या संगमरवरी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तलावाच्या जवळच ख्वाजा जफर याचा दर्गा असून तो अतिशय सुशोभित करण्यात आलेला आहे. त्या दर्ग्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या अनेक स्त्रिया भेटवस्तू तेथे ठेवतात. या तलावाच्या मध्यभागी एक बारादरी असून तेथे लोक नावेतून जातात.ʼ पुढे तो मांडूचे वर्णन करतो. ‘या शहराच्या तटबंदीची लांबी ६ मैल असून हा एक मजबूत किल्ला आहे. माळव्याच्या जुन्या राजाच्या घरात सध्याचा मोगल सरदार राहतो.ʼ मॉन्सेरातने तेथे एक अर्धवट बांधलेली माशिद बघितली. पुढे तो सिरोंजमार्गे नरवरला गेला. तसेच हा प्रवास वाटेतील दरोडेखोरांमुळे खूप धोकादायक असल्याचे तो लिहितो. या प्रवासात त्याने होळी व मोहरम हे दोन सण साजरे केल्याचे नमूद केले आहे.

नरवर सोडल्यावर मॉन्सेरात ग्वाल्हेरला पोचला. ग्वाल्हेरबद्दल तो लिहितो की, ‘मी तेथे १३ पुतळे बघितले. मला त्यातील एक पुतळा येशू ख्रिस्ताचा वाटला. इतर १२ पुतळ्यांची तोडफोड झाली आहे.ʼ पुढे तो दिल्लीबदल म्हणतो की,  ‘येथे खूप हिंदू राहतात. येथे खूप उंच आणि खूप कलाकुसर केलेली घरे आहेत. येथील रस्ते रुंद आहेत. रस्त्याच्या मधून खूप झाडे असल्यामुळे रस्त्यावर सावली असते. शहरात खूप बागा आहेत.ʼ पुढे त्याच्या लेखनात लाहोरची माहिती येते. अकबराचे वर्णन करताना तो लिहितो, ‘त्याचे खांदे विस्तृत, पाय घोडेसवारीसाठी योग्य असे बाक असलेले, रंग हलका तपकिरी, मान उजव्या खांद्याकडे झुकलेली, कपाळ रुंद, डोळे तेजस्वी, भुवया लांब, नाक सरळ छोटे आणि त्याच्या डाव्या नाकपुडी व वरच्या ओठामध्ये तीळ आहे. तो जरी दाढी करत असला तरी त्याच्या मिश्या तुर्की पद्धतीच्या आहेत. त्याच्या वंशातील प्रथेप्रमाणे तो त्याचे केस कापत नसून टोपीही घालत नाही, तर त्याने आपले केस त्याच्या पगडीमध्ये एकत्र केलेले आहेत. त्याच्या पायाला कोणतीही इजा झालेली नसली, तरी तो पायाने लंगडा आहे. त्याचे शरीर सुदृढ असून तो खूप बारीक किवा जाड नाही. त्याची अभिव्यक्ती शांत, प्रसन्न, मुक्त व सन्मानाने भरलेली आहे. मात्र जेव्हा त्याला राग येतो, तेव्हा तो भीषण होतो. त्याच्याकडे एक अंतदृष्टी असून धोके टाळण्याची व त्याच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी अनुकूल संधी शोधून काढण्याची दूरदृष्टी त्याच्याकडे आहे. त्याला शिकारीचा खूप नाद आहे.ʼ पुढे तो अकबराच्या कपड्यांचे वर्णन करताना लिहितो, ‘राजा सोन्याचे भरतकाम केलेले अति उंची कपडे वापरतो. त्याच्या अंगावर भरपूर सोन्याचे दागिने असतात. त्याचे लष्करी कपडे त्याच्या पायापर्यंत येतात. तो जेव्हा लष्करी पोशाखात असतो, तेव्हा त्याच्याजवळ यूरोपियन तलवार आणि कट्यार असते. काही वेळा खासगीत तो पोर्तुगीज कपडे वापरत असल्याचे लिहितो.ʼ तसेच, ‘अकबराने अनेक अनाथ मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे व राजपुत्रांना पर्शियन चालीरितींप्रमाणे शिक्षण देण्यात येते. मोगलांमध्ये शिकवणी चालू करण्याच्या दिवशी शिक्षकाला सोन्याचे नाणे देण्याची प्रथा आहेʼ, असे त्याने नमूद केले आहे. मॉन्सेरातने मुरादला जेव्हा शिक्षण देण्यास सुरुवात केली, तेव्हा अकबराने त्याला सोन्याचे नाणे दिले, असे तो लिहितो.

मॉन्सेरातने आपल्या लेखनात मोगल सैन्याची छावणी, सैन्याची वाहतूक, हालचाली, दोन मुक्कामातील अंतर, सैन्यास होणाऱ्या सामग्रीचा पुरवठा, अकबराच्या दरबारातील कामकाज, १५८२ चा नवरोज उत्सव, सरकारी खजिन्यातील देवाणघेवाण, कायदा, दिल्या जाणाऱ्या शिक्षा, पाण्याचे घड्याळ, त्याने प्रवासात बघितलेले लोकजीवन, मथुरेचे मंदिर, रथसप्तमीचा उत्सव, मोहरमचा उत्सव, होळी व राजपुत्र मुराद यांबद्दल विपुल लेखन केले आहे. त्याचे लेखन अकबर अँड द जेझुइट :ॲन अकाउंट ऑफ द जेझुइट मिशन टू द कोर्ट ऑफ अकबर (१५८०-८२)) या ग्रंथात पुढे प्रसिद्ध झाले.

आग्र्याच्या दरबारातून मॉन्सेरात गोव्यात परतला (१५८२). त्यानंतरचा काळ त्याने आपली रोजनिशी लिहिण्यात घालवला होता. अ‍ॅबिसिनियाला जाताना त्याने आपले हस्तलिखित बरोबर नेले होते. तेथील कैदेतही त्याने आपले लेखन सुरूच ठेवले होते. नंतर तुर्की कैदेत त्याचे हस्तलिखित चोरीला गेले. पुढे ते तुर्की राज्यपालाच्या ताब्यात आले व त्याने ते मॉन्सेरातला परत केले होते.

संदर्भ :

  • Ansari, Mohammd Azhar, European Travellers Under The Mughals (1580-1627), Delhi, 1975.
  • Hoyland, J. S. Trans., The Commentary Of Father Monserrate, On His Journey To the Court Of Akbar, Calcutta, 1992.

                                                                                                                                                                                      समीक्षक : प्रमोद जोगळेकर